Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ अर्बा खमसैन मया व अलफ. इन ११६३ फसली.
अवलसाल छ ३ साबान, ५ जून १७५३,
ज्येष्ठ शुध्द ४ शके १६७५.
छ १ जिल्काद रोजीं (३० आगस्ट १७५३) दादासाहेब स्वारीस अवशीस चार घटका रात्रौ डेरे मुहूर्तानें बाहेर दिल्हे. थाळनेरास गेले. छ ११ जिल्काद रोजीं (९ सप्टेंबर १७५३) थाळनेराहून दहिवलें येथे गेले. दरम्यान छ २९ जिल्काद रोजीं (२७ सप्टेंबर १७५३) नवाब सलाबतजंग यांजकडून सैद फतुल्ला वकीलीस आले होते. खानदेशाहून दादासाहेब हिंदुस्थानांत दत्ताजी शिंदे व मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांस बराबर घेऊन अजमीर प्रांती गेले. तेथें लूट करून चौथ व सरदेशमुखी घेतली व जागोजागी खंडणी घेऊं लागले. परंतु जाटलोक युध्दावांचून खंडणी देईनात. त्यांचा किल्ला कुंभेरी होता. त्या किल्ल्यांत ते लोक शिरून लढू लागले. त्या लढाईत खंडेराव होळकर मयत झाले. त्यांचे क्रियेस दहा हजार रुपये सरकारांतून दिल्हे, छ २९ जमादिलावल (२४ मार्च १७५४). पुत्र वारल्याचें वर्तमान ऐकून मल्हारराव होळकरही तेथें आले. तो किल्ला हस्तगत जाला नव्हता, सबब मल्हारराव होळकर इर्षेस पडून चार महिने लढले. पुढें सुरजमल्ल जाटापासून शिंद्यांच्या विद्यमानें साठ लक्ष रुपये खंडणी घेऊन खमस खमसैनांत छ १० रमजान रोजीं (२ जुलै १७५४) जयाजी शिंदे मारवाडांत गेले. जयाप्पा यांजबरोबर दादासाहेबांनी चार हजार फौज दिली होती. दिल्लीत कारभारी लोकांत एकमेकांशी वाकडेपणा आला होता. गाजुद्दीनखान मयत झाल्यावर त्याचा पुत्र मीर शाबुद्दीन यानें आपल्याविषयी सफदरजंग वजीर यास मोह उत्पन्न करून फार लीनता दाखविली. त्यावरून त्यास दया येऊन बापाचें गाजुद्दीनपण व अधिकार-अमीर उमरावतीचा-त्यास देवविला. असा वजिरानें त्याजवर उपकार केला असतां, त्या वजिराचेच नाशाविषयी प्रवृत्त होऊन त्याची वजिरी आपल्या आतेच्या नव-यास पातशहाकडून देवविली. यामुळे पहिला वजीर सफदरजंग व बादशहा यांचे युध्द सहा महिनेपर्यंत होत होतें. शेवटी तो वजीर कंटाळून आपलें ठिकाण लखनौ येथें जाऊन राहिला. या युध्दांत मीर शाबुद्दीन यानें बळेंच शिरून आपले साह्याकरितां पेशवे दादासाहेब हिंदुस्थानांत आले होते त्यांस बोलाविलें. ते फौजेनिशी शिंदे होळकरसुध्दा आले. परंतु हे दिल्लीस येण्यापूर्वीच सफदरजंग युध्द सोडून गेला होता. मग शाबुद्दीनानें आपल्यास मदत आलेले लोकांसुध्दां त्या सफदरजंग वजिराचा पक्षपाती सुरजमल्ल जाट याच्या पारिपत्यास गेला. परंतु तो जाट आपल्या किल्ल्यात शिरून युध्द करूं लागला. त्यावेळेस शाबुद्दीनानें बादशहापाशी युध्दाकरितां तोफा मागितल्या. तेसमयीं नवे वजिरानें बादशहास सांगितलें कीं, हा शाबुद्दीन आपल्यासच सर्व सामर्थ्य असावें असें इच्छितों, यास अनुकूल होऊं नये. त्यावरून बादशहानें तोफा दिल्या नाहीत. सुरजमल्ल जाट हाही बादशहास शरण आला होता, ह्मणून बादशहा शहाबुद्दीन व मराठे यांचे निवारणार्थ फौजेसहित निघाला. हें वर्तमान पेशव्यांस कळतांच एकदम पातशहाचे फौजेवर जाऊन पडले. तेवेळेस ते लोक बेसावध होते ह्मणून पळू लागले. तेव्हा मराठ्यांस फार लूट मिळाली. नंतर दादासाहेब यांनी नवे वजिरास दूर करून शाबुद्दीन यास वजिराची वस्त्रें छ १० साबान (२ जून १७५४) रोजीं संध्याकाळीं दिल्लीस दिली. व लागलीच पहिला बादशहा अमदशा यास काढून दुसरा बादशहा, पूर्वी जाहांगीर बादशहा होता त्याचा नातू इजुद्दीनशा याचें नांव दुसरा अलमगीर असे ठेवून, छ ११ साबान रोजी (३ जून १७५४) बसविला. पहिला बादशहा अहमदशा याचे डोळे शाबुद्दीनानें काढून त्यास कैदेंत ठेविलें. पहिला वजीर सफदरजंग या संधीत मरण पावला. त्याचा पुत्र सुजाअतद्दौला बापाचे जागीं अयोध्या प्रांताचा अधिकारी जाला. याप्रमाणें हिंदुस्थान प्रांती हकीकत जाली. याच स्वारीत मल्हारजी होळकर यास जखम लागली होती. जखम बरी जाली ह्मणून दादासाहेब यांजकडून पत्रें श्रीमंतांकडे छ १६ जिल्हेजेस (४ अक्टोबर १७५४) आली.