Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[८८] श्री. २३ जुलै १७९५.
विज्ञापना ऐसीजे. सरकारचा तहनामा नवाबास द्यावयाचा. त्यास, नवाबाकडील तहनाम्यांत अक्षरें नीट करावयाचीं तीं लिहून साफ करून दिलीं ह्मणजे सरकारचाही द्यावा, ऐसी आज्ञा होती. त्याजवरून हा मजकूर नवाबाशीं केला. सरकारचे तहनाम्याची नक्कलही दाखविली. त्याप्रमाणें नबाबानें आपला तहनामा दुरुस्ती करून द्यावा, त्याविषयीं नबाबाचा अनमान पाहिला. बोलूनही दाखविलें कीं, तहनामा दिलाचे खुषीनें व्हावा, त्याजपुढें राव पंतप्रधान यांच्या भेटी होतील त्यावेळेस तहनामा होईल. तो पक्का टाळा दिसला ह्मणोन सरकरचा तहनामा मीं नबाबास दिला नाहीं. तहनाम्याचे प्रकरणीं सरकारचीं पत्रें माझे जबानीवर हवाला घालून लिहिलीं होतीं तीं दिल्हीं. जबानी बयानही मी केला असतां मान्य न झालें. तसाच प्रकार राहिला. त्यास याजउपरी तहनाम्याविषयीं छेडणी करूं किंवा नको, अगर त्यांनीं आपलेकडूनच तहनाम्याची गोष्ट काढून साफ तुमचे तहनाम्याप्रमाणें करून देतों असें ह्मटल्यास त्याचा तहनामा घ्यावा, आपला द्यावा, किंवा कांहीं बहाणा काढून त्याजवरच शब्द ठेऊन टाळा द्यावा, याचें पुरतें मनन होऊन पत्रीं आज्ञा यावी. येथील प्रकार मायावी. प्रसंग पाहतील तसे करतील. दूरंदेषा नाहीं. सामर्थ्यही नाहीं. स्वामीची मात्र उपेक्षा आहे. स्वामीचे व नबाबाचे दरमियान डोईजड कारभारी मार्गानें बोलावयाजोगा आणि दोहीं दवलतींचें कल्याण इच्छिणार असल्याशिवाय बंदोबस्त खातरखा होत नाहीं. सरकारचें पत्र, कामें कराराप्रमाणें उगवतात किंवा नाहीं असें, नबाबास अथवा मला आजपर्यंत येत नाही. मी आपलेकडून निकड करावी तर, रघोत्तमराव नवाबास समजावतात कीं, मदारुलमहाम यांजकडून अथवा श्रीमंतांकडून कधीच निकड नाहीं, सर्व कृत्य गोविंदराव यांचें आहे, हजरतींनीं यांस भिऊं नये, कदाचित् हे उठोन गेले तर जावोत, गोविंदराव भगवंत यास साधून पक्कें केलें आहे, यांचें त्यांचें थोडेसें वांकडेंही आहे, हे गेलियावर गोविंदराव भगवंत यास हजरतींनीं बोलवावें, ह्मणजे सर्व कार्याचा बीत बसवून देतील. याप्रमाणें बोलण्यावर हजरत उड्या मारूं लागतात. सारांश स्थिरता नाहीं. हें वर्तमान आह्मांस कळावें, ह्मणजे गोविंदराव यांजविशीं मी संशय मनांत आणावा, आपल्यांत आह्मीं कळवंडत असावें, यांतच यांनीं आपलें साधन पाहत असावें. ह्या चाली आहेत. मध्यें वागणार त्यांच्या कुचेष्ठा ध्यानांत याव्या ह्मणोन थोडेसें लिहिलें आहे. सर्व ध्यानांत येऊन उत्तर स्वचित यावें. र॥ ६ मोहरम. हे विज्ञापना.
नबाबांनीं श्रीमंत खुदावंत न्यामत व मदारुलमहाम व गोविंदराव भगवंत यांस पत्रें लेहून दिली. अलिज्याहबहादुर यांचे प्रकरणीं पत्रें तीन सदरहू रवानगींत हीं पत्रें रवाना केलीं. छ. ६ मोहरम.
फारसी पत्र.
छ १६ मोहरम, मु॥ भागानगर टप्यावर.