Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

८३. बौद्धक्रांतीच्या कालात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, स्त्रिया व संकर यांच्या स्थितीची पाणिनिकालीन ब्राह्मणादींच्या स्थितीशी आता तुलना करू. पाणिनिकाली पितृसावर्ण्याची म्हणजे कोणत्याही वर्णातील स्त्रीच्या पोटी वरिष्ठ वर्णातील पुरुषाच्या द्वारा जी संतती होई ती पित्याच्या वर्णाची समजण्याची चाल असल्यामुळे ब्राह्मणादिवर्णात क्षुद्रादिवर्णाची भेसळ होत असे. ती भेसळ मातृसावर्ण्याचा कायदा पसार झाल्यामुळे बौद्धक्रांतिकाळात बंद झाली. ह्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र हे वर्ण लखोटबंद होऊन जाती झाले व मिश्रविवाहोत्पन्न प्रजेच्याही नाना लखोटबंद जाती झाल्या. क्षत्रियांच्या हातचे साम्राज्य जाऊन ते असत् शूद्रांच्या हाती गेले. सत् शूद्रवर्णाला चातुर्वर्ण्यात कायमचे स्थान मिळाले. न क्षुद्राय मतिं दद्यात् नोच्छिष्टं न हविष्कृतं । न चास्योपदिशेद् धर्मं न चास्य व्रतं आदिशेत् (वसिष्ठ)॥ हा प्रकार जाऊन, क्षुद्रवर्ण: चतुर्थोपि वर्णत्वाद् धर्मं अर्हति। (व्याससंहिता) हा न्यायाचा प्रकार आस्तेआस्ते सुरू झाला. पितृसावर्ण्याच्या काळी क्षुद्रस्त्रीच्या द्वारा ब्राह्मणाच्या घरात शूद्राला अप्रत्यक्ष रीतीने शिरण्याचा चोरटा मान मिळत असे. तो आता बंद होऊन वर्णान्तर्गत म्हणून काही धर्म क्षुद्राला हक्काने प्राप्त झाले. ब्राह्मणादींच्या घरात क्षुद्रस्त्रिया शिरल्यामुळे त्रैवर्णिक स्त्रियांची उच्च योग्यता अपकृष्ट झाली व त्यांची किंमत शूद्रींच्या मापाने होऊ लागली. पाणिनिकाली क्षुद्रस्त्रियांना त्रैवर्णिकांच्या घरात भार्यात्वाने रहाता येत असल्यामुळे तदुत्पन्न प्रजा त्रैवर्णिकांत मोडून जाई. पाणिनी नंतर क्षुद्रस्त्रियांशी विवाह करणे बेकायदेशीर फर्माविले गेल्यामुळे, त्यांच्यापासून बेकायदा होणा-या संततीच्या निराळ्या जाती झाल्या आणि अनेक अनुलोम व प्रतिलोम संकरजाती व संकरसंकरजाती अस्तित्वात आल्या. पितृसावर्ण्याच्या पद्धतीने भयंकर बौद्धक्रांती जन्मास आली. मातृसावर्ण्याच्या पद्धतीने लखोटा बंद जाती अस्तित्वात येऊन काही काल चातुर्वर्णिक समाजात कोणतीही चलबिचल किंवा उलटापालट होण्याचे थांबले. त्यामुळे त्रैवर्णिकांना बौद्धादी पाखंडांशी एकतानतेने झगडण्यास अवकाश मिळाला.