Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
मल्हार रामराव दृष्टान्त शके १५२५ त म्हणजे इ. स. १६०३ त झाला म्हणून म्हणतो तें अर्थात् टाकाऊच धरिलें पाहिजे. ग्रांट डफनें ही गोष्ट शके १५२१ नंतर झाली असें धरून कांहीं विसंगत विधानें केलीं आहेत. जाधवरावानें आपली मुलगी शहाजीला देण्याचें नाकारल्यामुळें मालोजी हट्टास पेटला व आपली स्थिति सुधारण्याकरितां तो दरवडे घालून पैसा जमवूं लागला व दृष्टान्तानें पैसा मिळाला हें केवळ मालोजीचें ढोंग होतें वगैरे विधानें डफनें केलीं आहेत. परंतु तीं बराबर नाहींत. मालोजीला भुमिगत द्रव्य शके १५१५ त सांपडलें. त्याच्या जोरावर दोन चार हजार घोडीं ठेवून तो जाधवरावांची बराबरी करूं लागला. शके १४९९ त आपल्या वयाच्या २७ साव्या वर्षी (डफ म्हणतो त्याप्रमाणें २५ व्या वर्षीं नव्हे) लुकजी जाधवरावाच्या पदरीं मालोजीनें शिलेदारी करण्याचें आरंभिलें, तें शके १५२१ च्या रंगपंचमीच्या पुढें त्यानें सोडून दिलें. एका स्वतंत्र पथकाचा तो धनी बनला व जाधवरावाच्या विरुद्ध कामें करूं लागला. आपला मेव्हणा जगपाळ नाईक निंबाळकर याच्या सहाय्यानें मालोजीनें दौलताबादेजवळील एका मशिदींत मेलेलीं डुकरें नेऊन टाकिलीं. जाधवराव यवनांचा मनसबदार, तेव्हां यवनांचा द्वेष करणा-या पक्षांत मिळणें किंवा त्या पक्षाचा पुढाकार करणें मालोजीला त्या वेळीं हिताचें दिसलें. ही हकीकत १५२३, १५२४ च्या सुमाराला झाली असावी. त्या वेळीं निजामशाही अगदीं डबघाईस आलेली होती. अकबराच्या सरदारांनीं अहमदनगर १५२२ त घेऊन बहादूरशहास सालेरीस कैदेंत ठेविलें; चांदबिबी मरून गेली; व निजामशाह दौलताबादेस पळून गेला. तेथेंहि अकबराच्या सरदारानीं दुस-या मूर्तिजाशहास शह देण्यास कमी केलें नाहीं. अशा वेळीं मालोजीनेंहि पुंडावा आरंभिलेला पाहून, त्याला आपल्या बाजूला ओढून घेणें दौलताबादच्या मुत्सद्यांस जरूर पडले. जाधवरावांचें व मालोजीचें त्यांनीं सख्य करून दिलें, मालोजीचा मुलगा शहाजी यास जाधवरावाची मुलगी शके १५२५ च्या वैशाखमासीं अथवा ज्येष्ठ शुद्ध दशमीस (शिवप्रताप २४) म्हणजे इ. स. १६०४ च्या एप्रिल महिन्यांत देवविली व खुद्द मालोजीस पंचहजारी मनसबदाराचीं वस्त्रें लग्नाच्या आधीं त्याच वर्षाच्या चैत्र वद्य ५ स म्हणजे २६ मार्च १६०० त दिली. मालोजी ह्या वेळेपासून खराखुरा पातशाही मनसबदार झाला. फौजेच्या खर्चाकरितां त्याला कांहीं ठाणीं व किल्ले नेमून दिलेले होते (शिवदिग्विजय ४४). सध्याचे पुणे, नाशीक, अहमदनगर व खानदेश इतक्या जिल्ह्यांतून हीं ठाणीं पसरलेलीं होतीं. पैकीं खानदेशांत १५२२ च्या आधींच अकबराचा थोडासा अंमल झालेला होता व पुणें, नाशिक ह्या जिल्ह्यांतील डोंगराळ प्रदेशांत पुंडांनीं अस्वस्थता माजविली होती. नगरहि अकबराच्या ताब्यांतच होतें. सारांश, मालोजीला मिळालेलीं जहागीर बहुतेक मोंगलांच्या ताब्यांतील प्रांतांतून किंवा प्रांताच्या सरहद्दीच्या शेजारीं अशीच होती. असली जहागीर जतन करण्यास मालोजी सारखाच उपद्व्यापी व पराक्रमी मनुष्य पाहिजे होता. मालोजीच्या पराक्रमांचा प्रताप आपल्या प्रांतांतून दृष्टोत्पत्तीस न येतां मोंगलांच्या प्रांतांतून दृग्गोचर व्हावा असा हेतु, ही असली जहागीर मालोजीला देण्यांत दौलताबाद येथील मलिकंबरादि मुत्सद्यांचा असावा हें स्पष्ट आहे. मोंगलांशीं झगडण्यांत मालोजीचें मलिकंबराला बरेंच साहाय्य झालें असावें असें दिसतें. उत्तरेस अशेर व ब-हाणपूर ह्या ठाण्यापासून दक्षिणेस पेडगांवांपर्यंत म्हणजे मोंगलांच्या हद्दीपासून विजापूरच्या आदिलशाहीच्या हद्दीपर्यंत मालोजीची जहागीर सैरावैरा पसरली असल्यामुळें, निजामशाहाच्या प्रत्येक लढाईंत मालोजीचा कांहींना कांहीं तरी हितसंबंध असे. कांहीं व-हाडांतीलहि परगणे मालोजीच्या जहागिरींत होते म्हणजे खुजिस्ते बुनियाद अथवा दौलताबाद प्रांतांच्या भोंवतीं उत्तरेस, पूर्वेस, व दक्षिणेस मालोजीची जहागीर पसरली होती. ही जहागीर मोंगलांच्या, विजापूरकरांच्या व पुंडांच्या तडाक्यांतून सुरक्षित ठेवणें मालोजीस प्राप्त होतें. ह्या सुरक्षिततेच्या व्यवस्थेंत मालोजीचें बहुतेक आयुष्य गेलें व तींतच भोसल्यांच्या राज्यलक्ष्मीचा प्रथमोदय झाला. मालोजीच्या ह्या जहागिरीकडे ग्रांट डफादि इतिहासकारांचे लक्ष्य गेलेलें नाहीं. पुणें व सुपे हे दोन प्रांत मालोजीला जहागीर मिळाले एवढें सांगून ते स्वस्थ बसतात. त्यांना शिवदिग्विजयांतील यादीकडे दृष्टी फेकण्यास अवकाश झाला असता तर मालोजीच्या जहागिरीचें स्वरूप पृथक्करणांतीं त्यांच्या लक्ष्यांत निःसंशय आलें असतें.