Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ सल्लास खमसैन मया व अलफ, सन ११६२ फसली,
अवल छ २० रज्जब, २४ जून १७५२,
ज्येष्ठ वद्य ७ शके १६७४.

छ १६ रमजान आषाढ व॥ २ सह शुक्रवार (१७ जुलै १७५२) श्रीमंत नानासाहेब व भाऊसाहेब व दादासाहेब मुहूर्तानें निघून सोमवार पेठेंत राहिले. दादासाहेब थेऊरास गेले. श्रीमंत नाना व भाऊसाहेब छ ७ सवाल रोजी (६ आगस्ट १७५२) वानवडीवरून पुढें पाटसाकडून मोंगलाईत मीडसांगवीकडे गेले. दिल्लीकडून वर्तान अहमदशा अबदाली दिल्लीस असतां अफगाण बादशहा दिल्लीवर येऊं लागला तेव्हां लाहोरचा अधिकारी यानें त्यास खंडणी देऊन माघारा फिरविला. त्यासमयीं सफदरजंग वजीर दिल्ली याचे मनांत आलें की, रोहिले लोक मोठ्या योग्यतेस चढले असून हल्ली ते आपआपसांत तक्ताविषयी भांडतात यावरून त्यांस जिंकावयाची हीच संधि बरी आहे. ह्मणून त्यांवर स्वारी करून, तो रोहिल्यांचा मुलूख घेऊन, आपला हस्तक नेवलराई या नांवाचा कायत यास ठेवून आपण दिल्लीस माघारा आला. नंतर रोहिले यांनी मिळून त्या कायतास मारून टाकिलें. त्याजवर पुन: सफदरजंग यानें स्वारी केलीं; परंतु त्यांस जय आला नाहीं. इतक्यांत नासिरजंग मेल्यावर त्याचे जागीं दक्षिणेंत दुसरा सुभा यावा हें राजकारण करण्याविषयीं पेशवे यांनी शिंदे, होळकर यांस लिहिलें होतें ते या वेळेस दिल्लीस होते. त्यास सुरजमल्ल जाट यास आपले साह्यास घेऊन सफदरजंग रोहिले यावर गेला. तेव्हां रोहिल्यांचा मुलूख घेऊन या साहाय्याबद्दल शिंदे, होळकर यांसही कांही मुलूख दिला. अफगाण बादशहा पुन्हा दिल्लीवर आला. तेव्हां सफदरजंग वजीर दिल्लीस नसतां त्यास येण्याविषयीं बादशहानें पत्र लिहिले; परंतु तो येण्याचे पूर्वीच बादशहानें लाहोर व मुलतान प्रांत त्या अफगाण बादशहास देऊन परत पाठविला. नंतर वजीर दिल्लीस आला तेव्हां बादशहास समजलें की, अफगाण बादशहास काढून टाकण्याबद्दल वजिराने मराठ्यांस घेण्याचें ठरून साहाय्य करण्याचें ठरविलें होतें. त्या वजिराचे कामासाठी मराठ्यांनी रोहिल्यांपासून पन्नास लक्ष रुपये घेण्याचे बाबतीत पत्र लिहून घेऊन मुलूख सोडविला होता. तेव्हां मराठ्यांचे उपकार आपल्यावर झाले, याजबद्दल त्यांस काय बक्षीस द्यावें व काय काम सांगावें या विचारांत वजीर होता. इतक्यांत सलाबतजंग जिंकावयाकरितां शिंदे, होळकर यांस पेशवे यांनी बोलाविलें होतें. तेव्हां सफदरजंगानें गाजुद्दीन यास दक्षिणेची सुभेदारी देऊन त्याजबरोबर शिंदे व होळकर यांस देऊन याचे कार्याविषयी तुह्मीं उभयतां पेशवे यांचें साहाय्य करावें असें सांगून दक्षिणेंत रवाना केलें. ही बातमी फेरोजंगास कळली. त्याजवरून सलाबतजंग व बसालतजंग व निजामअल्ली व मोगलअल्ली भागानगरास असतां त्यानें दिल्ली बादशहास पत्र लिहून पेशवे यांजकडे शहानजवाखान ऊर्फ सैदलष्करखान व जानोजी निंबाळकर यांस भेटण्याकरितां पाठविलें. इतक्यांत दिल्लीहून गाजुद्दीनखान यास बरोबर घेऊन देशी येतांना होळकर यानीं मोंगलाकडील किल्ले मार्कंडा, इंद्राई, चांदवड व धोडप, कान्हेरा, राजदेहर व काळदेहर येणेंप्रमाणें सात किल्ले घेतल्याची खबर छ १९ सवाल श्रावण व॥ ६ (२९ आगष्ट १७५२ बुधवारी) कळली. गाजुद्दीन यासह शिंदे, होळकर छ २१ जिलकाद रोजी भाद्रपद व॥ ७ (३० सप्टंबर १७५२) अवरंगाबादेस दाखल झाले. हे सात किल्ले घेतले त्याच वेळेस चांदवड परगणा फत्तेसिंग काळे याजकडून घेतला असावा. कारण हा परगणा सरकारांत आल्याबद्दल नवस छ २६ सवाल रोजी (२५ आगस्ट १७५२) फेडिला होता.