Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

तो हेही आणीक स्वानुभवाने जाणत होता की, हिंदुस्थानात व महाराष्ट्रात अशा कितीतरी लढाऊ जाती आहेत की, ज्या वाटेल त्या स्वधर्मी किंवा परधर्मी धन्याची लष्करी नोकरी करून केवळ भाकरीकरिताही स्वत:चा प्राण देण्यास व दुस-याचा घेण्यास एका पायावर तयार आहेत. तो हेही पहात होता की, महाराष्ट्रातील एकाच गावातल्या व एकाच कुळातल्या व गोतातल्या भाऊबंदांपैकी काही लोक मराठ्या सरदारांच्या लष्करी तैनातीत आहेत व काही मुसलमान सरदारांच्या व बादशहांच्या लष्करी तैनातीत आहेत आणि त्यापैकी कोणीही धन्याच्या देशाची, राष्ट्राची, धर्माची, हेतूची किंवा कशाचीच विचारपूस, इष्टानिष्टता, आवडनिवड किंवा श्रेष्ठकनिष्ठता पहात नाही. स्वत:चे भोसले कूळ पहावे तर, तो व त्याचा बाप हे निजामशाही नोकर होते, त्याचे चुलत भाऊ मोंगलाई नोकर होते व त्याचे कुळभाऊ आदिलशाही व बेरीदशाही सैन्यात होते. अशा स्थितीत स्वत:चा स्वतंत्र पक्ष, स्वत:ची स्वतंत्र फौज व स्वत:ची श्रेष्ठतर हत्यारे कशी निर्माण करावी ह्या तीन बाबींचा त्याने खल केला. पक्ष निर्माण करणे म्हणजे ज्यांचा पक्ष निर्माण करावयाचा त्यांच्यात कोणती तरी सामान्य आकांक्षा अस्तित्वात असली पाहिजे. धर्म, जाति, देव, देश ही चार स्थाने उत्तम पुरुषांच्या ठायी समान आकांक्षेचे विषय होऊ शकतात. परंतु त्या काळी मराठ्यांच्या मनोरचनेत ह्या स्थानांना, बिलकुल म्हटले तरी चालेल, अवकाश नव्हता. अशा द्विपाद पशुतुल्य अधम लोकात समान बंधनत्व फक्त एकच सापडण्याजोगे होते. ते हेच की, ह्या द्विपादांच्या पोटापाण्याची व्यवस्था करून त्यांना आपल्या हुकमतीत बैलाप्रमाणे किंवा गाढवाप्रमाणे राबविणे आणि मनाजोगी कामगिरी करून घेतल्यावर दोन ममतेचे शब्द बोलून पाठ थोपटणे. तात्पर्य, पोटाला भाकर देणारा धनी हा ह्या अधम संस्कृतीच्या लोकांचा समान बंधनत्वाचा विषय होता. तो पाठीवर असला म्हणजे हे लढावयाचे, तो मेला किंवा पळाला तर पोटाच्या भीतीने हे पळावयाचे. लढाईत धनी मेला की हिंदुस्थानातील शिपुर्डी पळ का काढितात, याचे खरे बिंग न कळल्यामुळे,अनेक परकीय इतिहासकार या पळकुट्यांना भेकड म्हणतात. परंतु हे म्हणणे अवास्तव आहे. हिंदुस्थानातील शिपायांना मरणाचे भय इतके वाटत नाही. त्या पशूंना मुख्य भय पोटाचे. धनी मेल्यावर, पोटाला घालणारा मेला म्हणून हे लोक पोटाला घालणारा दुसरा धनी पहाण्याकरिता जीव बचावून पळतात. अशी ही ह्यांच्या पलणाची मीमांसा आहे. शहाजी हे सर्व जाणून होता. शहाजीस ह्या लोकांना पदरी बाळगण्याची म्हणजे आपल्या फौजेत त्यांची भरती मनसबदार ह्या नात्याने राजरोस करण्याची मुभा होती. हे सैन्य जमवून स्वपक्ष निर्माण करण्याच्या कामी मनसबदारी त्याच्या आयती पथ्यावरच पडली. तो मनसबदार नसता व आपल्या पाटीलकीच्या गावी पाटील किंवा देशमुख म्हणून असता व फौज जमवण्याचा उद्योग करता, तर त्याची गणना बंडखोर पुंडात झाली असती व त्याचे शासन ताबडतोब झाले असते. जुलमी परकीय राजांचा नाश करावयाचा म्हटला म्हणजे त्यांची नोकरी करून व विश्वास संपादून योग्य समई त्यास गचांडी देण्याचा मार्ग जित लोकांना सदा श्रेयस्कर, सुरक्षित व न्याय्य गणलेला आहे. तो मार्ग शहाजीच्या बापाने चोखाळून आपल्या मुलाला साफ करून ठेविला होता. तात्पर्य, निजामशाही मनसबदार असल्यामुळे त्याला फौज बिनबोभाट जमविता येणे सहज झाले होते आणि ही फौज म्हणजेच शहाजीचा पक्ष बनला होता. साधनांपैकी पक्ष आणि फौज बापाच्या मृत्यूनंतर त्याच्या हिकमतीत आल्यावर शहाजीने आपल्या गोड वागणुकीने फौजेला आपली इतकी काही ममता लाविली की बखरकार लिहितो, फौजेतील शिपायांना व अंमलदारांना असे वाटे की नोकरी करावी तर ती राजा शहाजीची करावी, शहाजी केवळ आपला मायबाप आहे. मायेने असा आपलेपणा फौजेत उत्पन्न केल्यावर शहाजीने पाहिले की, केवळ मायेनेच सर्व काम भागत नाही व माया पोटभर दाखविली म्हणजे शिपाई जास्त कर्तबगार होतो अशातलाही अर्थ नव्हे. मायेने फार तर शिपाई इमानी बनेल. परंतु इमानाइतकीच कर्तबगारीची किंमत असल्यामुळे, आपल्या फौजेची कर्तबगारी व कार्यक्षमता जेणेकरून वृद्धिंगत होतील ते साधन शहाजीने पैदा करण्याच्या योजना केल्या. ते तिसरे साधन म्हणजे श्रेष्ठतर हत्यारे.