Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
दत्ताजी अंतर्वेदींतून यमुनेच्या बाजूला परतल्याबरोबर सुजा नजीबखानाला सोडून आपल्या प्रांतांत निघून आला. आपला प्रांत सुरक्षित राहील किंवा नाही एवढींच काय ती सुजाउद्दौल्याला काळजी होती. तिचें निवारण झाल्याबरोबर सुजानें नजीबाला सोडून दिलें. नजीबाला सोडून सुजाला दोन अडीच महिने झाले नाहींत तोंच गोविंदपंताच्या द्वारें मराठ्यांचे सुजाशी बोलणें लागलें. ह्यावेळीं गोविंदपंताला सुजाशीं स्नेह दृढ व कायमचा करण्यास उत्तम संधी आली होती. नजीबखान व सुजाउद्दौला ह्यांच्यामध्यें गोविंदपंताचा प्रांत होता. तो जिंकून घेईतोंपर्यंत वेळ होता व स्पर्धा कोणाचीच नव्हती. तेवढ्या वेळांत गोड बोलून व जरब दाखवून सुजाला आपल्या बाजूला ओढून घेण्यास सदाशिवरावानें गोविंदपंताला हुकूम केला होता. तुमचा आमचा स्नेह पूर्वापारचा आहे, तुमच्या वडिलांवर आम्ही उपकार केले आहेत, तुमच्यावरहि सरदारांची व रघुनाथरावाची ममता आहे, चकत्याची पातशाही कायम ठेवून तुम्हाला वजीर करण्याची आमची इच्छा आहे, तुमच्यासारख्या मातब्बर माणसाखेरीज चकत्याच्या पातशाहीचा बंदोबंस्त होऊन येणार नाहीं (लेखांक १७३ व टीप २६१), नजीबखान मात्रागमनी आहे व तो तुम्हांला थापा देऊन अबदालीकडे नेऊन फसवील, पैशाकरितां अबदाली तुमची इज्जत घेईल व मग तुम्हीं पस्ताव्यांत पडाल, चकत्याच्या पातशाहींत अबदालीचा हात पडणें इष्ट नाहीं, हिंदुस्थानच्या पातशाहीची व्यवस्था लावण्यास हिंदुस्थानांत तुम्हाला व आम्हांलाच तेवढा अधिकार व हक्क आहे, तुम्ही अबदालीला मिळाला तर आमचें जन्माचें वैर संपादाल, तुम्ही आमचेकडे आल्यास अबदालीला जिंकल्यावर तुम्हाला बराच प्रांत व मुख्य वजिरी देऊं, न आल्यास तुमचें सर्वस्वी नुकसान होईल, वगैरे गरमनरम गोष्टी बोलून व वाटतील त्या योग्य सवलती देण्याचें कबूल करून सुजाला आपल्या बाजूला कसें तरी करून ओढून घ्यावें म्हणून सदाशिवरावाचें आग्रहपूर्वक सांगणें होतें. सुजाच्या मनांत मराठ्यांना मिळावयाचें नसल्यास, निदान त्यानें अबदालीला तरी मिळूं नये एवढें तरी काम करावेंच करावें म्हणून सदाशिवरावाची गोविंदपंताला इशारत होती. सुजाउद्दौल्याला मराठ्यांच्या बाजूला ओढण्यांत फारच फायदा होता. सुजाउद्दौल्याचा प्रांत रोहिल्यांच्या प्रांताला लागून असल्यामुळें सुजाच्या प्रांतांतून अबदालीला दाणावैरणहि पोंहोचली नसती व सुजाकडून अबदालीला पैशाची मदतहि झाली नसती. शिवाय, सुजाउद्दोल्यासारखा मातब्बर मुसुलमान सरदार अबदालीला मिळाला नसता म्हणजे अहमदखान बंगष, हाफीज रहिमतखान वगैरे लहान सहान संस्थानिकहि अबदालीला चिकटून राहिले नसते. सुजाउद्दोल्यासारखा मातब्बर मुसुलमान मराठ्यांच्या बाजूला आणिला म्हणजे हिंदुस्थानांतील सर्व मुसुलमानांना मराठ्यांविषयीं विश्वास उत्पन्न होऊन त्यांचीहि मदत मराठ्यांना झाली असती. असे मोठमोठे फायदे सुजाच्या स्नेहापासून मराठ्यांना होण्यासारखे होते; व ह्याच कारणांकरितां गोविंदपंताला सदाशिवरावभाऊनें शेंकडों वेळां ह्यासंबंधी लिहिलें. गोविंदपंताचा सुजाशीं कित्येंक वर्षांचा स्नेह होता.