Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
श्रीमंत मोंगलाकडील कार्यभाग आटपून परभारें कर्नाटकांत भाऊसाहेबसुध्दां गेले. प्रथम श्रीरंगपट्टणास जाऊन तेथील खंडणी घेऊन छ १४ जमादिलावल रोजी (२० मार्च १७५३) ह्मणजे फाल्गुन वद्य १ मंगळवार रोजीं तेथून कूच करून होळी हुन्नर किल्ल्यावर मोर्चे बसवून तो किल्ला सर करून सरकारांत घेतला. त्या लढाईत कृष्णाजी पलांडा मयत झाला. सबब याचे पुत्रास मुलुखची पाटीलकी दिली. नंतर धारवाड किल्ला सर करण्यास आले. तेथें किल्लेदार पृथ्वीसिंग मोंगलाकडील होता. त्याशीं लढाई झाली. नंतर सल्ला होऊन त्यास पस्तीस हजार रुपये देऊन छ ९ रज्जब रोजीं (१३ मे १७५३) त्याजकडील अम्मलदार घासीखान याचा लेक पेशवे यांनी ओलीस आपलेकडे ठेविला. किल्ला हस्तगत झाल्यावर दुसरे दिवशी छ १० रज्जब रोजीं (१४ मे १७५३) त्यास सोडून दिलें. करवीरकर महाराज यानीं भाऊसाहेब यास पेशवाईपदाबद्दल तीन किल्ले ईहिदे खमसैनांत देऊं केलेले या सालीं भीमगड व पारगड व विभर्गी असे तीन किल्ले व त्याखालील महाल खानापूर वगैरे पेशवे यास संभाजी महाराजांनी दिले. मोंगल व कर्नाटकसंबंधी काम आटपून श्रीमंत पुण्यास पावसाळ्यांत आले. दादासाहेब पुण्यास कांही दिवस होते ते छ ३ सफर (१० दिशंबर १७५२) रोजी गुजराथचे स्वारीस निघाले ते छ ९ रबिलाखर (१३ फेब्रुवारी १७५३) अमदाबादेस दाखल झाले. छ २० रबिलाखर (२४ फेब्रुवारी १७५३) पासून ता. छ १० जमादिलावल (१६ मार्च १७५३) शुक्रवारपर्यंत लढाई सुरू होती. धनाजी थोरात व शहाजी चौधरी सरकाराचे सरदार ठार झालें, छ १४ रबिलाखर (१८ फेब्रुवारी १७५३) रविवार. जवानमर्दखान मोंगलाकडील अमदाबादेस होता. तो वेढा घालून बसला होता. त्यास पट्टण अथवा पंचराथनपुर वगैरे महाल देऊन किल्ला घेतला. या युध्दांत नारो शंकर राजेबयाद्दर यांनी मोठा पराक्रम केला होता. अमदाबादेस पेशवे यांनी ठाणे घालून आपला मामलेदार ठेवून उत्पन्न होईल तें निम्मे गायकवाड व निम्मे पेशवे यांनी घ्यावें असें ठरलें. अमदाबाद किल्ल्याचे सर्व दरवाजांचे चौकीपाहा-यांचा बंदोबस्त पेशवे यांनी केला. एकंदर व्यवस्था गायकवाड यांजकडे असावी असें ठरलें. अमदाबादची स्वारी करून दादासाहेब दत्ताजी शिंदे यास बरोबर घेऊन हिंदुस्थानांत परभारे गेले. यास खंडेराव होळकर मिळाले, त्यासुध्दां अजमीर प्रांती गेले. किल्ले कर्नाळा छ १६ रज्जब (२० मे १७५३) वैशाख व॥ ३ रोजीं सर झाल्याचें वर्तमान आलें. हडसर किल्ला सर होऊन सरकारांत आला. अमदाबाद फत्ते झाल्याची खबर श्रीमंतांस छ २० जमादिलाखरीं (२५ मे १७५३) समजली. छ १४ जमादिलावल (२० मार्च १७५३) रोजी बाई, नानासाहेब यांची मातोश्री वारली. भाऊसाहेबांस छ २२ जमादिलाखरी (२७ मे १७५३) समजलें. दमाजी गायकवाड याजकडून गुजराथप्रांताचा ऐवज दाभाड्याबद्दल ५२५००० करार केला.