Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

६४. अशी स्थिति शक १७७९ पर्यंत होती. तिचा अंत शक १७७९ व १७८० तील ज्वालामुखीसदृश धडपडीनें झाला. ही धडपड संन्यस्त, तत्त्वज्ञानी व अविचारी हिंदु-मुसलमान पुढारी यांनी बंगाल्यांतील शिपायांच्या साहाय्यानें केली. काल्पनिक तत्त्वज्ञानाचा व सुयंत्रित शास्त्राचा हा झगडा होता. पहिल्याचे पुरस्कर्ते जुने हिंदुमुसलमान पुढारी होते व दुस-याचे पाश्चात्य लोक होते. त्यांत सुयंत्रित शास्राचा विजय झाला. ही धडपड चालली असतां हिंदुस्थानांतील, पंजाबांतील, व कर्नाटकांतील राजेरजवाडे, महाजन, व सामान्य लोक साशंक वृत्तीनें कांहीं काल तटस्थ राहून, शेवटीं विजयी पक्षाला मिळाले. हलक्या, कुलहीन, व उपटसुंभ अशा लहानमोठ्या शिक्षित व अल्पशिक्षित पांढरपेशा परराज्यसेवकांचा जो नवीन वर्ग बनला, किंवा, खरें म्हटलें असतां, बनविला होता, तो विजयी होणा-या व झालेल्या सुयंत्रपक्षाकडेच प्रथमपासून होता. त्यांच्या शिक्षणांत स्वराष्ट्रे, स्वसमाज, वगैरे शब्दच नव्हते. बंगाल, रजपुताना व महाराष्ट्र ह्या तीन प्रांतांतील तत्कालीन कित्येक बडे नोकरलोक असें सांगतात कीं, शक १७७९ तील ह्या प्रचंड धडपडीचा अर्थच कळण्याची आपली ताकद नव्हती; मग स्वपक्ष किंवा परपक्ष घेण्याची किवा टाकण्याची बाब दूरच राहिली ! जुन्याच्या अभिमानाने व स्मरणानें येणारा सहज त्वेषहि ह्या कुलहीन, राष्ट्रहीन, व समाजहीन लोकांच्या ठायीं नव्हता. भाऊ दाजी, विनायकराव वासुदवेजी, नाना मोरोजी, दादोबा पांडुरंग, कृष्णशास्त्री चिपळोणकर, केरो लक्ष्मण छत्रे, ईश्वरचंद्र विद्यासागर, दिनकरराव रानडे, सालारजंग, टी. माधवराव, विश्वनाथ नारायण मंडलीक, विश्राम रामजी घोले, वगैरे कारकुनी पेशाची राष्ट्रहीन आंग्लशिक्षित शेकडो मंडळी ह्याच युगांतील होत. तरुण दादाभाई नौरोजी ह्या राष्ट्रीय आणीबाणीच्या प्रसंगी लंडनांत स्वदेशीयाकरितां नोक-या मागण्याच्या अर्जदारीत गुंतले होते. असल्या मंडळीला स्वदेश, स्वसमाज, व स्वेतिहास ह्यांची मातबरी काय होय! स्वदेशाच्या इतिहासाचा नांव घेण्यासारखा एकहि ग्रंथ ह्या चाळीस वर्षांत झाला नाहीं मॉरिस्कृत स्वेतिहासाची निंदा व डफ् कृत स्वेतिहासविकृति ह्या कालांत सर्वत्र मान्य झालेली होती !

६५. शक १७८० पासून १८२२ पर्यंतचा जो दुसरा भाग त्यांत शास्रीय स्थितीच्या ओनाम्याला किंचित् प्रारंभ झाल्यासारखा दिसत आहे. परंतु अद्यापहि तात्त्विक स्थिति निःशेष संपली, असें निखालस म्हणतां येत नाहीं. अदृश्य व अचिंत्य शक्ति आणून देण्याच्या थापा मारणा-या थियासोफीकडे अद्यापि पुष्कळ समंजस लोकांचा ओढा आहे. समाजाला सोडणा-या संन्यासस्थितीकडे व जगन्मिथ्यात्व प्रतिपादणा-या एकदेशी तत्त्वज्ञानाकडे अद्यापि ब-याच लोकांचें मन धांवते. तत्रापि शास्त्रीय स्थितीची छाप समाजावर आस्ते आस्ते बसत चालली आहे. ह्यांत बिलकुल संदेह नाहीं. अन्वयव्यतिरेकोत्पन्न अनुनयन व निर्णयन पद्धतींच्या जोरावर सद्य:कालीन समाजचरित्रावर निर्भीड टीका होऊं लागल्याचीं स्पष्ट चिन्हें दिसत आहेत. सद्यस्क चळवळीवर चिपळोणकरांच्या निभींड टीका आणि सामाजिक, धार्मिक व राजकीय विषयांवर रानड्यांचे निबंध शास्रीय स्थितीच्या आगमनाचे द्योतक आहेत. परंतु. टीका जितक्या खोल, विस्तृत, सूक्ष्म व व्यापक असावयास पाहिजेत तितक्या अद्यापि होऊं लागल्या नाहींत. अद्यापि सर्वच प्रकार स्थूल व स्फुट असाच आहे. आणि असाच प्रकार असणें प्रथमप्रारंभीं शक्य आहे.