Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
अबदालीवर चालून जाण्याचा हा पहिला बूट होता. अबदालीचें काही सैन्य पूर्वेस अनुपशहराकडे होते व काहीं सैन्य नजीबखान व जहानखान याच्याबरोबर सुजाउद्दौल्याकडे बिठुरास गेले होतें; तेव्हा अबदाली व नजीबखान प्रत्येकी भाऊपेक्षां बलाने कमी होता हें स्पष्ट होतें; तेव्हा ह्या वेळी अकस्मात् मध्यें उतरून अबदालीचे पारपत्य करण्याचा जो भाऊनें बूट काढिला होता तो सर्वोत्कृष्ट होता यात संशय नाहीं. हा बूट सिद्धीस नेण्याकरितां सदाशिवरावानें तीन हजार जाट व मानाजी पायगुडे वगैरे सरकारी पथकें यमुनेच्या पलीकडे पाठवून सकुराबादेस मराठ्यांचे ठाणे बसविले. इतक्यात सुजाउद्दौला व नजीबखान हे अबदालीकडे अनुप शहरास जात आहेत असें कळलें. खरें म्हटले असतां गोविंदपंतानें ह्या दोघांना मध्येच वाटेंत अडवून ठेववयाचें, परंतु, गोविंदपंताच्या ह्यावेळच्या सर्व हालचाली हयगयीच्या, चुकारपणाच्या व दिरंगाईच्या होत्या. त्याने सुजाउद्दौल्याला सुरक्षितपणें जाऊन दिलें इतकेंच नव्हे, तर यमुनेच्या दक्षिणतीराला नावा जमवून ठेवावयाच्या त्याहि वेळेवर जमविल्या नाहींत. १२ जुलैला सरदार, जाट व सदाशिवराव भाऊ आग्र्याला आले त्यावेळी यमुना उतरून पलीकडे अंदर्वेदींत जातां येणें अशक्य आहे अशी त्यांची खात्री झाली. सुजाउद्दौला व नजीबखान जे निसटून गेले ते थेट अबदालीला शिकंदन्या-यास जाऊन भेटले. गोविंदपंताच्या हयगयीमुळें व गैदीपणामुळें सदाशिवरावभाऊच्या हातची ही पहिली शिकार गेली. भाऊच्या मनात स्वदेश पाठीशीं घालून अबदालीला यमुनेंत रेटून बुडवावयाचे होते, परंतु ते ह्यावेळी साधलें नाहीं.
सुजाउद्दौल्याशीं राजकारण न करण्यांत व नजीबखानाला न अडविण्यात गोविंदपंताचे वर्तन फारच गैरफायद्याचे झालें. गोविंदपंताचें इतर बाबीसंबंधानेंहि वर्तन असेंच तोट्याचें होतें. पंचवीस लाख रुपयाचा भरणा, स्वारी हिंदुस्थानांत आली म्हणजे ताबडतोब करण्याबद्दल गोविंदपंताला सदाशिवरावाने पडदुराहून लिहिले होते. परंतु, तेहि काम त्याने अद्यापपर्यंत बजाविले नाहीं. गारा पडून देशाची धूळधाण झाली, यवनांच्या येण्यामुळें रयत लावणींसंचणी करीत नाहीं; बुंदेलखंडातील व अंतर्वेदींतील संस्थानिक बंडे करून पैसा देत नाहींत वगैरे सबबी सागून सदाशिवरावाला वाटेस लावण्याचा त्याचा इरादा होता. खरें म्हटले असता, बुंदेलखंडांत व गोविंदपंताच्या ताब्यांतील अंतर्वेदींतील कडाकुरा वगैरे प्रांतांत यवनाचा काहींच दंगा नव्हता (लेखांक २३९). अद्यापपर्यत संस्थानिकांनींहि फारशीं कोठें बंडें केलीं नव्हतीं. रतनसा हिंदुपति ह्यांनीं बंडे केली, त्यांना गोविंदपंताचीच फूस होती (लेखांक २१६). सारांश, गोविंदपंताच्या ह्या सबबींत कांहींच तथ्य नव्हतें. यदाकदाचित् दैवी, मानवी आपत्तींनीं गोविंदपंताच्या प्रांताचे उत्पन्न बुडालें होतें, अशी कल्पना केली, तत्रापि मातब्बर मामलतदार म्हणून गोविंदपंताची पत फार मोठी होती. त्यानें आजपर्यंत पैसाहि चांगला कमविला होता व हिंदुस्थानांत सरकारस्वारी आल्यास पैशाची होईल तितकी मदत करूं वगैरे आश्वासनें त्यानें पेशव्यांना १७५७ त दिलीं होती.