Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
उदाहरणार्थ, चंडाल हा शब्द चंड या अनार्य जाती वरून आर्यांना सुचलेला आहे. क्षुद्रस्त्रीजन्य प्रजेच्या स्वतंत्र पोटजाती करून देण्याची ही क्लृप्ती यशस्वी झाल्यावर, त्रैवर्णिकांनी आपल्यातील अनुलोम विवाहासही तिचा अतिदेश केला. ब्राह्मण आणि क्षत्रिया, क्षत्रिय आणि वैश्या यांच्या प्रजेला ब्राह्मण व क्षत्रिय अशी पित्याच्या वर्णाची समजण्याची पुरातन चाल असे. तिच्यापासूनही अधर्माच्या भानगडी उपस्थित होत. करता मातृसावर्ण्याचा कायदा ह्याही प्रजेला लावून, वर्णसंकर व तज्जन्य धर्मसंकर त्रैवर्णिकांनी समाजातून बिलकूल काढून टाकला. ह्या नवीन उपक्रमाने मूर्धावसिक्त, अंबष्ठ व माहिष्य अशा तीन आणीक जाती समाजात वाढल्या. ह्या जातींची प्रजा पितृवर्ण तर कायद्यानेच स्ववर्णीय मानीना आणि कमीपणा येतो म्हणून मातृवर्णही आपल्याला सामील करून घेईना. ओघासच आले की ह्या प्रजेने आपापल्या स्वतंत्र जाती कराव्या. अशात-हेने चार वर्ण व सहा जाती मिळून दहा जाती समाजात झाल्या. अशा ह्या जाती समाजात निरनिराळ्या परिस्थित्यनुरूप वाढत जाऊन चातुवर्णिक समाजाला स्वास्थ्य मिळण्याची सोय होत असता, निरनिराळ्या जातींना पृथकपृथक् वृत्ती ऊर्फ धंदा करून देऊन जेणेकरून वृत्तीसंकर होऊन समाजात अस्वास्थ्य न माजेल अशीही योजना धर्मज्ञांना करावी लागली. ह्या योजनेप्रीत्यर्थ धर्मज्ञांनी एक तिसरा नवीन अंमलबजावणीचा कायदा पसार केला. त्रयोवर्णा ब्राह्मणस्य वशे वर्तेरन्, तेषां ब्राह्मणो धर्मं यद् ब्रूयात् तद् राजा चानुतिष्ठेत् (वसिष्ठ). म्हणजे ब्राह्मणांनी सर्व वर्णांना वर्ण व वृत्ती एतत्संबंध धर्म सांगावा आणि राजाने त्याची अंमलबजावणी करावी. ह्या कायद्याने, नवीन ज्या सहा जाती बौद्धक्रांतिकालात उत्पन्न झाल्या त्यांना, ब्राह्मणांनी निरनिराळ्या विशिष्ट वृत्त्या म्हणजे धंदे लावून दिले. धर्माने जी ज्या जातीला वृत्ती सांगितली ती वृत्ती त्या जातीहून अन्य जातीने करू नये, असा मनु प्रचलित होऊन, वृत्तीसंकर व तज्जन्य स्पर्धा व वैषम्य ह्यांना जागाच राहिली नाही. जाती म्हणून ज्या म्हणतात त्यांचा उदय हिंदुसमाजात बौद्धक्रांतीकाली हा असा झाला. क्षुद्रसमावेश करून घेऊन चातुर्वर्ण्याची स्थापना उत्तरकुरूत त्रैवर्णिकांनी केली आणि क्षुद्रस्त्रीविवाहाचे नियमन मातृसावर्ण्याच्या कायद्याने करून चातुर्वर्णिकांनी जगभर गाजणारी जातीसंस्था नर्मदोत्तरप्रदेशात बुद्धकाली निर्माण केली. दोन्ही संस्थांचे अगदी पहिले उगम कोठे, केव्हा व काय कारणास्तव सुरू झाले त्याचा छडा बिनचूक लागल्यामुळे, आता ह्या संस्थांकडे आगापिच्छा कळत नाही म्हणून आश्चर्यचकित मुद्रेने पहाण्याचे स्वल्पही कारण उरले नाही. ह्या दोन्ही संस्था पूर्णपणे ऐतिहासिक काळातल्या आहेत. वसिष्ठापासून भृगुसंहिताकारापर्यंतचे सर्व धर्मशास्त्रकार ज्या अनुलोमप्रतिलोम जातीची यादी देतात ती यादी बव्हंशाने काल्पनिक असावी असा संशय कित्येक अर्धवट लोकांनी दाखविलेला आहे. परंतु त्यात काडीचाही अर्थ नाही. ह्या जातींचा मागमूस प्रांतोप्रांती अद्यापही आढळतो. उदाहरणार्थ, ब्राह्मण व क्षत्रिया यांच्यापासून झालेल्या मूर्धावसिक्त ऊर्फ ब्राह्मण जातीय या जातीला सध्या खानदेशात ब्राह्मणजाई या प्राकृत नावाने ओळखतात आणि ब्राह्मण व क्षुद्रा यांच्यापासून झालेल्या पारशव जातीला खानदेशात पारसई हे प्राकृत नाव आहे. बाणभट्टाने हर्षचरित्रात आपल्या पारशव भ्रात्याचा उल्लेख केलेला सर्वप्रसिद्धच आहे.