Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१८७] ।। श्री ।। १५ मे १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः-
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. रामगड जाटाचा घेऊन पुढें अंतर्वेदींत अंमल करणार ह्मणों तर मजलदरमजल आह्मी सिरोजेस आलों. याउपरि ग्वालेरीवरून ढवळपुराचे सुमारें येतों. राजेरजवाडे यांस पत्रें गेलीं आहेत. बुंधेल्यांस गेलींच. तेहि जमा होतील. मातबर फौज व तोफखाना गाडदी व दोन्ही फौजा सरदारांच्या व जाट इतके येथें गाडून उभे राहून चालून घेऊन तेव्हां अबदाल्लीच्यानें दम धरून उभे राहणें तोफाचे माराखालीं बार येणें कळतच आहे ! सुज्याअतदौला सर्व प्रकारें स्वामीची फत्ते इच्छितात ह्मणोन लिहिलें, तर हेंच त्यास योग्य आहे. त्यांचा आमचा स्नेह तसाच आहे ! आह्मीं जवळ आलियावरी ते येऊन सामील होणार. त्यांस हें करणें उचित आहे. सरदारांनीं वकील त्यांजकडे त्यांची निशा व्हावी ह्मणोन पाठविले आहेत. त्यास, तेहि पोहोचले असतील. तुह्मांसहि विस्तारें लेहिणें तें लिहिलें असे. याउपरि त्यांणीं उलग न राहतां, एकपक्षीं होऊन मोठें काम हें करावें:-चकत्याची पातशा कायम करावी. हेंच आह्मांस त्यास योग आहे. याउपरि जलदी करणें हेंच लायक आ(हे). माधवसिंगाचा दंगियाचा वगैरे सर्व प्रकार कळला. त्यास हा प्रकार खराच. परंतु इतकेंहि सोडून निखालस होऊन येतात. असें जाहल्यास मागील रफेदफे करून त्यासहि भेटीस बोलवावें हेंच केलें असे. येतात न येतात हेंहि कळेल. परंतु त्यास अबदालीचा भरंवसा पु (र) त नाहीं. इकडे नीट वर्तत नाहीं. याउपरि सर्व समजून नीट जाहलें तर बरेंच आहे. फार करून होतीलच. अंतर्वेदींतील अम्मल जबरदस्तीनें राखिला तसाच राखावा. आमचे येणियाची आवाई तेथें गेलियानें ते घाबरे होऊन आपला देश जवळ करावयाची तजवीज करीत असतील. त्यास, याची बातमी बारीक बारीक तुमची डाक बसली असे तिकडून वरचेवरी आणून लेहून पाठविणें. + सुजादौलाविसी दुसरा प्रकार न होई इतकेंच करणें. हेंच जरूर आहे. सुजादौला पुरते आपले होऊन कुमकेस यावें. काम जालियावर त्याचे हातें मोठें काम घेऊं. मळमळीत असले तरी घरींच राहावें. तिकडे न जावें. हें तरी व्हावें. आबदलीचे लष्करांत तुमची बातमी गेलीच आहे. चहूंकडील बारीक खबर राखून लिहिणें. हिंदूपात वगैरे बुंदेले व कांही प्यादे व ऐवज खर्चास हरतरतूद करून जरूर पाठवणें. आम्ही सुरोंजेहून नरवरावरून जातों. पुढील सरदारांचे लिहिलेप्रमाणें ढवलपूर अगर कुरोली ग्वालेरकडून जाऊं. अहिरांनीं लबाडी केली. वाट चालत नाहीं. आम्ही पुढें गेलों. आतां नरवराकडेहि नीट वाटेनें पत्रें येत जाईसें करणें. बंगालियाकडील खबर राखोन लिहीत जाणें. बुंदेलेयाचें सामान आपला कोणी प्यादा देऊन सत्वर येईसें करणें. तुह्मीं ठाणीं, मुलूख, काईम राखणें. दुवाबानें अबदाली माघारा चालला तर तुह्मीं त्या मार्गेंच मागें येणें. खातरजमा बंदोबस्ताची असेल तरी फौजसुद्धा तुह्मीं चमेलकाठीं येणें. हे विनंति.
पै ॥ मित्ती ज्येष्ठ शु॥ ८.