Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

“मी येथें गुंतलों नसतों तर सर्व जमीदार तुम्हास भेटते; कामकाज सर्व सुतीं लागतें; तें न जालें; याजकरितां तुम्हासहि वाईट लागलें; तुमचें मनीं संशय आला; (कां कीं) दोन वर्षे झालीं, कांहींच परगण्याचें अवसान न सांपडें; हेंहि खरेंच! तुम्हांस तरी काय शब्द!” तेव्हा “जर तुम्हांस आमचें बरें करणें तर तुम्हीं देशास प्रस्तुत न जाणें” कारण “श्रीमंत स्वामींची मर्जी एक प्रकारची जाली” ही असली खुशामत करून गोविंदपंतानें येरंड्याला १७६० च्या एप्रिलपर्यंत थोपवून धरिलें. पुढें खुद्द सदाशिवरावभाऊ हिंदुस्थानांत येऊ लागले तेव्हां येरंड्यांना गोविंदपंताविरुद्ध गा-हाणीं सांगण्यास दक्षिणेंत जाण्याची जरूरच पडली नाहीं १७६० च्या एप्रिलपासून १७६१ च्या जानेवारीपर्यंत सदाशिवरावभाऊ हिंदुस्थानात होते, त्या अवधीत येरंड्याप्रमाणेंच सदाशिवरावभाऊलाहि गोविंदपंतानें असेंच फसविले ह्यासंबंधानें लेखांक २०१, २११, २१६, २१७ अ, २२४, २२७, २२९, २३०, २३७, २३९, २४२, २५७, २५९ हीं पत्रे अवश्य वाचण्याची शिफारस मी वाचकास करितों. त्यावरून गोविंदपंताच्या नीचपणाची इयत्ता वाचकांना स्वतःच ठरविता येईल. बायाबापड्यांना (लेखांक ६०), देवाब्राह्मणांना (लेखांक १९३) व खुद्द स्वतःच्या धन्याला (लेखांक २६८) हि फसविण्याला व बुचाडण्याला ह्या मनुष्यानें कमीं केलें नाहीं सारांशा, पैशाची अफरातफर करून गोविंदपंतानें पेशव्यांची गैरमर्जी संपादिलीं व प्रत्याघातन्यायानें तो त्याचा द्वेष करूं लागला.

येणेंप्रमाणें हिंदुस्थानांत मल्हारराव होळकर, गोविंदपंत बुंदेले वगैरे सरदार-मामलतदारांच्या उद्योगाचा वृत्तांत १७६० पर्यंत आणून पोहोंचविला आहे. पुढील कलमांत पानिपतच्या मोहिमेचें अत्यंत संक्षिप्त वर्णन देऊन त्यांत ह्या गृहस्थांनीं व विशेषतः गोविंदपंत बुंदेल्यानें काय काय दुष्कृत्यें केलीं त्याचे दिग्दर्शन करितों.

(क) १७४८ त अबदालीनें हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली. त्या स्वारींत यद्यपि तो दिल्लीपर्यंत आला नाहीं व त्याचा सरहिंदास मीरमनू व सफदरजंग यानीं पराभव केला, तत्रापि, त्यांच्या सर्वनाशक शक्तीचा त्यांना चांगलाच अनुभव येऊन चुकला. अबदालीपुढे टिकाव धरण्याचें सामर्थ्य हिंदुस्थानात दिल्लीचा पातशाहा किंवा त्याचे अमीर ह्यांच्यात बिलकूल राहिलें नव्हतें. तेव्हा दक्षिणेतील सरदार मल्हारराव होळकर व जयाप्पा शिंदे ह्यांच्या हातून अबदालीचें पारपत्य झाल्यास पहावें या हेतूने सफदरजंगानें ह्या दोघा सरदारांशी अबदालीला तंबी देण्याबद्दल करार केला. त्यांत लाहोर, मुलतान, रोहिलखंड व रजपुताना ह्या चार मुलुखांची चौथ त्यानें मराठ्यांना देण्याचें कबूल केलें; अशा अटीवर की त्यांनीं अबदाली, रोहिले, रजपूत व सिंध प्रदेशांतील अमीर ह्यांना तंबी द्यावी व दिल्लीच्या पातशहाचें परचक्रापासून व राज्यांतील अमीरांपासून संरक्षण करावें. ह्या कराराच्या अन्वयें मराठ्यांनीं १७५१ त रोहिल्यांशीं लढाई केली. मराठे रोहिल्यांशीं लढाई करीत असतां अबदाली १७५१ च्या जानेवारींत पंजाबांत आला व त्यानें मुलतान व लाहोर हे दोन प्रांत काबीज केले. १७५२ त हे प्रांत मराठ्यांनीं अबदालीपासून हिसकावून घ्यावयाचे; परंतु त्या सालीं शिदेंहोळकरांना गाजुद्दिनाला घेऊन दक्षिणेत यावें लागल्यामुळे ते काम त्यावेळीं त्यांना करितां आले नाहीं.