Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
७९. बहुतेक हा शब्द वरील वाक्यात घालण्याचे कारण असे की, चातुर्वर्ण्यान्तर्गत क्षुद्राची स्थिती पुरुषसूक्तरचनाकाल व पाणिनीकाल यांच्या दरम्यान सुधारत चालली होती. पुरुषसूक्तकाली क्षुद्राला वर्णव्यवस्थेत नियत स्थान मिळाले एवढेच काय ते, ह्याहून जास्त लगट तत्कालीन आर्यांनी क्षुद्राला राजरोस करू दिली नाही. फेपट्या नाकाच्या व कृष्णवर्णाच्या क्षुद्र स्त्रीशी विशेष सलगी करणेही तत्कालीन शुक्लवर्ण व सरलनासिक आर्यांना पसंत नसे, मग साक्षात् शरीरसंबंधाची वार्ता कोठून? शूद्राने झाडलोट करावी, लाकूडफाटे आणावे, बैठकबिछाना साफसूफ ठेवावा आणि धनी देईल तो तुकडा खाऊन कुत्र्याप्रमाणे घराच्या पडवीत गुराढोरांशेजारी धन्याचे हितचिंतन करीत सुखाने रहावे. त्रैवर्णिक स्त्रीकडे तर त्याने वर डोळे करून पाहिलेलेही खपत नसे. कालांतराने ह्या दूरीभावात फरक पडला. प्रथम फरकाला तोंड ब्राह्मणद्वारा किंवा क्षत्रियद्वारा पडले नाही, वैश्यद्वारा पडले. कृषि, पाशुपाल्य व बेपार करणा-या वैश्याला हाताखाली राबविण्याकरिता घरी बरेच क्षुद्र ठेवणे जरूर पडे. घरोदारी, शेतीवाडीत, हाट बाजारात सर्व व्यवहार क्षुद्रसाहाय्याने होई. अर्थात क्षुद्रांतील नरमाद्यांचा वैश्यस्त्रीपुरुषांशी अधर्म्य शरीरसंबंध होई. वैश्यक्षुद्रातील हा चोरटा व्यवहार यजु:संहिताकाली इतक्या प्रमाणावर वाढला होता की ब्राह्मणक्षत्रिय समाजात तो एक थट्टेचा विषय होऊन बसला होता. एतत्संबंधी पुरावा ज्यास पहावयाचा असेल त्यांनी कृष्णयजु:संहितेच्या सातव्या कांडाच्या चौथ्या प्रपाठकाचा एकूणविसावा अनुवाक व शुक्लयजु:संहितेचा तेविसावा अध्याय पहावा. अश्वमेधयज्ञ हा विषय आहे. तत्संबंधक प्रक्रियेत अनेक अश्लील संवाद यज्ञकर्मात भाग घेणा-या संभावित स्त्रीपुरुषांना तोंडपाठ म्हणावे लागत. पैकी क्षत्ता व पालागली यांच्या संवादाचे भाषांतर देतो. क्षत्ता पालागलीला म्हणतो, क्षुद्रीण जेव्हा वैश्याशी चोरून रत होते तेव्हा तिचे समाधान म्हणून होत नाही! या विधानाला पालागली उत्तर करते की, क्षुद्रपुरुष वैश्य स्त्रीशी जेव्हा रममाण होतो तेव्हा त्याची तरी तृप्ति कोठे होते! हे ग्राम्य संभाषण अश्वमेध यज्ञासारख्या मोठ्या उत्सवात हजारो सभ्यांच्या पुढे होत असे हे लक्षात घेतले म्हणजे वैश्यक्षुद्रांमधील हा असद्वयवहार चव्हाट्यावर आणण्याच्या योग्यतेचा झाला होता हे स्पष्ट होते. हा वैश्यक्षुद्रीय असद्वयवहार पुरुषसूक्तकाल व यजु:संहिताकाल यांच्या दरम्यानच्या काळातला आहे. असो. सांगण्याचा मुद्दा काय की, त्रैवर्णिक व क्षुद्र यांच्यातील दूरीभावात फरक वैश्यांच्याद्वारा प्रथम पडला. कालांतराने ह्या असद्वयवहाराचा फैलाव क्षत्रियात व ब्राह्मणातही पसरला. क्षत्रिय व ब्राह्मण यांच्या घरांतून शूद्रिणी कामधंद्याला असत.