Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

८२. एणेप्रमाणे सर्व चातुर्वर्णिक समाज, तदन्तर्गत पोटजाती निर्मून, आपल्या कह्यांत पूर्णपणे आणण्याची योजना व अंमलबजावणी केल्यावर, व्रात्य व धर्मभ्रष्ट क्षुद्र, वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण यांनी भरलेल्या जैनबौद्ध पाखंडांशी दीर्घकालीन झगडा करण्याला त्रैवर्णिक सज्ज झाले. झगडा शकपूर्व सहाशेपासून शकोत्तर चारशेपर्यंत तब्बल एक हजार वर्षे चालून, शेवटी बौद्ध पाखंड नरम होत होत शकोत्तर एक हजाराच्या सुमारास ह्या देशांतून समूळ उध्वस्त झाले. शकपूर्व सहाशेपासून शकोत्तर चारशेपर्यंतच्या हजार वर्षांत प्रथमारंभी शैशुनाग क्षत्रियांचा पाडाव होऊन साम्राज्यसत्ता जेव्हा क्षुद्रवर्णी नंदाच्या हाती गेली, तेव्हा ब्राह्मणसंस्कृतीची फार दैना झाली. नंतर वृषल मौर्याच्या अमदानीत बौद्धमताला अशोक मौर्याचा पाठिंबा मिळून त्या मताचा प्रसार अफगाणिस्तानापासून सिंहलद्वीपापर्यंत होऊन, ब्राह्मणधर्म अत्यंत संकोच पावला. पुढे शुंग क्षत्रिय व काण्वायन ब्राह्मण सम्राटांच्या राजवटीत ब्राह्मणधर्माची बूज बरीच सावरते न सावरते तो कनिष्क शकाच्या अमदानीत बौद्धधर्माने पुन: उचल खाल्ली. परंतु, शकांचा मोड शातवाहनांच्या हस्ते होऊन ब्राह्मणधर्माने पुन: वर डोके काढले व गुप्तांच्या कारकीर्दीत बौद्ध धर्मावर पूर्ण विजय मिळविला. बौद्धधर्माच्या वर्धानदशेत व्रात्यांच्या व क्षुद्रांच्या प्राकृत भाषांना सहजच उत्तेजन मिळाले. परंतु गुप्तांच्या कारकीर्दीत ब्राह्मणधर्माचा विजय झाल्यावर, ब्राह्मणांची संस्कृत भाषा व यज्ञयाग ह्यांची समाजात पुन: स्थापना झाली. असा हा झगडा एकसारखा एक हजार वर्षे चालला होता. सदर झगडा चालला असता थोडक्यात व स्वल्पात निर्वाणाप्रत नेणा-या बौद्धमतापासून सामान्य जनांना परावृत्त करण्याकरिता ब्राह्मणांनी भागवतधर्माचा सोपा उपासनामार्ग ऊर्फ भक्तीमार्ग काढीला व स्त्रीक्षुद्रांना मोक्षपंथा सुलभ करून दिला. तीनही वर्णांच्या स्त्रिया क्षुद्रांइतक्या प्राकृत झाल्यामुळे त्यांना संस्कृत व वैदिक भाषांतील यज्ञमार्ग समजण्यास व आचरण्यास अवघड पडे, करता हा नवीन भक्तीमार्ग काढीला गेला. भगवद्गीतेत क्षुद्रांबरोबर स्त्रियांची गणना ग्रंथकाराने जी केली तिचे कारण स्त्रियांची ही अपकृष्ट दशा होय. ज्यांना कोणत्याही कारणाने वेदमंत्रांचा लाभ मिळण्यासारखा नव्हता, परंतु जे जैनबौद्धादी मतांपासून दूर राहिले होते, अशा त्रैवर्णिकांकरिता पांचरात्रादी आगमांची ही रचना याच काली झाली. वेद, शास्रे, धर्म, इतिहास, इत्यादी गहन विषयात गती करण्यास ज्यांना सवड नव्हती त्यांच्याकरिता महाभारतादी सोप्या इतिहासग्रंथांचे प्रणयन ह्याच कालात झाले. ह्या सोप्या विश्वकोशाने सामान्य जनास आर्य ऐतिह्याची व परंपरेची ओळख होण्यास मदत केली. ह्याच काळात महायानपंथांतील देवालये, विहार, मूर्ती इत्यादींशी टक्कर देण्यास त्रैवर्णिकांनी राम, कृष्ण, इत्यादी ऐतिहासिक व्यक्तींना देवत्व देऊन व शिव, विष्णु, इंद्र, सूर्य, वायु, मरुत्, लक्ष्मी, इत्यादी आर्ष देवांना मूर्तत्व देऊन त्यांची भव्य व रमणीय देवालये उभारली. ह्याच कालात लोकांना धर्म कळावा एतदर्थ मानवधर्मशास्त्र, याज्ञवलक्यस्मृती, इत्यादी नामांकित कायद्यांचे ग्रंथ निर्माण झाले. ह्याच अवधीत बौद्धजैन पांडित्याला दिपवून टाकणारे ब्रह्मसूत्रे, न्यायसूत्रे, तर्कसूत्रे, मीमांसासूत्रे, भक्तीसूत्रे वगैरे सूत्रग्रंथ उदयास आले. असे नाना प्रयत्न ह्या विपत्तीकालातही ब्राह्मणप्रमुख चातुर्वर्णिकांनी नाना दिशांनी करून, आर्यसंस्कृतीचा पगडा बौद्धजैनादी पाखंडावर बसविला. बौद्धजैनसंस्कृतीत ज्या अहिंसा, भक्ती, इत्यादी घेण्यासारख्या उत्तम वस्तू होत्या त्यांचे परिशीलन ब्राह्मणांनी बौद्धजैनाहूनही जास्त केले, ही त्यात विशेष कौतुकाची कथा आहे. सध्या तर अहिंसेचा कंठरवाने पुकारा करणा-या बौद्धधर्माची अनुयायी सर्व राष्ट्रे मांसावर उपजीविका करणारी आहेत आणि यज्ञकर्मात हिंसा करावी म्हणून प्रतिपादणा-या वैदिकधर्माची अनुयायी हिंदू राष्ट्रे मांसाशनापासून आस्तेआस्ते पराङ्मुख होत आहेत.