Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
आपण वाटेल तें काम करून देऊं म्हणून गोविंदपंतानें पुण्यांत भाऊला आश्वासनें दिलीं होतीं. तेव्हां हें सुजाचा स्नेह जुळवून आणण्याचें काम गोविंदपंत घडवून आणील अशी भाऊला आशा होती. सुजाशीं स्नेह करण्यापासून केवढा फायदा होईल हें अबदालीहि जाणून होता. सुजा आपल्याला मिळाला म्हणजे बाकीचे सर्व मुसुलमान संस्थानिक आपल्या बाजूला अवश्य आलेच पाहिजेत ह्याची अबदालीला पूर्ण खात्री होती. परंतु सुजाच्या व अबदालीच्यामध्यें गोविंदपंताचा प्रांत व त्याची फौज असल्यामुळे सुजाशीं बोलणें करण्याचीच अबदालीला प्रथम अडचण आली. ही अडचण काढून टाकण्याकरितां १७६० च्या मेंत जहानखान व नजीबखान ह्यांना त्यानें गोविंदपंतावर पाठवून दिलें. गोविंदपंताची परीक्षा पहाण्याची हीच वेळ होती. ह्यावेळी जयापजयाचीं सर्व सूत्रें गोविंदपंताच्या हातीं होतीं. नजीबखानाची व सुजाउद्दौल्याची भेट हरएक प्रयत्न करून गोविंदपंतानें होऊ द्यावयाची नव्हती. कोळजळेश्वराहून निघून गोविंदपंताचीं ठाणीं मारून सकुराबाद, इटावें वगैरे स्थलें घेत घेत सुजाउद्दौल्याला बिठूर वगैरे ठिकाणीं जाऊन भेटावें असा नजीबखानाचा बेत होता. हा बेत हाणून पाडण्याचें गोविंदपंताचें काम होतें; परंतु, दुःखाची गोष्ट कीं, हें काम गोविंदपंतानें मनापासून केलें नाहीं. इटावें प्रांतांतील सकुराबाद वगैरे ठिकाणचे गोविंदपंताचे ठाणेदार आपापलीं ठाणीं यवनांच्या देखत सोडून देऊन पळून येऊं लागले. स्वतः गोविंदपंत मागें मागेंच राहू लागला. सुजाउद्दौल्याला पाठींशीं घालून नजीबाची व त्याची भेट प्राण गेला तरी होऊं द्यावयाची नाहीं हा जो निश्चयाचा व जोराचा प्रयत्न गोविंदपंतानें करावयाचा तो त्यानें केला नाहीं. इतकेंच नव्हे; तर वेळ होता त्या वेळीं सुजाशीं देखील त्यानें मळमळीतच बोलणें केलें. सुजा बोलून चालून मराठ्यांच्या स्नेहाविषयीं उदासीन होता. चार महिन्यांपूर्वी मराठे आपल्यावर स्वारी करणार होते ही गोष्ट त्यानें इतक्या थोड्या अवधीत विसरून जावी हें अशक्य होतें. अबदाली व नजीब ह्यांच्याकडून कोणी बोलायला आलें नाहीं तोपर्यंत मराठ्यांच्या बाजूचे आपण आहोंत असाच त्यानें बोलण्याचा क्रम ठेविला; परंतु गोविंदपंताच्या प्रांतांतून नजीबखान व जहानखान जेव्हां बिठूरास आले तेव्हां तो त्यांना भेटण्यास गंगा उतरून आला (लेखांक १९९). त्यावेळी मराठ्यांचा वकील शामजी रंगनाथ सुजापाशीं होता. त्याच्या हस्तें सदाशिवरावाला त्यानें लिहून पाठविलें कीं गोविंदपंतानें इटावे प्रांतांत नजीबखानाला येऊं दिलें नसतें व त्या प्रांतांतील ठाणीं कायम राखून ठेविलीं असतीं म्हणजे अर्थात् नजीबखान इकडे आलाहि नसता व आपल्याला त्यांना भेटणेंहि जरूर न पडतें (लेखांक २०५).