Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

“Saints and prophets of Maharashtra” म्हणून जो ऐतिहासिक निबंध न्यायमूर्ती रानड्यांनीं लिहिला आहे, त्यांत “मराठा तेवढा मिळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा,” ह्या वाक्याचें भाषांतर, “Unite all who are Marathas together and propogate the Dharma (Religion) of Maharashtra,” असें दिलें आहे. धर्म ह्या शब्दाचा ‘आत्यंतिक दुःखध्वंसाचा मार्ग’ म्हणून जो चवथा अर्थ आहे, तो न्यायमूर्तीनीं स्वीकारिला आहे, व तो अर्थात् चुकलेला आहे. सतराव्या शतकाच्या शेवटल्या पादांत महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा उपदेश रामदासानें संभाजीला केला व त्यावेळीं महाराष्ट्रधर्म हा शब्द रामदासानें प्रथमच योजिला, असेंहि सुचविण्याचा न्यायमूर्तीचा कटाक्ष दिसतो. परंतु तोहि निराधार आहे. शके १५७१ त शिवाजीला रामदासानें जें पत्र पाठविलें आहे, त्यांत “महाराष्ट्रधर्म राहिला कांही, तुम्हांकरिता” म्हणून रामदासानें स्पष्ट म्हटलें असल्याकारणानें, महाराष्ट्रधर्म हा शब्द शके १५७१ तच रामदासानें बनविला असें म्हणावें लागतें. अर्थात् महाराष्ट्रधर्माचें नामकरण शके १६०३ त प्रथम झालें अशी गोष्ट नसून, तें चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे शके १५७१ तच झालें होतें. शिवाजीच्या वेळीं झालेल्या राज्यक्रांतीचें मूळ तत्कालीन धर्मसमजुतींत होतें, हें मला कबूल आहे. परंतु न्यायमूर्ती रानडे जी धर्मक्रांती म्हणतात, तिचा वाचक महाराष्ट्रधर्म हा शब्द नव्हता, हें मला मुख्यतः सांगावयाचें आहे. तसेंच शिवकालीन धर्मसमजुतीला न्यायमूर्ती धर्मक्रांती म्हणून संज्ञा देतात; परंतु तेंहि निराधार आहे. एका धर्माचा लोप होऊन दुसरा धर्म स्थापिला गेला असतां धर्मक्रांती होते; किंवा एकाच धर्मातील एकाच शाखेच्या दुष्ट मतांचा नाश करून दुस-या शाखेच्या मतांजी जी स्थापना होते, तिलाहि धर्मक्रांती म्हणून म्हणतां येईल. ह्या दोन्ही प्रकारच्या धर्मक्रातींपैकीं, एकींतहि शिवाजीच्या वेळच्या धर्मसमजुतींचा अंतर्भाव होत नाहीं. शिवकालीन धर्मसमजुतींचें स्वरूप न्यायमूर्ती म्हणतात त्याहून अगदींच निराळें होतें. हिंदुधर्म, सनातनधर्म, भक्तिमार्ग, उपासनामार्ग, ह्यांचा पंधराव्या शतकापेक्षां सतराव्या शतकांत मराठ्यांना अत्यंत उत्कट अभिमान उत्पन्न झाला, तो इतका उत्कट झाला की, हिंदुधर्माचा, सनातनधर्माचा, भक्तिमार्गाचा पूर्ण द्वेष्टा जो यवनांचा महमदीधर्म तो हाकून लावण्यास मराठ्यांना तिनें उद्युक्त केलें. सनातनधर्माच्या विरुद्ध भक्तिमार्गाचा उदय होऊन मराठ्यांच्या मनाचा कोतेपणा नाहींसा झाला व तेणेंकरून चोहोंबाजूनें स्वतंत्र होण्याची उत्कट इच्छा मराठ्यांच्या मनांत बाणली व मराठ्यांनीं स्वराज्य स्थापिलें, अशी कार्यपरंपरा न्यायमूर्तींनीं जोडिली आहे; परंतु ती मुळापासून अशास्त्र आहे असें मला वाटतें. ही कार्यपरंपरा अशास्त्र कशी आहे तें स्पष्टपणें सिद्ध करण्यास भक्तिमार्गाच्या उत्पत्तीचा व प्रगतीचा इतिहास सक्षेपानें सांगितला पाहिजे.

बौद्ध धर्माचें प्राबल्य उत्कट होऊन सर्व भारतवर्ष त्या धर्माच्या आवरणानें गुरफटून जात असतां, श्रीमच्छंकराचार्यांचा उदय होऊन सनातन धर्माची स्थापना इसवी सनाच्या सहाव्या, सातव्या व आठव्या शतकांत हिंदुस्थानाच्या व महाराष्ट्राच्या ब-याच भागांत झाली. ह्या तीन शतकांत भारतवर्षांतून बौद्ध धर्माचें निष्कासन यद्यपि बहुतेक झालें, तत्रापि बौद्ध धर्मासारखाच जो जैनधर्म तो गुजराथेच्या उत्तरेस व महाराष्ट्रांच्या दक्षिणेकडील कोल्हापूर वगैरे प्रांतांत दहाव्या व अकराव्या शतकापर्यंत बराच प्रबल होता. बाराव्या शतकाच्या सुमारास जैनधर्माच्या विरुद्ध लिंगायतांचा पंथ व मानभावांचा पंथ महाराष्ट्रांत सुरूं झाला. जैनांच्या, लिंगायतांच्या व मानभावांच्या संसर्गानें सनातन धर्माच्या गोटांतील लोकांच्याहि मनावर कांहीं परिणाम झाले, व त्यांपैकी कांहींनीं भक्तिमार्ग, उपासनामार्ग, ह्या नांवाखालीं मोडणारी सनातनधर्माची एक निराळीच शाखा स्थापिली. ह्याच शाखेला संतमंडळीचा अथवा संताळ्याचा भक्तिपंथ म्हणून म्हणतात.