Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
ते गांवांत शिरले आणि लुटूं लागले. त्यांनीं फार मारगिरी केली. श्रीमंतांचे मोठे लष्कर असतां इलाज चालला नाहीं. पलटणचे लोक फार मेले. इतक्यांत इंग्रजी लष्कर ब्राह्मणवाडयाचा घाट चढून चाकणाकडे आल्याची बातमी श्रीमंतांस लागल्यावरून फौज सुध्दां निघोन बोरघाटानें रावाडीस गेले. पलटणचे लोक जे शाबूत होते ते जमेती निघोन घोडनदीस गेले. श्रीमंत पाडळीस गेले. इतक्यांत कर्नाटकांतून जरनेल रफीजेरनेल साहेब फौजसुध्दां आले ते सालप्याचे घाटानें चढोन गेले. पाडळीवरून श्रीमंत निघोन पुढें गेले तें गोकाककडून फिरोन मिरजेकडून साताऱ्यास आले. रफीजरनेल साहेब व त्यांचे लष्कर त्यांचे मागें होते ते दूर राहिले. इतक्यांत इस्मीत साहेब यांचे लष्कर अथणी जवळून श्रीमंतांचे पिछावर येत होतें तें साताऱ्यानजीक येऊन पोंचतांच श्रीमंत अदरकीचे घाटानें पळोन गेले. इतक्यांत इस्मीत साहेब यांच्या फौजेची व गोखले यांच्या फौजेची गांठ नांदगिरीजवळ पडली. तेथें गोखले, निपाणकर, त्रिंबकजी सुध्दां होते. त्यांजवर गोळे मारिल्यावरून सारी फौज पळोन गेली. इंग्रजाचे लष्करचा मुक्काम वऱ्यावर जाला. तो गोखले चंदनवंदनचे अंगानें फौजसुध्दां जाऊं लागले. त्याजवर तुरुकस्वार जाऊन बुणगे लुटून आणिले. गोखले पळोन गेले. नंतर इस्मीत साहेब गेले तेथें पुण्याकडून कर्णेल बेल साहेब यांचे लष्कर मोठया तोफासुध्दां येऊन पोचल्यानंतर रफीजरनेल साहेब याचे लष्कर पुढें सावळीकडे आले. याजकरितां अल्पिष्टन साहेब व इस्मीत साहेब सारी फौजसुध्दां रहिमतपुरावर गेले. तेथें रफीजरनेल साहेब यांच्या भेटी होऊन सातारियास सारे फौजसुध्दां आले. तेथें छ ४ रबिलाखर माघ शु॥ ५ ०-२-१८ सातारा किल्ला घेऊन पहिल्यानें इंग्रजी निशाण चढवून लागलेच महाराज यांचे निशाण लाविलेवर इंग्रजी सरकारची फौज राहिली आणि महाराजांकडील विठ्ठलपंत महाजनी व शिरके वगैरे लोक यांस खर्चास वस्त्रें देऊन त्यांस महाराज लौकरच येतील असें सांगून सातारा शहरचे रखवालीस लोक ठेवावयाकरितां विठ्ठलपंत यास ऐवज दिल्हा. व बाजीराव साहेब यांचा जाहीरनामा केला कीं : जाहीरनामा सरकार दौलत मदार कंपिणी इंग्रज बहाद्दूर, सुरुसन समान आशर मय तैन व अलफ. तमाम लोकांनीं जाहिरनामा समजोन त्याप्रमाणें वर्तणूक करावी याजकरितां लिहिलें जातें जे : बाजीराव साहेब राज्यावर आल्यापासून नाना प्रकारचे बखेडे व बंडें होत होतीं. राज्यांत व मुलुखावर हुकुमत कधींही चालली नाहीं. पुढें होळकर यांचा दंगा झाला. तेव्हां राज्य सोडून पळोन वसईस जाऊन खंडेराव रास्ते यांचे मदतीनें गुदराण करून राहिले. नंतर कंपिणी सरकारची दोस्ती केली. त्याजवरून