Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
१७५४ व १७५५ त मल्हारराव, जयाप्पा व रघुनाथराव कुंभेर, नागोर, दिल्ली, रोहिलखंड ह्या प्रदेशांत अंमल बसविण्यांत गुंतले होतें, त्यामुळें त्यावर्षी लाहोरकडे त्यांना दृष्टि फेकतां आली नाहीं. पुढे १७५७ त अबदाली थेट दिल्लीपर्यंत चालून येऊन त्यानें आग्रा, मथुरा वगैरे शहरे लुटलीं. त्याचा हेतु दक्षिणेंतहि चालून येण्याचा होता (लेखांक ६५ व ६३). परंतु, ती निवळ गप्प होती. बाळाजी बाजीराव रघुनाथरावाला अबदालीवर १७५७ च्या जानेवारींत पाठवून देऊन आपण स्वतः श्रीरंगपट्टणास गेला. “अबदालीचीं गडबड दिवसेंदिवस अधिक ऐकत असता आपला मुलुख खालीं टाकून आपण श्रीरंगपट्टणास गेला” हे योग्य केलें नाहीं म्हणून लेखांक ६५ त शहानवाजखान बाळाजी बाजीरावास दोष देतो. ह्यावरून एवढें मात्र स्पष्ट दिसतें की बाळाजी बाजीराव अबदालीची फारसी तमा धरीत नव्हता. रघुनाथरावाचेंहि अबदालीविषयीं असेंच मत होतें. लवकरच त्याचें पारपत्य करितों म्हणून १७५७ त रघुनाथरावानें वारंवार उद्गार काढिले आहेत (लेखांक ५४, ६६, ६७, ७१). परंतु रघुनाथराव दिल्लीस जाऊन पोहोंचण्यापूर्वीच म्हणजे १७५७ च्या जुलैपूर्वी म्हणजे १७५७ च्या एप्रिलांत अबदाली अफगाणिस्तानास परत गेल्यामुळें दादांची व अबदालीची गांठ पडली नाहीं. अबदाली १७५७ च्या सप्टेंबरांत दिल्लीस होता म्हणून कीन वगैरे मंडळी म्हणतात तें निराधार आहे, हे १५३ व्या टिपेंत मीं सप्रमाण दाखवून दिलें आहे. १७५७ च्या जुलैंत रघुनाथरावदादा दिल्लीस गेले व रोहिलखंड, दिल्ली, रजपुताना वगैरे प्रदेशांची व्यवस्था लावून १७५८ त त्यांनीं लाहोर प्रांत जिंकून घेतला. हा प्रांत जिंकण्याचा १७५० तच मराठ्यांचा विचार होता; परंतु अनेक अडथळे येऊन तें काम १७५८ त साधलें गेलें. हें काम १७५७ तच साधावयाचें; परंतु, मल्हारराव होळकरानें अनेक लचांडें काढून तें १७५८ पर्यंत होऊ दिलें नाहीं (लेखांक ६७). ह्याच वेळीं मल्हाररावानें नजीबखानाचें साधन करून ठेविलें (लेखांक ४८); त्यामुळें रघुनाथरावांच्या तडाख्यातून नजीब वाचला. नाहीं तर मराठ्यांच्या कुशींतील ही व्याद त्याच वेळीं नाहींशीं झाली असती. आपण दिल्लीस असें तोपर्यंत अबदाली परत न आल्यास, सुजाउद्दौल्याचे काशी, प्रयाग वगैरे प्रांत घेऊन मुबलक पैसा उगविण्याचाहि रघुनाथरावाचा विचार होता (लेखांक ७१). परंतु लाहोरवर स्वारी केल्यामुळें रघुनाथरावांच्या हातून हा विचार पार पडला नाहीं. काशी व कांहीं खंडणी देण्याचीं गोड अभिवचने देऊन सुजाउद्दौल्यानें रघुनाथरावाला देशीं लावून दिलें (का. पत्रें, यादीं ३७३, ३८७). १७५७ व १७५८ तल्या स्वारींत बाळाजी बाजीरावाने रघुनाथरावाला खालील कामें नेमून दिलीं होतीं. (१) रजपुतान्यांतील संस्थानिकांची व्यवस्था लावावयाची. (२) दिल्लीच्या पातशहाची व्यवस्था लावावयाची. (३) अबदालींचें पारपत्य करावयाचें. (४) रोहिलखंडातील रोहिल्यांची व्यवस्था लावावयाची. (५) काशी, प्रयाग, बंगाला वगैरे प्रांतावर पूर्वेकडे स्वारी करून मातब्बर पैका मेळवावयाचा. (६) सरकारी मुलुखांतील मामलतदारांची चौकशी करावयाची. (७) दामोदर महादेव, बापूजी महादेव, लक्ष्मण शंकर, गोविंदपंत बुंदेले, नारो शंकर, अंताजी माणकेश्वर वगैरे मंडळी पैशाची अफरातफर करितात त्यांची तगीरी बहाली करावयाची. (८) नखीबखानाला नाहींसा करावयाचा व (९) जिंकलेल्या प्रदेशांतून पैसा मिळवून पुढें मोहिम करावयाचीं ह्या कामांपैकी कांहीं कामे रघुनाथरावानें अर्धीमुर्धी केलीं व कांहीं मुळींच करावयाची सोडलीं.