Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
२४. येणेंप्रमाणें अनेक प्रकारचे पूर्वग्रह टाकून, समाजाचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. झाडून सर्व पूर्वग्रह टाकून देणें मनुष्यस्वभावाला तर निसर्गत:च अशक्य आहे. जो ज्या संस्कृतींत वाढला असतो त्या संस्कृतीनें त्याचें मन बनलें असतें, आणि अमुक विचार, विकार, किंवा संस्था इष्ट व अमुक अनिष्ट, हा भेद तो त्या बनावाच्या अनुरोधानें करीत असतो. एखादा नीग्रो ज्या दृष्टीनें जगाकडे पाहील, तीहून निराळ्या दृष्टीनें एखादा यूरोपीयन मनुष्य जगाच्या इतिहासाचा विचार करील, हें उघड आहे. हिंदूंचा व मुसुलमानांचा इतिहासाचा अंदाज भिन्न ठरेल, हेंहि स्पष्टच आहे. सारांश, प्रत्येक समाजाची, कालाची, व व्यक्तीची जगाच्या इतिहासाकडे पहाण्याची त-हा एकसारखी असूं शकत नाहीं, ह्या भिन्न दृष्टीचा परिणाम असा होतो कीं, एका काळीं व एका समाजाला जीं विधानें सिद्धान्तवत् भासतात, तींच दुस-या काळीं व दुस-या समाजाच्या अश्रद्धचे विषय होतात. ह्या विरोधाचें कारण असें आहे कीं, विकार व विचार यांनीं खळबळून जाणा-या व्यक्तींशीं व समाजांशीं मानवइतिहासाला कर्तव्य असतें. ज्या निर्विकार दृष्टीनें दगडाकडे किंवा वनस्पतीकडे मनुष्य पाहूं शकतो तिचा उपयोग मनुष्यसमाजावर करतां येत नाहीं. कारण, निर्विकार दृष्टीचा उपयोग करूं पहाणारी व्यति स्वत: विकारवश असते व ज्या समाजावर दृष्टीचा प्रयोग करावयाचा ते समाजहि विकारवश असतात. ज्यांतील दोन्हीं पदें चल आहेत असें हे समीकरण सोडविणें, अर्थातच फार दुर्घट आहे. स्वतःचे विकार अजिबात दाबून, समाजाच्या विकारांचें व विचारांचें वर्णन व परीक्षण ताटस्थ्यानें करणारा इतिहासकार कधीं जन्मेल तो जन्मो. असा इतिहास लिहिणारा कोणी सिद्ध झालाच तर त्याला लौकिकरीत्या पहिली अडचण अशी पडेल कीं, विकारांचे व विचारांचें अधमोत्तमत्व ठरवावयाला स्थिर मान कोणतें घ्यावें? उदाहरणार्थ, जगांतील प्राचीन व अर्वाचीन स्त्रीजातीचा इतिहास द्यावयाचा आहे, अशी कल्पना करा. एकाच नव-याला जन्मभर धरून रहाणा-या, दररोज नवा नवरा करणा-या, दुबळ्या नव-याला सोडणा-या, सबळ नवरा मेल्यावर दुसरा करणा-या, मुळींच नवरा न करणा-या, एकाच किंवा अनेक नव-यांशीं सपत्नीकत्वानें नांदणा-या, आणि अनेक नव-यांची एकच बायको होणा-या, अशा नाना प्रकारच्या स्त्रीयांच्या समाजांत नैतिक समाज कोणता व भ्रष्ट समाज कोणता, हें निश्चयानें ठरविणें दुरापास्त आहे. ब्राह्मणांत आजन्मैकपतित्वाची चाल आहे, इंग्रजांत पुनर्विवाहाची चाल आहे, मोर्मोन लोकांत अनेकपत्नीत्चाची चाल आहे, व मलबारांत इच्छापतित्वाची चाल आहे, आणि हे सर्व समाज सुधारलेले आहेत. तटस्थ्यवृत्तीनें ह्या चालींचें परीक्षण करूं जातां, अमुक चाल नैतिक व अमुक अनैतिक हें ठरविण्यास स्थिर मान कोणतें घ्यावयाचें? व्यक्तिस्वातंत्र्याचे कैवारी इच्छापतित्वाची चाल पसंत करतील, असें म्हणावें तर व्यक्तिस्वातंत्र्याचे कट्टे पुरस्कर्ते जे आधुनिक युरोपीयन लोक त्यांना ती बिलकुल आवडत नाहीं. आजन्मैकपतित्चाची चाल शास्त्रसिद्ध आहे, असें प्रख्यात पाझिटिव्हिस्ट ऑगस्ट कोंटे म्हणतो, तर ब्राह्मणांतील कांहीं सुधारकांना ती चाल मोडून इंग्रजांची पुनर्विवाहाची चालपत्करावीशी वाटते. इंग्रजांना एकाच वेळीं एकच बायको करणें सशास्त्र वाटतें, तर त्यांचेंच बंधू जे मोर्मोन लोक ते अनेकपत्नीत्वाचे कट्टे भक्त झालेले दिसतात. सारांश, अमुक एक चाल उत्तम, असें निश्चयानें विधान कण्याची कांहीं सोयच राहिली नाहीं. हाच अनिश्चय राज्यसंस्था, धर्मसंस्था, विद्यासंस्था वगैरे संबंधानें असाच कायम आहे.