Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

रानड्यांनीं महाराष्ट्रसमाजचरित्राच्या नवीन शेकडों बाबी संशोधून काढिल्या अंशांतला प्रकार नाहीं ज्या बाबी ग्रांटडफादि मंडळीनें व मराठी बखरकारांनीं चुकल्यामाकल्या नमूद करून ठेविल्या होत्या, त्यांना संतचरित्रांतील स्थूल बाबींचा जोड देऊन, रानड्यांनीं मनांत शिवपूर्वकालीन व शिवकालीन समाजचरित्राचा पट तयार केला आणि यूरोपीयन इतिहासाच्या विस्तृत व व्यापक वाचनानें सुचलेल्या सामान्य कारणांच्या धोरणानें त्या बाबींना आधारभूत कांहीं नियमित कारणपरंपरा असावीं असा सिद्धान्त बसविला. ग्रांट डफ मराठ्यांच्या समाजचरित्राला कांहीं नियम नाहीं असें जें म्हणत असे तें रानड्यांनीं ब-याच अंशाने खोडून काढिले. रानड्यांचा इतिहास प्रसिद्ध होण्यापूर्वी मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांच्या पहिल्या खंडांत इसवी सन १७५० पासून १७६० पर्यंतच्या महाराष्ट्रसमाजाच्या चरित्रसंबंधानें मीहि असाच सिद्धान्त नमूद केलेला आहे. ह्या सामान्य सिद्धान्ताच्या पलीकडे जाऊन विशेष कारणांचे कथन करण्याच्या कामीं रानड्यांच्या इतिहासांत बरींच भ्रामक विधानें नमूदलीं गेलीं आहेत. संतांची परीक्षा रानड्यांना यथास्थित करतां आली नाहीं, हें मी वारंवार सिद्ध करीत आलों आहे. महाराष्ट्रधर्माची व्याख्याहि त्यांना नीट बसवितां आली नाहीं. शिवाजीच्या अष्टप्रधानात्मक राज्यपद्धतीसंबंधानेंहि त्यांचीं विधानें धरसोडीचीं झालेलीं आहेत. समाजचरित्राचें जितकें सूक्ष्म पृथक्करण केलें पाहिजे तितकें न केल्यामुळें, त्यांच्या सिद्धान्तरचनेंत हे दोष राहिले आहेत, हें उघड आहे. तत्रापि मराठ्यांच्या समाजचरित्राला अव्याहत कारणपरंपरा आहे, हा सिद्धान्त त्यांच्या ग्रंथानें कायमचा प्रस्थापित केला आहे, ह्यांत संशय नाहीं.” मराठ्यांच्या इतिहासांतील काही टिपणे” हा तेलंगांचा निबंधहि समाजशास्राच्या तयारीचा पूर्वसूचक आहे. नांवाजण्यासारखे हे दोन लेख--रानड्यांचा इतिहास व तेलंगाचीं टिपणें--गेल्या बेचाळीस वर्षांत इतिहासावर महाराष्ट्रांत आले आहेत. सटरफटर चरित्रे अधिकारी लेखकांनीं लिहिलेलीं पांचपन्नास झालेली आहेत. परंतु, त्यांत नांवजण्यासारखें एकहि नाहीं. शक १७३९पासून १७७९पर्यंत इतिहासग्रंथ मुळींच झाला नव्हता, त्यापेक्षां १७७९पासून १८२२ च्या काळांत इतिहासलेखनांत रानड्यांच्या व तेलंगांच्या उद्योगानें थोडी तरी प्रगति झाली आहे, हें मात्र नाकबूल करतां यावयाचें नाहीं. ऐतिहासिक तत्त्वज्ञानावर किंवा समाजशास्त्रावर स्वतंत्र असा ग्रंथ महाराष्ट्रांत अद्यापि झालेला नाहीं. महाराष्ट्रसमाजाचें चरित्रहि अद्यापि एकहि निर्माण झालें नाहीं. परसमाजांचा स्वतत्र इतिहासहि मराठींत अजून एकहि नाहीं. गाइकवाडसरकारच्या आज्ञेनें कांहीं अल्पस्वल्पप्रमादक इंग्लिश इतिहासांची गचाळ भाषांतरें झालेलीं आहेत. परंतु तीं स्वतंत्र नसल्यामुळें जमेस धरण्यासारखीं नाहींत ऐतिहासिक नकाशांची इकडे अद्यापि कल्पनासुद्धां नाहीं. सारांश,रानड्यांचा स्थूल इतिहास व तेलगांचा चिमकुला निबंध याखेरीज इतिहासाच्या प्रांतांत गेल्या बेचाळीस वर्षांत स्वतंत्र व नांवाजण्यासारखें कांहीं एक झालेलें नाहीं. आणि दु:खाची गोष्ट कीं दोन्ही लेख इंग्रजींत आहेत.* लिहिणारे महाराष्ट्रांत जन्मले म्हणून त्यांची गणना येथें करावी लागली आहे.