Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

६९. प्रस्तावनेच्या प्रारंभीं केलेल्या प्रतिज्ञेंतील तीन्ही प्रकरणांचा संक्षिप्त विचार हा असा आहे. समाजचरित्राच्या हकीकतीचा म्हणजे इतिहासाचा उपयोग काय तें ह्या विचारावरून कळण्यासारखें आहे. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तेव्हां समाजाच्या धडपडीचा इतिहास कळून घेण्याची इच्छा त्याचेठायीं स्वाभाविक आहे. विष्णुशास्री चिपळोणकर म्हणतात त्याप्रमाणें उच्च प्रतीची करमणूक हाच केवळ इतिहासाचा उपयोग नाहीं. स्वसमाजाचें सबीज व सकारण चरित्र कळलें असतां, सामाजिक गुणदोष दृष्ट्युत्पत्तीस यतात आणि दोषांचा त्याग व गुणांचा परिपोष करण्याकडे प्रवृत्ति होते. दोषत्याग व गुणपरिपोष हा इतिहासज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. परसमाजांचे चरित्र कळलें असतां, त्याच्यापासूनहि गुणदोषविवेचनद्वारां बोध घेतां येतो. उदाहरणार्थ, शक १२०० पासून १७७९ पर्यंतचें महाराष्ट्रसमाजचरित्र पाहिलें व तदाश्रयभूत कारणांचा शोध केला म्हणजे असें कळून येतें कीं, हीं ५७९ वर्षे महाराष्ट्रसमाज तात्त्विक स्थितींत आहे आणि त्याची गांठ परस्वापहरण करणा-या पाश्चात्यांशी पडली आहे संन्यासप्रवण व समाजद्वेष्ट्या तात्त्विक स्थितींत राष्ट्रीभवन व शत्रुनिर्दलन अशक्य होतें. ह्या दोन गोष्टी साधण्यास प्रपंचप्रवण व समाजसाधक अशा रामदासी तत्त्वज्ञानाचा उपयोग फार होतो. परंतु, शास्त्रीय स्थितींत असलेल्या शत्रूंचे उच्चाटन करण्यास स्वतःचा समाज शास्त्रीय स्थितीप्रत नेला पाहिजे. असे अनेक बीजभूत सिद्धान्त समाजचरित्र, समाजशास्त्र व समाजतत्त्वज्ञान यांच्यापासून होत असतें. समाजचरित्राचीं बीजें कळलीं नाहींत, म्हणजे समाजहित साधण्याची बुद्धि असूनहि समाजहित साधतां येत नाहीं. उघडच आहे, रोगस्थान कळल्याशिवाय औषधोपचार कोठें करावयाचा व शक्तिस्थान कळल्याशिवाय तिची वृद्धि कोठून व्हावयाची? इतिहासज्ञानापासून हा एकच फायदा एवढा मोठा आहे कीं तत्प्रीत्यर्थ देशहितकर्त्यांनीं वाटेल ती घस सोसण्यास तयार व्हावें. समाजचरित्राचीं मुख्य सुत्रें तद्वष्टक व्यक्तींच्या मनोरचनेंत आहेत. ही मनोरचना कळली असतां, सामाजिक शरीरावर विवक्षित कार्य घडवून आणण्याची शक्यता विशेष असते. उदाहरणार्थ, पैशाला खोट न पडतां, इतर कोणताहि अपमान सहन करावा, अशी वाणी लोकांची मनोरचना आहे. अशा वणिक् समाजाला हातीं धरण्यास, त्यांच्या द्रव्याचा अपहार करण्याची किंवा न करण्याची ताकद आपल्या जवळ आहे, हे कार्यकर्त्या मुत्सद्यानें त्यांच्या निदर्शनास आणून दिलें म्हणजे कार्यभाग होण्यासारखा आहे. दुस-याच्या भानगडींत न पडतां व विकतश्राद्धें न घेतां, आपला संसार आपण करून स्वस्थ असावें, अशी सध्यांच्या तात्त्विक हिंदूंची संन्यस्त मनोरचना आहे. ही मनोरचना लक्ष्यांत घेऊन, शेजारचें घर, शेजारची इस्टेट, शेजारचें संस्थान किंवा शेजारची बायको लुटण्याची जर कोणा मतलबी व शिरजोर पुरुषाला इच्छा झाली, तर त्यानें लुटल्या जाणा-या इसमाच्या शेजा-याला त्रास न देण्याची हमी घ्यावी म्हणजे त्याचें काम बिनबोभाट व यथासांग उरकेल तात्त्विक हिंदूंची ही संन्यस्त मनोरचना यूरोपीयन लोकांनीं उत्तमोत्तम पारखली आहे. किंबहुना, ब्रिटिशसरकारच्या राज्यकर्तृत्तवाची सर्व मदार ह्या एका पारखीवर आहे. हिंदूंची ही संन्यस्त मनोरचना हिंदुसमाजाच्या सर्व जातींतून, वर्गांतून व पेशांतून दिसून येते.