Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

(४२) अश्विन वद्य ८ रविवारी शाहासाहेब संगमावरून मुंबईस जात असतां गणेशखिंडी जवळ दिवसास श्रीमंताकडील स्वारांनीं भाला मारून त्यास जखमी करून घोडा नेला. नंतर त्यास संगमावर आणून श्रीमंताकडे परशरामपंत सावळीकर याजबरोबर सांगून पाठविले. परंतु त्यांणीं परत जाब येऊन सांगितला नाहीं. त्याजवरून बाळाजीपंत नातू यास पाठविले. तेव्हा श्रीमंतांकडून मोरदीक्षित व बाळोबाबाबा शुक्रवारचे वाडयांत खालीं बोलावयास आले ते चाल सोडून बोलों लागले कीं जखम लागली ही खरी कशावरून ? आम्ही पाठवून चौकशी करूं, कोणी भाला मारला हे ठिकाण कशानें लागेल ? तेव्हां बाळाजीपंत बोलले कीं आज पावेतों इंग्रजी सरकारचें बोलण्याचा भरंवसा होता, आतां या बोलण्यावरून दिसत नाहीं, त्यास, महाराज यांची मर्जी असेल तर तसें उत्तर सांगावें, त्याप्रमाणें साहेबास अर्ज करीन. त्यावरून विठोजी नाईक गाईकवाड यास कोठें भाला मारिला याचे चौकशीकरितां पाठविले. तें संगमावर येऊन गणेशखिंडीकडे गेले तों पिस्तुलाची घरें सांपडलीं. नंतर साहेबाकडे येऊन माघारे श्रीमंताकडे गेले. विश्रामसिंग ह्मणोन स्वार श्रीमंताचे हुजूर होता त्यानें भाला मारिला असें लोक बोलत होते.

(४३) खादेरी किला आंगरे याजपासून चिठ्ठी लेहून घेऊन त्याचे जिम्मेस ठेविला व कोकण अवचितगड वगैरे किल्ले बाबाजी बिवलकर याजकडे सांगितले व घाटबंदीचे काम त्याजकडे सांगितले.

(४४) बापू गोखले यांचे मनांत पलटणांत फितूर जाहला आहे त्यापेक्षां आपली फत्ते होईल, पलटणें थोडी आहेत तीं बुडवावीं, अल्पिष्टन यास जाग्यावर गर्दी करावी, असा मनांत निश्चय करून पटवर्धन याची फौज जवळ आली होती. त्याजकडे सांडणी स्वार पाठविला त्यास जलद आणविलें व निपाणकर यासही आणविलें, पटवर्धन याची फौज येऊन पोहोंचली. निपाणकर पोहोंचले नाहींत. घाटबंद्या केल्या, व डाका उठवावयाविशीं महालोमहालीं ताकीद केली, व मुंबईकडून कोणी येऊं न द्यावें याजकरितां स्वार पाठविलें, आणि आश्विन वद्य ११ बुधवार चंद्र २५ जिल्हेज तारीख ५ पाचवी सप्टंबर सन १८१७ या रोजीं सकाळी बापू गोखले जातीनें फौजेंत जाऊन फौजेची हुषारी केली. त्यामुळें पुणें शहरांत आवई पडोन लोक भयभीत होऊन लोकांनीं दुकानें व दरवाजे लाविले. नंतर फौज पर्वतीस जाणार या बहाण्यानें तयार होऊन वाडयावरून आली व जागा जागा आपलाले गोटातून तयार जहाले. श्रीमंताजवळ शुक्रवारचे वाडयांत बापू गोखले वगैरे जमा होऊन बिघाड सांगून पाठवावयाकरितां विठोजी नाईक गायकवाड व परशरामपंत सावरकर यास अल्पिष्टन साहेबाकडे पाठवून आपण फौज सुध्दां पर्वतीस गेले. गायकवाड व सावरकर यांणीं साहेबाजवळ सांगितले कीं खडकीनजीक लष्कर उतरलें आहे तेथून काढून माघारी जावें व गोऱ्यांचे पलटण आहे तें पुण्याजवऊ राहूं नये, घोडनदीस जावें, इंग्रजी सरकारचे दोस्ती करितां जें म्हटलें तें ऐकत गेलों हें साहेबांनीं ऐकावे. तेव्हां अल्पिष्टन साहेब बोललें कीं हें बोलणें दस्तुर सोडून आहे, याचा जाब काय द्यावा. गायकवाड बोलले कीं हें जर होत नाहीं तर महाराज आपले फौजेंत जातात. तेव्हां साहेब बोलले कीं महाराज आपले फौजेंत जात असल्यास आमचें येथें काय काम, आम्हीही जातो. याप्रमाणें विठोजी नाईक याचें बोलणें होऊन ते माघारे गेले, ते श्रीमंतापाशीं पोचावयापूर्वीच श्रीमंत बमय फौज पर्वतीस जाऊं लागले, तों पानशाचे वाडयाजवळ जरी पटक्याचा भाला मोडला. मग दुसरा घालोन पुढें गेले. सारी बायकामंडळीसुध्दा दरोबस्त पर्वतीस गेले. विठोजी नायकाचे बोलणें होऊन तें संगमावरून जातात तोच फौज श्रीमंताची तयार होऊन संगमाजवळ पोचली. इतकियांत अल्पिष्ठन साहेब याणीं पलटणचे लोक तयार करून बाहेर आले तों फौज वाडयाचे बागेच्या अलीकडे पोंचली. खडकीचा रस्ता बंद जाला. तेव्हां अल्पिष्टण साहेब नदी उतरोन खडकीचे पुलावरून खडकीकडे गेले. संगमावरून सामान सरकारी व रयतेचे व चाकर लोकाचे दरोबस्त लुटलें गेलें. इतकियांत फौज व तोफा श्रीमंताकडील तयार होऊन गणेशखिंडीनजीक पोचल्या. तें पाहून पलटण खडकीवरून निघोन पुढें गेली. त्यांत अल्पिष्टन साहेब जाऊन पोचले. पांच गोळे श्रीमंतांकडून अगोदर सुटल्यावर मग लढाई सुरू झाली. श्रीमंताचे फौजेचा मोड झाला. मोर दिक्षित, मराठे व पांडुरंग सहस्रबुध्दे निसबत पटवर्धन व काशीराव कोकरे यांचे चिरंजीव ठार झाले. आणखी लोक मेले व घोडीं पडलीं व तोफा व फौज श्रीमंताकडील पळोन माघारे गणेशखिंडीचे लगत राहिले. इंग्रजी सरकारची फौज रात्री खडकीस माघारी गेले. संगमावरील बंगले श्रीमंताकडील लोकांनी जाळले.