कंपिणी सरकारची फौज येऊन, बाजीराव साहेब यांस गादीवर बसवून, तमाम बंडें व बखेडे होते ते मोडून मुलुखांत बाजीराव साहेब यांचा हुकूम सुरळीत चालू करून दिल्हा. पहिल्यानें दंग्यामुळें व पुढें दुष्काळ पडला त्याणें बहुतेक देश उद्वस्त झाला, तो कंपिणी सरकारचे भरवशावर आबाद झाला. बाजीराव साहेब यांणीं मामलती मक्त्यानें लाविल्याते मक्तेदार रयतेपासून जास्ती ऐवज घेत गेले. तत्राप बहुत आबादी झाली. जे मुलकाचा ऐवज जमा झाला त्याजवर बाजीराव साहेब यांणीं दौलतीचा खर्च व आयषआराम करून खजिना बहुत जमा केला. मराठे सरदार यांजवर बाजीराव साहेब यांचा दावा बहुत दिवसांपासून नवता तो लागू करावा असें कंपिणी सरकारांतून कबूल केलें नवतें; जें वाजवी असेल तें चालू करून घ्यावें अशी कंपणी सरकारची खायष होती; त्याजवरून गायकवाड याजकडील जाबसाल ठरवावयाकरितां गाईकवाड यांणीं आपले कारभारी गंगाधर शास्त्री यांशीं कंपणी सरकारचे बहादरीवर पुण्यास पाठविले. ते येऊन बहुतेक जाबसाल लौकर उलगडावा असें झालें होतें. त्यांत बाजीराव साहेब यांची किफायत बहुत होती. इतकियांत गंगाधर शास्त्री यास बाजीराव यांचे कारभारी यांणीं पंढरपूर क्षेत्रीं मारिलें. त्या वेळेस तमाम रयत व यात्रेकरू वगैरे सर्व म्हणत होते कीं शास्त्री यांशीं त्रिंबकजीनें बाजीराव साहेब यांचे हुकुमाशिवाय मारिलें नाहीं. असें असतां बाजीराव साहेब दोस्त मोठे दौलतदार असें करवितील हा गुमान मनांत न आणितां ज्या त्रिंबकजीनें मारिलें त्यास हवाली करून द्यावा असा कंपणीसरकारचा हुकूम होऊन त्रिंबकजी हवालीं करा असें बोलणें पडलें. तेव्हां हवालीं करावा तो न केला. याजकरितां कंपणी सरकारची फौज बहुत जमा जाली. नंतर त्रिंबकजी हवालीं केला. त्यासमयीं कंपणी सरकारास खर्च बहुत जाला. तो दोस्तीवर नजर देऊन न मागतां त्रिंबकजीस हवाली करून घेतला आणि दोस्ती जुळत होती त्याप्रमाणें कायम ठेविली. नंतर बाजीरावसाहेब याणीं बाहेरचे सरदार याशीं पत्रें पाठवून त्यांची फौज तयार करावी अशी तजवीज केली व आपले राज्यांत बंड उभे करून कंपणीसरकाराशीं लढाई पडावी आणि नुकसान व्हावे अशी तजवीज करूं लागले. त्याजवरून बखेडा मोडावयाकरितां कंपणीसरकारची फौज तयार होऊन पुण्यास आली आणि बाजीराव साहेब यांशीं शहराभोंवती तंबी केली. त्या वेळेस बाजीराव साहेब हातीं सापडलें होते. मुलकाची बंदोबस्ती करावयाजोगी कंपणी सरकारची फौज बहुत तयार होती. परंतु तहनामा झाल्यापासून वक्तशीर बाजीराव साहेब यांचे बोलणें पडत होतें. जें आम्हास प्राप्त झाले, आम्ही आयषाराम करितों हें सर्व देणें कंपणी सरकारचें आहे, आमचा शुकरगुजारा कंपणी सरकारचे भरवशी आहेत, असें बहुत तऱ्हेनें बोलत होते.