Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

शिपाईलोकांचा वर्ग घ्या. हिंदु शिपायांच्या तात्त्विक धर्माच्या आड आलें नाहीं, म्हणजे ज्याचें मीठ तो पोटाला खाईल त्याची चाकरी तो कुत्र्याप्रमाणें एकनिष्ठपणें करील, इतकेंच नव्हे तर, प्रत्यक्ष सोदर भावावरहि शस्त्र उपसावयाला मागेंपुढें पहाणार नाहीं. मात्र, त्याची भाकर त्याला बिनबोभाट मिळाली पाहिजे. हिंदू कारकून वाटेल त्या पाश्चात्याची - मग तो फ्रेंच असो, फिरंगी असो, इंग्रज असो, किंवा मोंगल असो - खर्डेघासी व कारभारीपणा करील, प्रसंगी स्वजनाच्या विरुद्धहि वागेल, फक्त त्याची ओलीकोरडी भाकर व तात्त्विक धर्म हीं दोन त्याला बिनबोभाट मिळाली पाहिजेत. हिंदू वाणी वाटेल त्या देशांत - आफ्रिका, अरबस्तान, चीन, जपान, यूरोप - जाऊन व हिंदुस्थानांत राहून वाटेल त्या परदेशस्थाची दलाली व मुकदमी करील, मात्र त्याचा धर्म व त्याचा नफा त्याला बिनबोभाट मिळाला पाहिजे. हीच कथा हिंदू भिक्षुक, हिंदू सटरफटर लेखक, हिंदू शेतकरी, वगैरे सर्व लोकांची आहे. तात्त्विक धर्माच्या आड आलें नाहीं, म्हणजे हिंदूंच्या संन्यस्त मनोरचनेचा वाटेल त्या मतलबी लोकांनीं फायदा घ्यावा. मनोरचना संन्यासप्रवण असल्यामुळें, स्वजातीयांच्या सुखदु:खाशीं समानशील होऊन एकोप्यानें समाजकार्यं, शिपाईगिरी, मुत्सद्दीपणा, व्यापारधंदा किंवा शेती करुन, उरकण्याची बुध्दी सद्यस्क हिंदूंना होत नाहीं व पोटाची खळी भरण्याकरितां -संन्यासप्रवण झाला तरी ती कशीतरी भरलीच पाहिजे - दुस-याची गुलामगिरी पत्करणें प्राप्त होतें. तेव्हां देशभक्त व कार्यकर्त्या मुत्सद्यांनीं हिंदूलोकांची ही तात्त्विक संन्यासप्रवण मनोरचना बदलण्याचा दीर्घोद्योग केला पाहिजे, अशी सल्ला इतिहासाचा समाजमनोरचनात्मक जो भाग आहे तो सांगतो. मनोरचनेचें दुसरें एक उदाहरण घेतों. इंग्रज लोकांचा हिंदुस्थानांतील स्वभाव दीर्घद्वेषी, खुनशी, संशयी, द्रव्यलोभी व सत्यापलापी आहे, असें त्यांच्या हिंदुस्थानांतील गेल्या तीनशे वर्षांच्या चरित्रावरून दिसून येतें. Honi sua que mali panes अशी त्यांची प्रतिज्ञाच आहे. तेव्हां, त्यांच्या समाजावर जर कोणास कांहीं कार्य घडवून आणावयाचें असेल, तर त्यानें आपली इच्छा ह्या स्वभावाला स्पर्श न होईल अशा बेतानें तडीस नेली पाहिजे किंवा विरोधभक्तीनें त्याला चिडवून सामर्थ्य असल्यास चेपीत व चापीत गेलें पाहिजे. सारांश, समाजरचनात्मक जो इतिहासाचा भाग त्याच्या परिशीलनापासून कार्यकर्त्या मुत्सद्यांना फार फायदा करून घेतां येण्याजोगा आहे. समाजचरित्राच्या निरनिराळ्या इतर भागांच्या परिशीलनापासूनहि असेच महत्त्वाचे फायदे आहेत. उद्योगी, विचारवंत व महत्त्वाकांक्षी राजे जेव्हां कमिशनें नेमतात, रिपोर्ट मागवितात, सद्य:स्थिति दोन दोन चार चार वर्षांनीं जोखून पहातात, लोकसंख्या मोजतात, सांपत्तिक स्थिति अजमावतात, ग्रंथकर्तृत्व परीक्षून पहातात, तेव्हां ते एकप्रकारें समाजाचें चरित्र ऊर्फ इतिहासच तयार करून मनन करीत असतात. अशा हेतूनें कीं अंमलाखालील समाजांवर व पोटसमाजांवर व समाजांतील चळवळ्या व्यक्तींवर इष्ट कार्य घडवून आणण्याचीं साधनें माहीत असावीं. स्वपरसमाजचरित्राच्या सूक्ष्म व व्यापक परिशीलनापासून असे बहुमोल फायदे आहेत. त्यांची प्राप्ति करून घेण्याकरितां, नानात-हेच्या स्वपरेतिहाससाधनांच्या शोधास, संग्रहास, रक्षणास व प्रसिद्धीस कोण कार्यकर्ता योग्य सहाय्य केल्यावांचून राहील?