Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
इतकेंच कीं कोणत्यातरी एका स्थितीचा एकाकालीं विशेष वर्चष्मा असतो. त्याप्रमाणें ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत तात्त्विक ऊर्फ तत्त्वज्ञानात्मक स्थितीचा पगडा महाराष्ट्रावर बेसुमार बसलेला होता. त्यामुळें शास्रीय ज्ञानाचा मुख्य आधारस्तंभ जो इतिहास त्याचा उदय ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंतच्या काळांत झाला नाहीं. ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या, असें मत उराशीं बाळगणारें जें तत्त्वज्ञान त्याला जगत् जो संसार अथवा प्रपंच अथवा समाज त्याचें चरित्र जाणून घेण्यांत कोणता फायदा आहे? परब्रह्माची, विठोबाची प्राप्ति करून घेण्यांत ज्यांनीं तनु, मन व धन अर्पण केलें, त्यांना संसाराची व समाजाची वास्तपुस्त करण्याला सवडच राहणें अशक्य आहे. ज्ञानेश्वरापांसून तुकारामापर्यंतचें तत्त्वज्ञान हें असें इतिहासाला म्हणजे समाजाला म्हणजे प्रपंचाला सोडून होतें. अर्थात्, ऐतिहासिक तत्त्वज्ञानाचा म्हणजे प्रपंच व परमार्थ ह्यांच्या एकवाक्यतेचा उदय त्या कालीं होणें अशक्य होतें. तो उदय रामदासांच्या हस्तें झाला. धार्मिक, तात्त्विक, भक्तिमार्गी, वगैरे सर्व लोकांच्या मंडळ्या करून, म्हणजे त्यांना लोकसंग्रहाच्या यंत्रांत घालून, राज्ययंत्राचीं निर्मिति करावी आणि धर्म, तत्त्वज्ञान व प्रपंच यांचें रक्षण करावें, असें समर्थांचे तत्त्वज्ञान होतें. प्रपंच साधूनच परमार्थाचा लाभ होतो, हा उपदेश समर्थ पदोपदीं करीत आहेत. ह्या उपदेशाचा परिणाम त्या कालीं राष्ट्रीभवनांत झाला. परंतु पन्नास पाऊणशें वर्षे लोटत आहेत नाहींत, तों पुन: धार्मिक व तात्त्विक विचारांनीं महाराष्ट्रांत उचल खाल्ली. रामदासकालीं धर्म व तत्त्वज्ञान ह्यांचा लोप फारसा झालेला नव्हता. फक्त त्यांचा पगडा इतिहास, शास्त्र, प्रपंच, समाज व राष्ट्र यांच्या पगड्याच्या मानानें बराच कमती झालेला होता. तो पुन: कालान्तरानें वरचढ झाला. पुन: प्रपंच व समाज. ह्यांच्यापासून लोकदृष्टि परावृत्त झाली आणि “दों दिवसांची तनु हे साची,” असलें तत्त्वज्ञान लावण्यांतूनहि फडकूं लागलें. ज्ञानेश्र्वरापासून तुकारामापर्यंत तत्त्वज्ञानाला दारिद्रयामुळें सौम्य व कंगाल नीतीची संगति होती. शक १६८० पासून १७३९ पर्यंत कदाचित् शक १७७९ पर्यंत तत्त्वज्ञानाला संपत्ति, विलास, व तज्जन्य आलस्य ह्यांची जोड मिळाली. ही जोड मिळाली असतां शास्त्रीय स्थितींत असणा-या परम व्यवहारज्ञ अशा पाश्चात्य शत्रूंशी तत्त्वज्ञानी, विलासी व शिथिल अशा मराठ्यांची गांठ पडली. सारांश, शक १२३९ पासून १७७९ पर्यंत ऐतिहासिक तत्वज्ञानाचा ऊहापोह करणारा रामदासाखेरजि दुसरा तत्त्वज्ञ महाराष्ट्रांत झाला नाहीं. इतर जे शेंकडों साधुसंत झाले ते प्रपंचाचे म्हणजे इतिहासाचे द्वेष्टे आणि नामरूपातीत किंवा नामरूपांकित परब्रह्माचे एकदेशी भक्त होते. प्रपंचाला शून्य समजून परब्रह्माच्या पाठीमागें लागलेल्या तत्त्वज्ञांच्या व वारक-यांच्या पंथांचा आणि प्रपंच व परमार्थ ह्यांची योग्य किंमत करून एकवाक्यता करणा-या रामदासाचा व रामदासीयांचा विरोध असलेला जगत्प्रसिध्द आहे. बाकी, समाजाला सोडून, विस्खलित, पंगू व असमर्थ बनलेल्या ह्या तत्त्वज्ञांना, साधूंना व त्यांच्या वारकरी अनुयायांना मुसुलमानांच्या जुलमांतून समर्थानीं व रामदासाभिमान्यांनींच सोडविलेलें आहे.