Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
शास्त्रीय स्थितीचें आगमन संभाव्य होण्यास मुख्य कारण जी समाजाच्या नानाविध चरित्राची इत्यंभूत हकीकत तिची साधनें प्रसिद्ध होण्यास नुकता कोठें आरंभ झाला आहे. ही साधनें झालीं आहेत त्याहून शंभरपट प्रसिद्ध झाल्यावांचून व त्यांची विवेचक दृष्टीनें छाप झाल्यावांचून इतिहासाची व समाजशास्राची निर्मिती होणें शक्य नाही १७८० पासून १८२२ पर्यंतच्या बेचाळीस वर्षात इतिहास, समाजशास्त्र किंवा ऐतिहासिक तत्त्वज्ञान यांवर नांव घेण्यासारखा एकहि ग्रंथ मराठींत किंवा महाराष्ट्रांत निर्माण झाला नाहीं. लक्ष्मणराव चिपळोणकर व रा. रा. गोविंदराव सरदेसाई यांनी शिवकालीन इतिहास लिहिले आहेत; परंतु स्वतंत्र साधनांच्या अभावामुळें, ते नाना प्रकारांनीं व्यंग आहेत. शिवाय, ह्या दोघांहि लेखकांनीं लिहावयाला घेतलेल्या कालाचे मर्म जसें जाणावें तसें जाणलें नाहीं. चिपळोणकरांनीं केवळ डफच्या बखरीचा मराठींत उतारा केला आहे; व डफ जे मराठ्याचे दोष काढतो ते गुण भासविण्याचा अभिमानी प्रयत्न केला आहे. सरदेसायांनीं ब्राह्मणांना व पेशव्यांना निराधार नांवें ठेवण्याचा प्रयत्न करून, ज्याची खाल्ली पोळी त्याची टाळी वाजविण्याचा अप्रस्तुत उद्योग केलेला आहे. तत्कालीन समाजस्थितीचें पृथक्करण दोघांतून एकानेंहि केलेलें नाही. समाजयंत्राच्या किल्ल्या सूक्ष्म पृथक्करण व व्यापक संशोधन केल्याविना सांपडत नाहींत, व त्या जर सांपडल्या नाहींत तर तत्कालीन समाजचरित्राचा संगतवार व सबीज पट यथाभूत चितारतां येत नाहीं, महाराष्ट्र सारस्वताची व ग्रंथकाराचीं जी त्रोटक माहिती सरदेसायांनीं दिली आहे ती अपूर्ण, चुकलेली व असंबद्ध आहे; आणि मुसुलमानांच्या पूर्वीची जी हकीकत दिली आहे, तींत तत्कालीन राज्ययंत्र, समाजयंत्र, व्यापारयंत्र वगैरेची माहिती व बीजें देण्याचा कलहि दाखविलेला नाहीं. डॉ. भांडारकरांच्या दख्खनच्या टिपणवजा निबंधावरून कांहीं राजांच्या यादी देण्यापलीकडे ह्या इतिहासांत जास्त कांही एक दिलें नाहीं. तत्कालीन धर्मग्रंथ, जैनग्रंथ, वेदान्तग्रंथ, काव्यग्रंथ पाहून तत्कालीन समाजाचें चरित्र बरेंच लिहितां येण्याजोगें आहे. हाच धरसोडीचा प्रकार मुसुलमानांच्या अमदानीसंबंधानें व शिवाजीच्या रियासतीसंबंधानें झालेला आहे. यद्यपि स्वतंत्र साधनें अद्यापि प्रसिद्ध व्हावयाचीं आहेत, तत्रापि इतर जी अनुषंगिक शेकडों साधनें मुसुलमानांच्या व शिवाजीच्या कालासंबंधानें उपलब्ध आहेत, त्यांचा यथास्थित परामर्श घेतला असतां, सध्यांदेखील तत्कालीन समाजचरित्र व त्याची कार्यकारणपरंपरा समाधानक त-हेनें सजवितां येण्यासारखी आहे. परंतु, इतका खटाटोप करण्यास दहावीस वर्षे एकनिष्ठपणाने सतत खपले पाहिजे. हे परिश्रम न केल्यामुळें, सरदेसायांची मराठी रियासत शास्त्रीय दृष्ट्या फारशी उपयोगाची नाहीं. सरदेसायांच्यापेक्षां रानड्यांनीं इंग्रजींत रचिलेला शिवाजीचा इतिहास अधिक योग्यतेचा आहे. कारण, त्यांत शिवकालीन समाजाची पूर्वकारणपरंपरा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजाच्या चरित्रांतील शेकडों बाबी प्रामाणिकपणें देणें कोणाहि मेहनती विद्वानाला शक्य आहे परंतु, शेकडों बाबी सामान्य नियमांच्या म्हणजे कारणांच्या सूत्रांत गोवून सुसंगत पद्धतीनें वाचकांपुढे मांडण्यास व्यापक बुद्धि व उच अधिकार लागतात.