Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

हरी गोपाळ यास सरदारी दिली व नारो अप्पाजी यास पुण्याच्या सुभ्याचे कारभारावर पाठविलें. दमाजी गायकवाड यास कैद करून पुण्यास ठेवून पेशवे कारभार करू लागले. तेव्हा आईसाहेबांनी मोरो शिवदेव यास चिटणीशी सांगितली. राज्यकारण करूं लागली. प्रतिनिधीचेनीं काही होत नाहीं, सबब जगजीवन परशराम यास पद दूर करून बाबूजी नाईक यास द्यावें, या बेतानें नाईक फौजेसुध्दा साता-यास आले. प्रतिनिधींचे तालुके घ्यावयास गेले. तेथें तांदुळवाडीनजीक लढाई होऊन नाईकास जखम लागली. पळून बारामतीकडे गेले. साता-याचा बंदोबस्त असावा ह्मणोन दादोपंत वाघ दहा हजार फौज देऊन पाठविलें. चंदनवंदननजीक छावणी करून राहिले. तेव्हां आईसाहेबाकडील बखेडा मोडला. रघोजी भोसले वारले. त्याच्या धाकट्या बायकोचा परंतु वयानें वडील जानोजी यास सेना साहेब व सुभ्याची वस्त्रें दिली. वडील बायकोचे परंतु मागाहून झाले. सबब यास नवें पद सेनाधुरंधर दिले. छ २ रबिलाखर फाल्गुन शु. ३. दमाजीचा भाऊ खंडेराव यास नवीन परगणा व भडोच सुभा देऊन त्यास बाळाजीनें तिकडे घालविलें. रघोजी भोंसला असतां त्याणीं आपला पुत्र जानोजी कर्नाटकांत गेलेला परत आल्यावर या साली त्यास बंगल्यांत मीरहबीब याचे साहाय्यास पाठविलें होतें. त्यासमयीं अल्लीवर्दीखान याणें निरुपाय होऊन कटक प्रांतांतील बक्सरपर्यंत मुलूख मीरहबीब यांचे स्वाधीन केला. पुढे रघोजीचा पुत्र जानोजी ह्याचे व मीरहबीब यांचे दरम्यान तंटा उत्पन्न होऊन शेवटीं त्या मीरहबीबास त्या भोसल्यानें कैदेंत ठेविलें होतें. त्यास तो प्रतिबंध सोसवेनासा होऊन चौकीदारावर जाऊन त्यांत तो मारला गेला. अल्लीवर्दीखानानें रघोजीस कटक प्रांत दिला. त्यावेळेस रघोजीनें बंगाल व बहार प्रांतांचे चौथाईबद्दल बत्तीस लक्ष रुपये घेतले. नंतर बंगाल्यांत शिरून त्याणें गाविलगड व नरनाळा व माणीकदुर्ग हे तीन किल्ले घेतले. यानंतर मोंगलाचें लष्कर पुण्याकडे चाललें अशी खबर ऐकून गंगा व गोदावरीचे दरम्यानचे मोंगलाकडील मुलुखांत खंडणी घेऊन भोंसले यांणी जागोजाग आपली ठाणीं बसविली. दमाजी गायकवाड मुक्त करतेवेळेस त्याजकडून पंधरा लक्ष रुपये पहिले खंडणीबद्दल त्यानें द्यावे, नंतर निम्मे गुजराथचा भाग द्यावा, व नवीन मुलूख सुटले त्यांतही निम्मे भाग द्यावा, व जे समयीं स्वारी होईल तेव्हां दहा हजार फौज चाकरीस पाठवावी, व दाभाडे याचे मुतालकीबद्दल पांच लक्ष रुपये द्यावे, व पेशवे यांची ठाणीं बसविल्यास मदत करावी, शिवाय सातारकर राज्यासही खर्चास देत जावें, असें कबूल करून दादासाहेब यांजकडे पाठविला. जानोजी भोसल्यास सेनासाहेब सुभ्याची वस्त्रें दिली, त्या वेळेसही त्याजकडून सातारकर राजे ह्यांचे खर्चास दरसाल नऊ लक्ष रुपये देत जावे, व आज्ञा होईल त्या वेळेस दहा हजार फौज चाकरीस पाठवीत जावी, अशी कबुली करून घेऊन मग वस्त्रें दिली.