Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

अंतर्वेदींतील रोहिले सरदार व सुजाउद्दौला ह्यांच्याशी तो चांगला स्नेह ठेवून असे. काशीकडे कोणी सरदार अगर विद्वान् ब्राह्मण जावयाचा असला म्हणजे त्याला गोविंदपंताच्या साहाय्याची जरूर पडे व गोविंदपंत ते मोठ्या उत्सुकतेनें देई. सारांश, क-हाडे लोकांचे ठायीं सर्वत्र साखर पेरून आपलें हित करून घेण्याचा जो एक मोहक गुण आहे तो गोविंदपंताचे अंगीं अमूप होता. गोविंदपंताचें हें बाह्य स्वरूप झाले. गोविंदपंताचे अंतःस्वरूप फारच निराळे होतें. मख्त्याच्या कमाविशीं करून त्यानें सरकारचा नफा करून दाखविला होता खरा; परंतु, मख्त्याची कमाविस जाऊन गोविंदपंताला जेव्हा बुंदेलखंड व अंतर्वेद ह्या प्रांताची बिनमख्त्यांची म्हणजे प्रांताचें जें कसोशीनें रास्त उत्पन्न येईल त्याचा भरणा सरकारांत करावयाचा व नोकरी केल्याबद्दल अमूक एक वेतन घ्यावयाचें अशा त-हेची कमावीस करण्याची पाळी आली, तेव्हां गोविंदपंताला मख्त्याच्या वेळेस खरोंखर उत्पन्न केवढें मोठें येत असे व तो सरकारात मख्ता किती कमी देत असे हें पेशव्यांना कळून आलें (लेखांक २४२). त्यावेळीं १७५७ त गोविंदपंताबरोबर गोविंदपंताच्या प्रांतांतील उत्पन्नाची चवकशी करण्याकरितां व त्यांचे मागील हिशेब तपासण्याकरिता पेशव्यांनी येरंडे व कानिटकर हे दरखदार पाठवून दिले. चवकशी करण्याच्या कामीं गोविंदपंत व त्याचे मुत्सद्दी ह्यानीं दरखदारांना आणवतील तिकडे अडथळे आणिलें. जमीदारांची व त्यांची भेट होऊं दिली नाहीं; कुळें व मामलतदार ह्यांच्यामध्ये कसर काय निघते तें त्यांना दाखविलें नाहीं व जमाबंदीचे खर्डे व हिशेब त्यांच्या दृष्टीस पडूं दिले नाहींत. यद्यपि गोविंदपंतानें दरखदारांना धाब्यावर बसविण्याची इतकी मेहनत केली तत्रापि पुण्याच्या फडांत सदाशिवरावभाऊ व रामचंद्रबाबा शेणवई ह्यांच्या हातांखालीं कामें केलेल्या ह्या कारकुनांना गोविंदपंताची सर्व बिंगे कळून आलीं. प्रांतांची जमा कमी करून कशी दाखवितात; वाईट महाल सरकारांत कसे ठेवितात; अंतस्थ नजराणे कसे घेतात व फौजेचा खर्च वाढवून कसा दाखवितात वगैरे बिंगें त्यांनीं सरकारांत कळविली. हीं बिंगें पुण्यांत १७५७ तच सदाशिवरावभाऊला कळून चुकलीं होतीं. १७५७ त गोविंदपंताची बुंदेलखंडात रवानगी करतांना त्याला सदाशिवरावभाऊनें उत्पन्नाचे नवीन अजमास व बेहेडे करून दिले (लेखांक २३७ शेवट). त्यांत गोविंदपंताच्या प्रांतांतून जास्ती जमा किती व्हावी ह्याचा ठोकळ अजमास होता. गोविंदपंताच्या प्रांतांत जाऊन ह्या अजमासाप्रमाणें जमेचा व खर्चाचा बारीक तपशील लावण्याकरितां सदाशिवरावभाऊनें येरंडे व कानिटकर यांना पाठविलें. त्यांची व्यवस्था गोविंदपंतानें कशी केली तें वर सांगितलेंच आहे. दरखदार येऊन कमाविशीनें मामलतीची सुरुवात झाल्यापासून गोविंदपंतानें निराळेच वर्तन आरंभिलें. १७५७ त पुण्याहून निघतांना प्रांतांची व्यवस्था उत्तम ठेवितों म्हणून पेशव्यांना त्यानें ज्या लांब लांब गोष्टीं सांगितल्या होत्या त्या सर्व एकीकडे ठेवून तो प्रांतांचें कमी उत्पन्न करून दाखविण्याच्या खटपटीस लागला (लेखांक २३९).