Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
मालोजीला जहागीर शके १५२६ त मिळाली. तिचा उपभोग १५ वर्षें घेऊन तो शके १५४१ त वारला. कांकीं शके १५४१ त शहाजीला मनसबदारीचीं वस्त्रें मिळालीं असें, इतर अव्यवस्थित माहिती देतांना, मल्हार रामराव सांगतो. (मल्हार रामराव, चरित्र २१). वजिरीची वस्त्रें शहाजीस मिळालीं म्हणून मल्हारराव म्हणतो, परंतु १५४१ त मलिकंबर वजीर असल्यामुळें शहाजीस मनसबदारीचींच तेवढीं वस्त्रें मिळालीं असावीं हें उघड आहे. शहाजीचा जन्म शके १५१६ जयनाम संवत्सरीं चैत्र शुक्ल पंचमीस म्हणजे १८ मार्च १५९४ त झाला. तेव्हां शके १५४१ त तो २५ वर्षांचा असावा. शहाजीचें मलिकंबरापाशीं वजन बरेच असावें असें बखरींतील लिहिण्यावरून व शहाजीच्या जहागिरीच्या स्वरूपावरून दिसतें. शके १५४२ त मलिकंबराचें व मोंगलांचें खानदेशाच्या उत्तर सरहद्दीवर युद्ध झालें त्यांत शहाजी प्रमुख होता. (Grant Duff chap. II). युद्धांत प्रमुखत्व मिळाल्यावर दरबारच्या मसलतींतहि शहाजीचें वजन अतोनात झालें. तें जाधवरावादि जुन्या सरदारांना साहेना. तेव्हां शके १५४३ त ती मंडळी मोंगलांना जाऊन मिळाली. शके १५४५ त शहाजीला जिजाबाईचे पोटीं प्रथम पुत्र संभाजी नामें झाला. शके १५४२ पासून शके १५४८ पर्यंत मलिकंबरी कारकीर्दींत शहाजीचीं पांच वर्षें मोठ्या थाटांत गेलीं. मलिकंबर व मूर्तजा निजामशहा हा शके १५४८ त वारल्यावर राज्यांत चतुर सांबाजी व शहाजी हे दोघे मुत्सद्दी तेवढे कायते नामांकित असे उरले होते. मलिकंबराचा मुलगा फत्तेखान ह्याच्या मनांत आपल्याला वजिरी मिळावी असें होतें. जाधवरावादि मंडळीस शहाजीचा पूर्वींपासूनच द्वेष वाटत होता. दौलताबादचा शहा लहान असल्यामुळें शहाजीच्या हातांत राज्याचीं सर्व सूत्रें बहुतेक गेल्यासारखीं होतीं. तेव्हां ही सर्व मंडळी एक होऊन त्यांनीं शहाजीची दौलताबादेहून उचलबांगडी केली. दौलताबादकरांचें व मोंगलांचे युद्ध चाललेंच होतें. मोंगलांकडे फत्तेखानानें आंतून सूत्र बांधिलें व जाधवरावादि मंडळी तर राजरोस त्यांना कित्येक वर्षें आधींच जाऊन मिळाली होती. मोंगलांच्या सैन्यांपुढें सरकत सरकत शहाजी जुन्नर प्रांतात शिरला व आपली बायको जिजाऊ हीस तेथील स्वतंत्र अंमलदार श्रीनिवास म्हणून होता त्याच्या स्वाधीन करून, अहमदनगरच्या पश्चिमेकडील प्रांतांत जाऊन राहिला. ह्या गोष्टी शके १५४९ च्या प्रारंभीं घडल्या. मोंगल आंगावर चालून आले तेव्हां शहाजी नाशिकाच्या पश्चिमेकडील घाटानें कोंकणांत माहुली किल्ल्यापाशीं उतरून तेथून नाणें घाटानें जुन्नरास आला असावा व रस्त्यांत जिजाबाई जाधवरावांच्या हातांत सांपडण्याचा प्रसंग येण्याची चिन्हें सडकून दिसलीं असावीं. परंतु एकंदरींत ती जाधवांच्या हातीं पडली नाहीं असें दिसतें. श्रीनिवासरावाचा व शहाजीचा स्नेह असल्यामुळें जिजाबाईला शहाजीनें शिवनेरीस ठेविलें. मोंगलांनीं माहुलीच्या किल्ल्याला वेढा दिला तो शके १५४९ दिला नसून पुढें दहा पांच वर्षांनीं दिलेला आहे. दौलताबादच्या निजामशाहाची वजिरी व पालकत्व करण्याचा शके १५४९ त शहाजीनें घाट घातला होता त्याचा हा असा विपरीत परिणाम झाला. दौलताबादची वजिरी करण्याचा प्रसंग शहाजीस दोनदां आलाः- शके १५४९ त पहिल्यांदा व शके १५५५ त दुस-यांदा. शके १५४६ तील वजिरीचा ग्रांट डफनें उल्लेख केला नाहीं. तसेंच शके १५५५ पर्यंत जिजाऊ जाधवांच्याकडे होती, म्हणून ग्रांट डफ म्हणतो (Duff. chap. III), त्यालाहि कांहीं आधार दिसत नाहीं. जुन्नरास अंमल श्रीनिवासरावाचा असल्यामुळें तेथें जाधवांचा रिघाव होणें कठीणच होतें. शिवाय, आपल्या वयाचीं पहिलीं पांच वर्षें शिवाजीनें शिवनेरीस घालविलीं म्हणून शिवदिग्विजयाच्या शेवटीं लिहिलें आहे (शिवदिग्विजय, ४६९), त्या अर्थी शके १५४९ पासून शके १५५५ पर्यंत जिजाऊ जाधवांकडे नसून शहाजीच्या जहागिरींत शिवनेरीसच होती हें स्पष्ट आहे.