Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

त्यांच्याशी प्रथम चोरून व्यवहार ब्राह्मणक्षत्रिय करू लागले आणि नंतर घरोघरी एकच परी आहे असे जेव्हा अन्योन्यज्ञान झाले, तेव्हा शूद्रिणींशी ब्राह्मणक्षत्रिय राजरोस व्यवहार करू लागले. हा प्रकार तिन्ही वर्गात रूढ झालेला पाहून, तत्कालीन सच्छील ब्राह्मणांनी त्रैवर्णिकांना क्षुद्रस्त्रियांशी विवाह करण्याची परवानगी दिली व त्या विवाहाला गौणविवाह असे धर्मशास्त्रीय संभावित नाव ठेविले. हा गौणविवाह पाणिनिकाली कुत्सित व निंद्य समजत व क्षुद्रस्री करणा-या ब्राह्मणाला किंवा क्षत्रियाला किंवा वैश्याला क्षुद्राभार्य: म्हणून नावे ठेवीत. क्षुद्रस्री पासून होणारी अपत्ये पाणिनिकालापर्यंत पितृजातीय म्हणजे पित्याच्या वर्णाची समजत. स्त्री कोणत्याही वंशातील असो, तिच्यापासून झालेले अपत्य पितृजातीय धरण्याची चाल त्रैवर्णिकांत फार पुरातन आहे. अपत्य पित्याच्या वर्णाचे समजत, हे सिद्ध करणारी काही द्वंद्वेच येथे देतो, म्हणजे जास्त पाल्हाळ करण्याचे कारण पडणार नाही.

पिता माता अपत्य
१) शंतनु (क्षत्रिय) x गंगा (अनामकवर्णीय) = भीष्म (क्षत्रिय)
२) पाराशर (ब्राह्मण) x मत्स्यगंधा (धीवरी) = कृष्णद्वैपायन (ब्राह्मण)
३) शंतनु (क्षत्रिय) x मत्स्यगंधा (धीवरीशुद्र) = विचित्रवीर्य (क्षत्रिय)
४) विश्वामित्र (क्ष.) x मेनका (अप्सरा) = शकुंतला (क्ष.)
ययाति (क्ष.) x देवयानी (ब्रा.) = यदु (क्ष.)
ययाति (क्ष.) x शर्मिष्ठा (असुरी) = द्रुह्यु (क्ष.)
जरत्कारू (ब्रा.) x जरत्कारी (नागवंशी) = आस्तिक (ब्रा.)

वसिष्ठ, ऋष्यशृंग, काश्यप, वेद, तांड्य, कृप, काक्षिवत्, कमठ, यवक्रति, द्रोण, आयु, मतंग, दत्त, द्रुपद, मत्स्य (शांतिपर्व अध्याय २९६) इत्यादी हीनवर्णात्रुत्पन्न ब्राह्मणांची आणीक शेकडो उदाहरणे देता येतील. अपत्य पित्याच्या वर्णाने मोजण्याची ही चाल त्रैवर्णिकांनी क्षुद्र्यांपासून झालेल्या अपत्यांसही साहजिकपणे लावली. ह्या लापनिकेचा त्रैवर्णिक समाजात फार विलक्षण परिणाम झाला. अप्सरस, असुर, नाग, देव, इत्यादी वंशातील स्त्रियांशी त्रैवर्णिकांचे जे संबंध झाले ते क्षुद्रस्त्रियांशी जे असंख्य संबंध झाले त्याच्या अपेक्षेने फारच तुरळक झाले. क्षुद्रस्त्रिया जशा त्रैवर्णिकांच्या घरोघर दासकर्म संपादण्यास मिळशल्या, तशा गंधर्व, नाग, असुर, देव इत्यादींच्या स्त्रिया त्रैवर्णिकांच्या घरी राबावयाला कधीच राहिल्या नाहीत. वर्णाने गंधर्वादी लोक उजळ असल्यामुळे त्यांच्यापासून त्रैवर्णिकांच्या रक्तात किंवा वर्णात किंवा स्वभावात किंवा चालीरीतीत म्हणण्यासारखा फरक पडला नाही. क्षुद्रस्त्रीसमागमापासून मात्र त्रैवर्णिक रक्तांत, वर्णांत, स्वभावात व चालीरीतीत इतका मोठा फरक पडला की, समाजातील विचारी लोकांना तत्संबंधाने व तन्निवारणार्थ उपाययोजना करणे अगत्याचे दिसले. क्षुद्रस्त्रीसमागमापासून त्रैवर्णिकांच्या कुटुंबघटनेत कोणत्या प्रकारचा फेरबदल झाला त्याचा तपशील असा.