Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
५५. स्वत:च्या दरबारात यवनांची किंचित कुचेष्टा झालेली शहाजीला खपत असे. बाहेर कागदोपत्र शहाजी आदिलशहाला आपला अधिराज म्हणून आदबीने संबोधी आणि घरी दरबारात त्याचे कवी शहाजीने आदिलशहाचे राज्य राखिले आहे म्हणून शहाजीची प्रौढी गात. बाहेर बोलावयाचे झाले म्हणजे शहाजहानाला शहाजहान म्हणून किताब लावावा आणि घरात बोलताना त्याच्याशी वाटणी करून बसलो आहो अशी बरोबरीची भाषा वापरावी, असा दुटप्पी प्रकार शहाजीचा असे आणि हा सर्व प्रकार आदिलशहा, शहाजहान वगैरे लोकांच्या कानावर त्यांचे अखबरनवीस घालीत असत. परिणाम असा होई की, शहाजीसंबंधाने आदिलशहा किंवा शहाजहान यांच्या मनात सदा संशय वास करी. त्याच्यावर विश्वास कोणाचाच नसे. कामापुरता शहाजीला जवळ करावयाचा आणि काम संपले म्हणजे त्याला हाकून द्यावयाचा असा प्रकार शहाजीच्या चरित्रात कितीदा तरी घडला आहे. ह्या दुटप्पी वर्तनाने जी मानखंडणा होई ती शहाजीच्या आंगवळणी पडलेली होती. स्वत:चा कार्यभाग कसा साधेल, इतकेच शहाजीचे पहाणे असे. त्यांत मानखंडना होते की मानमंडणा होते ह्याचा कीस करीत बसण्यास त्याला अवकाश नव्हता. परंतु शिवाजीसारख्यांना ही धरसोड व तजन्य मानहानी बिलकूल खपत नसे. एकदा एतत्संबंधाने वृद्ध सोनोपंत डबीर व तरुण शिवाजीराजे यांच्यामध्ये एक मोठा मनोरंजक संवाद झाला तो बृहदीश्वरशिलालेखकाराने दिलेला मनन करण्यासारखा आहे. शिवाजी म्हणतो : "वडील प्रथम निजामशहाच्या संगतीस होते. ते आदिलशहाच्या बोधनेवरून त्याकडे गेले. परतून निजामशहांनी बोलाविताच त्यांजकडे आले पुन: बिनसून आदिलशहाकडे गेले. अशा दोनतीन येरजारा झाल्या. वडील आपल्याकडून सर्वांची कामे निर्मळ मनाने करीत. परंतु, आज इकडे उद्या तिकडे, अशा कारणांनी सर्वांस कपटी म्हणून भासू लागले. कार्य अडले म्हणजे वडिलांचा ते ते शहा बहुमानही करीत, परंतु मनात किंतू धरीत. खरे पाहिले तर, थोर मनुष्यांनी ज्याची एकदा संगती धरिली त्याची कदापि बिघडू नये आणि कदाचित बिघाड झालाच तर पुन: त्याजपाशी परतून येऊ नये. ही नीति आहे. ती न पाळल्यामुळे यवनांनी वडिलांशी कृत्रिम वर्तन केले. परंतु वडील शूर व निर्मळ म्हणून बचावले." शिवाजीचा सिद्धान्त खरा होता यात संशय नाही. परंतु शहाजीचा व्यवहार त्या सिद्धान्ताहूनही खरा होता, हे व्यवहारज्ञ स्वत:च्या अनुभवाने सांगू शकतील. अपवाद खरे असतात, म्हणूनच सिद्धान्तांना चिकटवलेले असतात! स्थितीच अशी होती की, दुटप्पीपणाशिवाय शहाजहान, औरंगजेब, मीरजुमला, महमदशहा, फतेखान, मुस्तफाखान इत्यादी कपटनाटक्यांध्ये शहाजीचा सरळपणाने टिकाव लागला नसता.