Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
५२. येथे एक अनुषंगिक प्रश्न असा निघतो की, टोपीवाल्यांकडून कारीगार बंदुका, तोफा व दारूगोळा जो शहाजी घेई तो त्याने महाराष्ट्रात त्याबरहुकूम बनविण्याची व्यवस्था का केली नाही? अथवा शहाजीचा मुलगा शिवाजी त्याने तरी का केली नाही? किंबहुना बाजीराव बल्लाळ, बाळाजी बाजीराव व नाना फडणवीस ह्या गृहस्थांनी का केली नाही? उत्तम हत्यारांकरिता दुस-यांचे मिंधे राहण्याची लज्जा त्यांना कशी वाटली नाही? प्रश्नाला उत्तर एकच आहे व ते अगदी साधे आहे. ते हे की, उत्तम, रेखीव व नेके हत्यार बनविण्याची कला पैदा होण्यास शास्त्रीय ज्ञानाची जी पूर्वतयारी राष्ट्रात व्हावी लागते ती त्या काळी महाराष्ट्रात नव्हती. शहाजीच्या हयातीत युरोपात डकार्ट, बेकन इत्यादी विचारवंत सृष्टपदार्थसंशोधनकार्याचे वाली ज्यारीने पंचभूतांचा शोध लावण्यास लोकांना प्रोत्साहित करीत होते आणि आपल्या इकडे एकनाथ, तुकाराम, दासोपंत, निपटनिरंजन इत्यादी संत पंचभूतांना मारून ब्रह्मसाक्षात्कारात राष्ट्राला नेऊन मुक्त करण्याच्या खटपटीत होते. अशांना स्क्रू, टाचणी, बंदूक व तोफ यांचा विचार वमनप्राय वाटल्यास त्यात नवल कसचे? थोडक्यात आगस्ट कोंट याच्या भाषेत सांगावयाचे म्हणजे महाराष्ट्र त्या काळी metaphysicalmetaphysical अवस्थेत होते आणि positive अवस्थेत येण्यास त्याला अद्याप पाचशे वर्षे अवकाश होता. म्हणजे शक २००० च्या सुमारास महाराष्ट्र positive बनणार होते. अशा अवस्थेत आपल्याला बनविता येत नाहीत ती श्रेष्ठ हत्यारे दुस-यांकडून विकत घेण्याखेरीज शहाजीला गत्यंतर नव्हते. सध्या महमद, आफ्रीडी, चित्रळी, अफगाण, इराणी इत्यादी अर्धसुधारलेल्या लोकांची जी अवस्था आहे तीच आपली शहाजीच्या काळी होती. उत्तम जर्मन, फ्रेंच किंवा रशियन बंदूक घेऊन जो आफ्रीडी माणूस चो-या, दरवडे व हल्ले करतो, त्याहून शहाजीकालीन मराठा जास्त सुधारलेला होता हे खरे. परंतु शस्त्राकरिता तो युरोपियंनाचा आफ्रीडीच्या इतकाच परावलंबी होता. ह्या परावलंबित्वाचा अर्थ शहाजीच्या काळी कोणाच्या लक्षात कितपत आला असेल ते सांगण्यास साधन नाही. परंतु विष जे आहे ते जाणून खा की नेणून खा, आपला अंमल केल्याशिवाय जसे रहात नाही, तसेच ज्याचे हत्यार त्याचे राज्य हा नियम ह्न कोणाला समजो की न समजो ह्न आपले कार्य केल्याशिवाय रहात नाही. अर्थात, मूळ हत्यार तयार करणारे जे फिरंगी, फ्रेंच, डच किंवा इंग्रज वगैरे युरोपियन त्यांना राज्य कमावून देण्याकरिता नजाणतेपणे शहाजी जिवापाड मेहनत करीत होता असा अर्थ झाला आणि हा अर्थ शहाजी व त्याचे ब्राह्मण मुत्सद्दी यांच्या लक्षात यावा तसा नव्हे तर मुळीच आला नाही. ज्या दिवशी व्हास्कोने कालिकतच्या चामुरीच्या थोबाडीत मारिली तोच हिंदुस्थानचे साम्राज्य युरोपियनांच्या हातात जाऊ लागण्याचा पहिला दिवस होय. मूठभर फिरंगी लोकांनी एका हिंदू राजाला पहिले छुट कुंठित करावे असे त्यांच्याजवळ कोणते बरे सामर्थ्य होते? काय त्यांना दहा तोंडे व वीस हात होते? की ते इजार नेसत होते व बायबल पढत होते म्हणून ते इतके प्रबल झाले? तर अनेक शोधांच्या साह्याने सिद्ध झालेली जी लांब पल्ल्याची कारीगार हत्यारे त्यात त्यांचे सामर्थ्य होते. ही हत्यारे म्हणजे युरोपियन शास्त्रीय संस्कृतीचा केवळ निष्कर्ष होत. ह्या हत्यारांच्या जोरावर एक युरोपियन हजार हिंदूमुसलमानांना भारी होता. हा अर्थ शहाजीसारख्या धोरणी, दूरदर्शी, मतलबी व जागरूक सरदाराच्या लक्षात न यावा अशीच तत्कालीन महाराष्ट्र समाजाची स्थिती होती. तेव्हा दोषाचा वाटा शहाजीप्रमाणेच तत्कालीन समाजावर पडतो, हे उघड आहे. सगळेच आंधळे, त्यात एकालाच सुळावर चढविण्यात मतलब काय? ह्या बाबीत ....... पंक्तीस अकबर, शहाजहान, मीरजुमला व औरंगजेब असे सारेच बसतात. तेव्हा हा तत्कालीन भारतवर्षीय संस्कृतीतलाच सर्वसाधारण दोष होय हे कबूल करावे लागते.