Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
समजा कोणी एक अग्निचित् ब्राह्मण आहे. त्याला एक सहधर्माचरणार्थ सवर्ण म्हणजे ब्राह्मणवर्णाची पत्नी आहे. ह्या पतिपत्नींनी घरकामाकरिता एक क्षुद्रदासी तरी ठेवावी किंवा अग्निचित् ब्राह्मणाने क्षुद्रभार्या तरी करावी. दासी ठेविली आणि ब्राह्मणाची नीती चुकून दासी गर्भार राहिली, तर तो अनाचार गृहपत्नीला उघड्या डोळ्यांनी पहावत नसे. मुळीच शुद्री कामाला न ठेविली, तर घरातले सर्व काम एकट्या ब्राह्मणीच्याने आटपत नसे. तशात विटासपण, बाळंतपण, इत्यादी अडचणीस्तव कायमची मोलकरीण गृहपत्नीलाअवश्य असे. करता, कायमचे मायेचे फुकट माणूस हाताखाली राबावयाला सापडावे म्हणून गृहपत्नीला त्यातल्या त्यात सपत्नीभाव गिळून ब्राह्मणाला क्षुद्री भार्या करून देणे जास्त सोयीचे दिसे. अशात-हेने घरात क्षुद्रस्त्री भार्या म्हणून प्रतिष्ठितपणे शिरली. तिला पोरे झाली म्हणजे ती पित्याच्या वर्णाची समजली जात. तशात, ब्राह्मणाने, घरात कामाचा पसारा विशेष असल्यास, जर दोन चार क्षुद्रस्त्रिया केल्या, तर ब्राह्मणाच्या घरात शुद्रयुत्पन्न ब्राह्मणपोरांचे केवळ पेवच फुटे. ब्राह्मणाची पोरे व क्षुद्रीची पोरे अशी सर्व पोरे ब्राह्मण म्हणून गणिली जात. क्षुद्रीच्या पोरांना क्षुद्रीचे शौचधर्म, क्षुद्रीचे अस्पष्ट उच्चार, क्षुद्रीचा कृष्णवर्ण व क्षुद्रीच्या माहेरच्या क्षुद्र माणसांची संगत लागून, ब्राह्मणाच्या घरात एका प्रकारचे अपकृष्ट ब्राह्मण निपजत. हाच प्रकार क्षत्रियांच्या व वैश्यांच्याही घरात होई व तो ब्राह्मणाच्या घरातल्याहून जास्त प्रमाणावर होई. आता इतके खरे की, ब्राह्मणादींच्या घरात ब्राह्मणादींच्या सहवासाने, शिक्षणाने व चालीरीतीने क्षुद्रस्त्रीच्या पोरांचे शील केवळ क्षुद्र पोरांहून बहुत श्रेष्ठतर बने; परंतु त्यांच्या कातडीवरील मातेच्या कृष्णवर्णाची छटा कोणत्याही सहवासाने धुवून जाण्यासारखी नसे. ही कृष्णवर्ण प्रजा बरीच वाढल्यावर ब्राह्मणांत शुक्लभास्वर वर्णाचे ब्राह्मण व कृष्णवर्णाचे ब्राह्मण असे दोन रंगाचे ब्राह्मण दिसू लागले. असा हा फेरबदल पाणिनिकालापर्यंत होत होता. पडवीतली गुराढोरांत पशुवत् कालक्रमणा करणारा उत्तरकुरूंतील क्षुद्र चढता चढता दक्षिणकुरूत क्षुद्रस्त्रियांच्या उपयुक्त गुणांच्या जोरावर त्रैवर्णिकांना व अग्निहोत्र्यांना जावई करण्याच्या उच्चतम पाह्यरी प्रत पोहोचला. आचार, विचार, शौचधर्म, शास्र, व्यापार व राज्य यांच्यात प्रगती करण्यास स्वास्थ्य मिळावे म्हणून अर्धरानटी क्षुद्रांचा समावेश त्रैवर्णिकांनी चातुर्वर्ण्य निर्मून करून घेतला खरा, परंतु तत्प्रीत्यर्थ त्यांना पुढे भरपूर भुर्दंट भरावा लागला.