Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

६६. समाजचरित्र, समाजशास्र व समाजतत्त्वज्ञान यांच्यावर यद्यपि एकहि सर्वमान्य ग्रंथ मराठींत नाहीं; तत्रापि तो सिद्ध होण्याला लागणारी पूर्वव्यवस्था, मात्र गेल्या चाळीस वर्षांत सुरू झाली आहे. किर्तने, चिपळूनकर, साने, खरे वगैरे लोकांनी इतिहासाचीं साधनें प्रसिध्द करण्याची जी परंपरा घातली ती अद्यापि चालू आहे आणि अशी उमेद आहे कीं, ती परंपरा कित्येक शतकें अशीच चालू राहील आर्यांचे चरित्र दहाहजार वर्षांपलीकडचें आहे. अर्थात्, त्याचें संशोधन शतकेंच्याशतकें चालूं राहील, हें स्पष्ट आहे. माणूस दमेल; परंतु संशोध्य विषय संपावयाला दीर्घ अवधि लागेल, अर्थात् संशोधनाची अपेक्षाहि दीर्घ कालपर्यंत राहील.

६७. इतिहासाच्या उपांगांपैकीं पौराणिक म्हणून जो भाग आहे, त्यावर भाऊ दाजी, भगवानलाल इंद्राजी, राजेंद्रलाल मित्र, डॉ. भांडारकर. रा. रा. देवदत्त रामकृष्ण भांडारकर, तेलंग, मंडलीक, प्रो. पाठक व लोकमान्य टिळक यांनीं आंग्लोइंडियन व यूरोपीयन विद्वानांच्या अनुषंगानें किंचित् व्यासंग गेल्या ऐशी वर्षांत केला आहे. परंतु हा सर्व व्यासंग परभाषाद्वारा झालेला आहे. पुराणेतिहासाचीं साधनें व त्याच्यावर टीका अद्यापि मराठींत प्रसिद्ध होऊं लागल्या नाहींत. ग्रंथमालेच्या द्वारां कांही सटीक मराठी शिलालेख व ताम्रपट मीं मराठींतून प्रसिध्द करण्याचा उपक्रम केला आहे.

६८. स्थापत्य, कायदा, राज्ययंत्र, समाजयंत्र, धर्म, आचार, रूढी, कालगणन, कुलशास्त्र, अखिलमानवसमाजचरित्र, समाजशास्त्र, ऐतिहासिक तत्त्वज्ञान, तत्त्वेतिहास, संस्थेतिहास, वगैरे इतिहासाच्या अंगांवर एकहि ग्रंथ मराठींत नाहीं. अर्थशास्त्र, विनिमय, नीतिशास्त्र, आंकडेशास्त्र, वगैरे उपांगांवरहि मराठींत ग्रंथरचना नाहीं. पद्धतीकर देखील एकहि ग्रंथ नाहीं. सारांश, सर्वत्र नकाराचा पाडा वाचण्याचा प्रसंग आहे. इंग्रज सरकारनें स्थापिलेल्या विश्वविद्यालयांतील विद्वतेची खरी किंमत काय तें ह्या नकाराच्या पाड्यावरून यथास्थित कळून येण्यासारखें आहे. ही शोचनीय स्थिति होतां होईल तों लवकर बदलली पाहिजे अन्यथा तात्त्विक स्थिति जाऊन, शास्त्रीय स्थितीचें राज्य महाराष्ट्रावर होण्यास अमर्याद विलंब लागेल, व अखंड गुलामगिरींत कुचंबणें अपरिहार्य होईल.