Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
नासिरजंग कर्नाटकांत गेला. तेव्हां बरोबर सलाबतजंग व निजामअल्ली व बसालतजंग व मोगलअल्ली असे पुलचेरीवर असतां, हिदायत मोहिदीनखान नवसा ह्मणजे मुलीचा मुलगा लढत असतां त्या लढाईत महंमदखान कडण्याचा नवाब यानें गोळी घालवून नासिरजंगास मारिलें, व हिदायत मोहिदीनखानही ठार झाला. त्या लढाईत मग निजाम पदवी सलाबतजंग यास मिळून तो हैदराबादेकडे जात असतां ताराबाईनीं त्याशी राज्यकारण करून त्यास साता-यास आणणार होती. ही खबर पेशवे नानासाहेब यास कळतांच छ ६ जिल्हेज रोजी (२६ अक्टोबर १७५०) त्यावर स्वारीस निघाले. त्यांनी सलाबतजंग यास कृष्णेच्या काठी गांठून लढाई केली. पुढें तह असावा असें बोलण्यांत सलाबतजंग याजकडून छ ३ जमादिलावर रोजी (२० मार्च १७५१) श्रीमंताकडे आले होतें. इतक्यांत साता-याकडे ताराबाईचेकडून दमाजी बडोद्याहून येऊन नाना पुरंदरे यांशी लढत आहे अशी खबर श्रीमंतांस कळताच रामदासपंताचे विद्यमाने सल्ला करून खंडणी सतरा लक्ष रुपये घेऊन एकदम तेरा दिवसांत साता-यास आले. याच स्वारीत छ २८ रबिलाखर रोजी (१६ मार्च १७५१) श्रीमंतांनी मुगणहळळी पेठ व गोपाळपेठची खंडणी घेतली. बरोबर रघोजी भोसले व फत्तेसिंग भोसले असे होते. साता-यास स्वारीस येण्याचे अगोदर दमाजीचा मोड नाना पुरंदरे यांनी केला होता. पेशवे फौजेनिशी नजीक आले. प्रतिनिधीनेंही बोलल्याप्रमाणें साहाय्य केलें नाहीं, याजकरितां दमाजी पेशवे याजबरोबर तहाचें बोलणे लाविलें. तें पेशवे यांनी मान्य केल्यासारखा आकार दाखवून तह करण्यास आह्मांजवळ यावें असें सांगून, जवळ आणिला. तेव्हां आपले हाती पुरता सांपडला असे समजून त्यासही गुजराथसंबंधें कांही पैसा येणें होता तो मागूं लागले. नंतर त्यानें उत्तर केलें की, या गोष्टीस मी एकटाच मालक नाही. तेव्हा छ १८ जमादिलाखर रोजी (४ मे १७५१) दाभाडे याजकडील गुजराथ खातेंबाकी उत्पन्नाची पेशवे यांनी जप्ती केली व पुढे छ १० रज्जब अखेर साल (२५ मे १७५१) यशवंतराव दाभाडे व दोघी बाया कैद करून पुण्यास पाठविल्या. त्या होळकर याच्या वाड्यांत ठेविल्या होत्या, व त्याच दिवशी इंदूरीचें ठाणेंही जप्त केलें. गुजराथचा निमेभाग पेशवे यांस महाराजांनी दिला असतां दाभाडे यांनी हवाला केला नाही, त्याजबद्दल दाभाडे यांजकडे पंचवीस लक्ष रुपये येणें, त्या ऐवजी दाभाडे याचा निम्मे हिस्सा जप्त करून पेशवे यानी घेतला. त्याजबद्दल छ २१ जमादिलाखरची (७ मे १७५१) सनद दाभाडे यांचे नावें झाली आहे की, स्वामीनीं गुजराथप्रांत सालमजकुरी आह्माकडे देवविला ते तुह्मी गरगशा खाली घालून हवाली केला नाहीं, याजबद्दल पंचवीस लक्ष रुपये तुह्माकडे येणें, त्याजबद्दल तुमचा निम्मे हिस्सा तुह्मी लावून दिला, तो आह्मी कबूल केला, तो पंचवीस लक्ष रुपये फिटले ह्मणजे परत देऊं असा मजकूर आहे. मग दमाजीस कैद करून, त्याचे लष्करावर छापा घालून, दमाजीस पुण्यास कैद करून, आवजी कवडे यांचे वाड्यात ठेविलें, छ २५ जमादिलाखर (११ मे १७५१) या साली दुसऱ्या गोष्टी मनांत ठेवण्यासारख्या घडून आल्या, त्या येणेंप्रमाणे. हरी फडके या साली उमेदवार कारकून होते. छ २६ जिलकाद लागू छ ६ जिल्हेज (१७ आक्टोबर - २६ आक्टोबर १७५०) श्रीमंत राव बापूजी पुणे सुभा याशी शाहूचे नांवचे मुतालिकी शिक्के होते ते मोडून रामराजाच्या नावें करून दिले. खरगोणे प्रांत माळवा नवा मुलूख या सालीं सरकारांत आला. छ २६ रबिलाखर (१४ मार्च १७५१) पासून त्रिंबकराव मामा पेठे पुण्याचे कामकाज पाहूं लागले. जमादिलावल (एप्रिल १७५१) महिन्यांत नानासाहेब यांस मुलगा झाला होता. भागानगरची स्वारी करून पंढरपुरास माघारे येऊन तेथील बंदोबस्त करून छ ७ रज्जब (२२ मे १७५१) १६ घटिका दिवसास पुण्यास दाखल झाले. शिंदखेड व खांडवे व भालागड व पिंपळदेहे, हांडे, यमाखळ, रघोजी भोसले यांजकडून मोबदल्यांत घेतले. पर्वतीस देकार द्यावयास जागा करून सोपे बांधावयास काम लाविले.