Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१४९] श्री. ३ सप्टेंबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे. सरकारचा पैका देणें, जाबसालाचा फैसला करणें, असेंच खचीत यांचे मनांत आहे तर तशीच चाल धरतील. जर मनापासून करावयाचे नाहीं तर कालहरण करून समाधान राखावें असें बोलतील. नादाखालें आपले येथील बंदोबस्त करितील. आह्मांस मधाचें बोट लावून ठेवतील. आजचा प्रसंग पुढें गेला नंतर जाबसालाखालें टाकतील. सारांश जसा प्रसंग तशी वर्तणूक. तहनामेही सफाईचे पाहिजे तसे अद्याप नाहींत. प्रसंग पाहून त-हेत-हेनें पड घेऊन काल हरणाची चाल घालतील. एक जाबसाल लिहिण्यांत येऊन जाबसाल येण्यास थोडातरी एक महिना लागतो. याखालींच दिवसं जातील. सरकारचा जाबसाल लांबणीवर पडत जातो. याचा नेम स्वामीनीं काय मनांत आणिला? किंवा जाबसाल बोलतच जावा, यांनीं उत्तरें सांगावीं, तीं लिहीत असावीं, असें करतां करतां जें होईल तें होऊं, असाच बेत आहे कीं काय? याची आज्ञा झाली पाहिजे. कराराचे दिवसांत अंतर आलियावर कालहरण करणें हें सलाह दौलतीस नाहीं. जर मसलहतीनें असेंच ठरलें असल्यास चिंता नाही. मर्जीस आलियासी मला आज्ञा व्हावी. आजपर्यंत मी सरकारांत पत्रें पाठविलीं तीं पावलीं ह्मणोन राजश्री गोविंदराव भगवंत यांनीं लिहिलें. परंतु तुह्मी अमकें लिहिलें त्याचें उत्तर या प्रकारचें, याविशीं सरकारचें आज्ञापत्र अद्याप आलें नाहीं. याचें कारणही समजत नाहीं. सरकारचें पत्र कां येत नाहीं याविशीं मी बहुत चिंतेंत असतों. ह्मणोन विनंति लिहिली असे. र।। छ १८ सफर. हे विज्ञापना.