Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
ह्याच पत्रांत त्यानें आणखी असेंहि कळविलें कीं, जर गोविंदपंत इटावें प्रांतांत पुन्हां अंमल बसवील तर आपण फौजेसुद्धां त्याच्या साहाय्याला येऊं व नंतर गोविंदपंतासह जहानखान व नजीबखान यांजवर चाल करून जाऊं. परंतु गोविंदपंताच्या हातून हें पुन्हां अंमल बसविण्याचें काम त्यावेळीं झालें नाहीं. त्यानें सदाशिवरावभाऊला आपल्या मदतीला सैन्य पाठवून देण्याची विनंति केली; परंतु गोविंदपंताच्या मदतीला सैन्य पाठविण्याची ह्यावेळीं भाऊची सोय नव्हती. तो व गोविंदपंताचा प्रांत यांजमध्यें दोन पूर आलेल्या नद्या वहात होत्या. शिवाय सरदारांना भेटून त्यांची सल्ला घेतल्यावांचून सैन्याची फोडाफोड करावी हेंहि त्याला योग्य वाटेना. ह्याजवर गोविंदपंतानें असें लिहून पाठविलें कीं, आपण जवळ आल्याखेरीज सुजाउद्दौल्याला मराठ्यांना येऊन मिळण्याचें धैर्य होत नाही; तेव्हां आपण जलद आग्र्याजवळ येऊन पोहोंचावें; म्हणजे दहशत पडून जहानखान व नजीबखान इटाव्या प्रांतांतून परत अबदलीकडे जातील व सुजाउद्दौला एकटाच राहून आपल्याला येऊन सामील होईल. हें म्हणणे पसंत पडून सदशिवराव बहुत जलदी करून गंभीर नदीच्या तीरीं येऊन पोहोंचला. तेथें त्याला अशी बातमी कळलीं कीं नजीबखानाच्या उपदेशावरून सुजाउद्दौला अबदालीकडे जाणार व मराठ्यांना येऊन मिळण्याचा त्याचा विचार नाहीं. तेव्हा त्याने असा बेत केला की सरदार, जाट व आपण आग्र्याला जाऊन यमुना उतरून नजीबखान व अबदाली ह्यांच्यामध्यें उतरावे व दोघांचेहि निरनिराळ्या दिशेने पारपत्य करावे. अबदली ह्यावेळी अनुपशहरी होता. नजीबखान व सुजाउद्दौला बिठूरास होते व गोविंदपंत त्या दोघांच्यामध्यें इटाव्याजवळ होता. अबदालीजवळ तीस हजार फौज, नजीबखान व सुजाउद्दौला ह्यांजवळ वीस हजार फौज व गोविंदपंताजवळ सरासरी आठ हजार फौज होती. आग्र्याजवळ यमुना उतरून पश्चिमेकडून गोविंदपंताला मिळता घेऊन प्रथम नजीबखान, जहानखान व सुजाउद्दौला ह्यांचें पारपत्य करावे व नंतर अबदालीची खोड मोडावी असा भाऊचा बेत होता. ह्याकरिता त्याने गोविंदपंताला आपल्या प्रांतांतील सर्व नावा यमुनेच्या दक्षिणीतीरीं सुरक्षित आणून जमवून ठेवावयाला सांगितलें व आपण गंभीर नदी उतरून सरदारांना ६ जुलैला त्यांनीं सांगितलें त्या रस्त्यानें जाऊन मिळाला. सुजाउद्दौला नजीबखानाच्या उपदेशावरून अबदालीला खास जाऊन मिळणार अशी बातमी तेथे सदाशिवरावाला कळली तेव्हां रामाजी अंनत व नारो शंकर ह्यांना पूर्वी सुजाउद्दौल्याकडे भाऊने पाठविले होतें त्यांना त्यांने अर्ध्याच रस्त्यावरून परत बोलाविलें व यमुना उतरून अंतर्वेदींत शिरण्याचा बेत तडीस नेण्याचा प्रयत्न केला.