Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
आजपर्यंत मोंगलादींच्या सैन्यात मराठे असत, परंतु धनी मारला गेल्यास, कशाकरिता लढावयाचे ते न समजून ते प्राय: सैरावैरा पलायन करून इतस्तत: पांगत असत. आज हा धनी तर उद्या तो, असा त्यांचा व्यवहार असे. तो व्यवहार सुटून सर्व मराठ्यांच्या ठायी कोणता तरी प्रबल सामान्यधर्म उत्पन्न व्हावा व धनी गेला, मेला किंवा पराभूत झाला, तत्रापि सामान्यधर्माच्या बचावाकरता मराठ्यांनी जास्तच आवेशाने प्राण खर्ची घालावे, एतदर्थ रामदासांनी शिवाजीस हा बहुमोल सल्ला दिला व त्या चतुरस्र मुत्सद्याने व वीर पुरुषाने तो सर्वांशाने यद्यपि नव्हे तत्रापि बराच अमलाता आणिला. मराठा तेवढा मेळवावा आणि आपुला महाराष्ट्रधर्म राखावा व वाढवावा ह्या उपदेशाची देणगी रामदासांनी शिवाजीला व तत्कालीन मराठ्यांना दिली, म्हणजे महाराष्ट्रात रामदासांनी राष्ट्रीयत्व व राष्ट्रभावना म्हणून जी म्हणतात ती उत्पन्न केली. कल्पक रामदास व कर्ता शिवाजी. ह्या महाराष्ट्रधर्माच्या ऊर्फ राष्ट्रभावनेच्या समानधर्माचा मराठ्यात अवतार झाल्याने, शिवाजीच्या पश्चात संभाजी व राजाराम यांच्या कारकीर्दीत....... नसताही, मराठा सरदारांनी औरंगजेबाला मट्ट्यास आणिले. ही राष्ट्रभावना जर नसती - आणि नाही अशी औरंगजेबाची प्रथम कल्पना होती - तर शिवाजीच्या मृत्यूनंतर त्याने स्थापिलेले राज्य थोड्याच दिवसात लयास गेले असते. आता रामदासाला प्रथम कल्पक म्हटल्याने व शिवाजीला कर्ता म्हटल्याने असे समजावयाचे नाही की, महाराष्ट्रधर्माची म्हणजे समानराष्ट्रधर्माची जाणीव शिवाजीच्या ठायी मूलत: अगदीच नव्हती. शिवाजीच्या ठायी ही कल्पना अभावरूपाने म्हणजे यवनांच्या द्वेषरूपाने बाळपणापासूनच होती. इतकेच की तिला भावरूप अद्याप आले नव्हते. ते रामदासांनी उच्चस्वराने पुकारिल्यामुळे व त्याची सोपपत्तिक तत्त्व म्हणून मांडणी केल्यामुळे, भावरूपाने म्हणजे मराठ्यांची एकजूट करण्याच्या रूपाने शिवाजीच्या मनात उत्कटत्वाने वास करिते झाले. रामदास नसते तर शिवाजीने हे राजकीय तत्त्व शोधून काढिले असते की नसते, हा वाद घालण्यात काही हाशील नाही. कदाचित काढिले असते व कदाचित काढिले नसते. रामदास नसते आणि शिवाजीने ते तत्त्व स्वत: शोधून काढिले असते तर कल्पकत्वाचा मान आम्ही शिवाजीस दिला असता. एकंदर विवेचनाचा मथितार्थ असा की, शहाजीच्या वेळी राष्ट्रधर्माची कल्पना उदय पावली नव्हती आणि शिवाजीच्या वेळी ती उदय पावली होती. रामदासांनी ती पुकारल्याबरोबर समानशीलत्वास्तव व हितगर्भत्वास्तव शिवाजीने तिचे तत्काळ मंडन व ग्रहण केले. ते मंडन व ग्रहण शहाजीच्या स्वत:च्या हातून त्या काळी होण्यासारखे नव्हते. शहाजीच्या वेळीही यवनद्वेष नव्हता असे नाही. परंतु त्या द्वेषाला भावरूप देणे म्हणजे मराठ्यांची तेवढी एकजूट करून त्यांच्या जोरावर स्वराज्य मिळविणे शहाजीला शक्य नव्हते. तीन प्रयत्न करता करता चौथ्या प्रयत्नात मुसलमानाचे मांडलिकत्व तेवढे त्याला स्वत:ला साधता आले. अशा स्थितीत यवनांचा द्वेष प्रकटपणे करणे शहाणपणाचेही नव्हते व सोईचेही नव्हते. शहाजीच्या काळी यवनांना बाद करण्याच्या गोष्टी शहाजीच्या दरबारात निघाल्याचे जयराम लिहितो.
राजा हो नृप शहाजी यवन करावें बाद ।
हेजिब विधिसिं बोलिला ऐसा द्विजसंवाद ॥९६॥
बाद करणे म्हणजे राज्यच्युत करणे असा मात्र अर्थ हा संवाद करणा-या ब्राह्मणांच्या डोक्यात नव्हता. कारण पुढील श्लोकात बाद करणे म्हणजे काय करणे तेही जयराम नमूद करतो.
व्यापिली हे अवनी यवनीं मुण वैदिक वाक सिणोन निजेली।
या वरि साहेबकीर्तिची मूर्तिच आपलि हे जीव हेजिक केली ॥
शाहजीराजे व बादशाह असि वृत्ति करूं जगत्रयि विधिसंनिधि गेली॥९७॥
यवनांनी सर्व पृथ्वी म्हणजे भरतखंड व्यापिलेले पाहून वेदविद्या त्रासून मूर्छित झाली. परंतु, शहाजीराजाच्या पराक्रमाने ती सावध झाली आणि ब्रह्मदेवाकडून भरतखंडाच्या राज्यवृत्तीची वाटणी शहाजीराजे व शहाजहान पातशहा या दोघात तिने करून देवविली. यवनाला नर्मदेच्या उत्तरेस वाटणी दिली आणि शहाजीराजे यास नर्मदेच्या दक्षिणेस वाटणी दिली. तात्पर्य, या श्लोकात बाद करणे म्हणजे वाटणी करून देणे असा अर्थ अभिप्रेत आहे, यवनांना उच्छिन्न करून त्यांची पातशाहत आक्रमण करणे असा अभिप्राय नाही. शहाजीच्या काळी त्याहून जास्त भाषा सार्थ झाली नसती. परंतु रामदास व शिवाजी यांच्या काली यवनांना उछिन्न करण्याची भाषा उत्कटत्वाने महाराष्ट्रात रामदासांनी वापरिली आहे. यवनांच्या पातशाहीला रामदास बहुता दिवसांचे बंड म्हणतात व कुत्ते मारून परते घालावे म्हणून निक्षून सांगतात. शहाजी व शिवाजी ह्यांच्या कालात राजकीय विचारात केवढा हा फरक! बुडाला औरंग्या पापी दुष्ट चांडाळ घातकी, ही भाषा शहाजीकाली संभाव्यसुद्धा नव्हती, प्रकटपणे बोलणे तर दूरच राहिले.