Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

७२. प्रो. विजापूरकरांनीं जे पांच खंड छापून काढिले त्यांना सरासरी २१०० रुपये खर्च पडला आहे आणि वासुदेवराव जोशांनीं चवथा खंड छापला त्याला ३०० रुपये लागले असावे. पूर्वीचे ३६०० व हे २४०० मिळून आजपर्यंत ५००० रुपये माझे व लोकांचे खर्चून सुमारें ३२०० पृष्ठें ऐतिहासिक मजकूर प्रसिद्ध झाला आहे. शिवाय महाराष्ट्रसारस्वत मासिकपुस्तकद्वारां दासोपंत नामक कवींची ५०० पृष्ठें वाईस प्रसिद्ध केलीं. त्या मासिकाला केवळ ५०/६० च वर्गणीदार मिळाल्याकारणानें, तें बंद करावें लागलें. ह्याखेरीज सुमारें साठ सत्तर ऐतिहासिक मुद्यांवर सुमारें ७०० अष्टपत्री पृष्ठें मीं ऐतिहासिक निबंधांत विवेचन केलें आहे. सारांश, इतिहासाचीं साधनें, सारस्वताचीं साधनें, व ऐतिहासिक टीका ह्या तीन रूपांनीं ५००० रुपयांत ४४०० पृष्ठें नवीन मजकूर शोधून व विवेचून मीं प्रसिद्ध केला आहे. ह्या स्तुत्य उठाठेवींत १५०० रुपये कर्ज म्हणजे नुकसान झालेलें आहे.

७३. हें एवढेंसें काम करावयाला जर १५०० रुपये कर्ज झालें, तर शंभरपट काम अद्याप व्हावयाचें आहे, त्याला सुमारें दीड लाख रुपये कर्ज होईल व पांच लाख रुपये खर्च लागेल, असा साधा हिशोब दिसतो. कारण, सध्यां मजजवळ हजार बाराशें अप्रसिद्ध ग्रंथ व सुमारें ४०/५० हजार महत्त्वाचीं ऐतिहासिक पत्रें जमा झालीं आहेत. त्यांपैकीं बराच भाग प्रसिद्ध होणे अगत्याचें आहे. इतिहाससाधनभूत अस्सल लेख देशांतील सर्व लोक वाचीत नाहींत, इतकेंच नव्हे तर कटाकटी तीन चारशें लोक त्यांच्यावर विहंगमदृष्टि फिरवितात व फार झालें तर, इतिहासाचा सूक्ष्म अभ्यास करणारे वीस पंचवीस लोक त्यांचा आस्थेनें परामर्ष घेतात, अशी ज्याअर्थी वस्तुस्थिति आहे, त्याअर्थी पांचपन्नास हजार पत्रें छापण्याच्या खटाटोपांत न पडून आपल्याला व आपल्या भिडेच्या स्नेह्यांना व्यर्थ नागवून घेऊं नये, अशी कित्येक गृहस्थांची सल्ला आहे. परंतु, ती व्यापक विचार करून दिलेली नसून, केवळ एकदेशी आहे, असें मला वाटतें. तात्त्विक हवेच्या संन्यासप्रवण व मांद्योत्पादक दाबाखालीं चिरडून गेल्यामुळें, प्रपंचाची म्हणजे इतिहासाची हेळसांड करण्याकडे लोकांचा आत्मघाती जो कल आहे, तो घालविण्यासाठीं इतिहासज्ञानप्रसाराची व तत्साधनप्रसिद्धीची आवश्यकता सध्यां विशेषच आहे, असें माझें ठाम मत आहे. काल, देश व कुल ह्या त्रिविध दृष्टीनें भारतवर्षाच्या व महाराष्ट्राच्या नानाविध चरित्राचा अफाट विस्तार पहातां, आजपर्यंत प्रसिध्द झालेलीं साधनें जलाशयांतून एखाद्या बेडकानें मोठ्या प्रयासानें आपल्या क्षुद्र ओंजळींत वाहून आणलेल्या बिंदूप्रमाणें आहेत; त्या बिंदुमात्रानें संन्यासप्रवणतेचीं मलिन पटलें धुवून जाणार कशी? हें मालिन्य साफ नाहीसें करावयाला जलाशयांतून शेकडों मोठमोठे पाट फोडून संन्यासप्रवणतेवर सतत सोडून दिले पाहिजेत. रूपक सोडून देऊन, स्पष्टार्थानें इतिहाससाधनप्रसिद्धीची मर्यादा सांगितली असतां, बराच गैरसमज दूर होईल, असें वाटतें. भारतवर्ष व महाराष्ट्र यांच्या दहा हजार वर्षांच्या चरित्रांतील इतक्या लाखों बाबीं संशोधून व विवेचून सिद्ध झाल्या पाहिजेत कीं, त्यांच्यापासून कार्यकारणरूपी सामान्य नियमांचा पत्ता लागून आर्यसमाजशास्त्र व आर्यसमाजतत्त्वज्ञान निर्माण करणें संभाव्य होईल. ही संभाव्यता शक्यतेच्या कक्षेंत येईतोंपर्यंत लाखों साधनांचें प्रकाशन, विवेचन व संशोधन झालें पाहिजे. भारतवर्षांच्या वर्तमानक्षणापर्यंतच्या गतकालीन चरित्राची सूक्ष्म व व्यापक परीक्षा करण्याचा हा दीर्घ उद्योग नेटानें, धिमेपणानें व एकनिष्ठेनें किंत्येक वर्षें लाखों रुपये खर्चून शेकडों तज्ञ्ज्ञानी तडीस नेण्यास झटलें पाहिजे. ह्याचा अर्थं असा कीं, ज्या भावी कालापर्यंत भारतवर्षांतील आर्यसमाजाचें चरित्र चालूं राहील, तोंपर्यंत हांहि उद्योग चालूच राहील. हा भावी काल सामान्यत: अनंत समजण्यास कोणतीच हरकत नाही ! वाटल्यास अनंताच्याऐवजी अमर्याद शब्द वापरावा म्हणजे नेमस्त व शास्त्रीय भाषा वापरल्यासारखें होईल.