Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
शिंदे, होळकर उभयतां अवरंगाबादेहून श्रीमंतांस जाऊन भेटले. श्रीमंतही होळकरांचे डे-यांत भेटावयास गेले होते. नाजुद्दीनखान अवरंगाबादेस आल्यावर त्याचेजवळ मसलतगार सैद हशमतखान व महंमद अनवरखान होते. त्यांनीं श्रीमंतांस सांगून पाठविलें की, भागानगराहून बोलण्याकरितां निंबाळकर व सैदलष्करखान आले आहेत, त्यांस निरोप न देतां आपण त्यासुध्दां शहागडावर यावें, आपले व आमचे विचारें ठरेल तसें करा. त्यावरून श्रीमंतांनी कूच करून निंबाळकर व सैद लष्करखानसुध्दां शहागडावर गेले. गाजुद्दीनखान याचा व पेशवे याचा असा तह ठरला होता की, तुची निजाम पदवी तुह्मांस देवविली असतां तुह्मी आह्मांस व-हाडचे पश्चिमेस तापीपासून गोदावरीपर्यंत मुलूख द्यावा असा ठराव झाला होता. परंतु गाजुद्दीन यास निजामअल्लीचे मातोश्रीनें अवरंगाबादेस जेवणास बोलावून विषप्रयोग करून मारिलें. ही खबर श्रीमंतांस कळतांच त्यांनी बोलण्यास आलेले निंबाळकर व सैद लष्करखान यांस निरोप दिला व होळकर यास हिंदुस्थानांत पाठविलें व शिंदे देशी राहिले. पुढें गाजुद्दीन याणें देऊं केल्याप्रमाणें गाजुद्दीन मेल्यामुळें सलाबतजंग देण्यास हरकत करूं लागला. तेव्हां पुन: होळकर यास येण्याविषयीं पत्र पाठवून बाकीची फौज जमा करून पेशवे लढाईस सिध्द झाले. सलाबतजंगही मोठे फौजेनिशी पेशवे यांचे फौजेवर ग्रहणाचे दिवशी पौर्णिमेस छापा घातला. नंतर दुसरे दिवशी मोहरम महिन्यांत (डिसेंबर १७५२) लढाई झाली. त्यांत महादजी अंबाजी व दत्ताजी व महादजी शिंदे व कोन्हेरपंत एकबोटे वगैरे असामींनी लढाई देऊन मोंगलांशी झुंज केलें. ही लढाई भालकी मुक्कामीं झाली. तेव्हां गाजुद्दीन यानें देऊं केल्याप्रमाणें मुलूख देण्यास सलाबतजंग सिध्द झाला. परंतु रघोजी भोसल्यानें आमचे मुलुखांत पैनगंगा व गोदावरीचे दरम्यान ठाणीं घेतली आहेत ती उठवावी असे त्यानें बोलणे लाविलें. तेव्हां पेशवे यांनी मान्य केलें व भोसले यांनी ठाणी उठविली. सलाबतजंगानें तहाप्रमाणें जहागीर पेशव्यास दिली. व नगर व खानदेश जिल्ह्यांतील बहुतेक जहागीर अंमल व पुणे जिल्ह्यापैकी कांही भाग प्रांत जुन्नरपैकीं जहागीर पेशव्यांस आली. नंतर छ १८ मोहरम रोजी (२५ नोव्हेंबर १७५२) सलाबतजंग व पेशवे यांच्या भेटी झाल्या. पोषाग श्रीमंतानें त्यास केला, व श्रीमंतांस तिकडून पोषाग आला. होळकर यांस येण्याविषयी पत्रें गेली होती. त्याचें उत्तर त्यांजकडून आलें कीं, रोहिले पठाण कमाउंचे पहाडांत आहेत त्यांचें निर्मूल करावें असें होतें. परंतु स्वामीकडून एक दोन पत्रें आली कीं, कळेस तसा निर्गम करून तुह्मी येणें. त्याजवरून रोहिले पठाण व वजीर यांचा सल्ला करून घेऊन कूच करून भागीरथी उतरून दक्षिणतीरास आलों व वजीरही एक दोन दिवसांत येतील. मजल दरमजल येत आहेत त्यास वजिराकडून व दिल्लीकडून बातमी आली की, स्वामीचा व सलाबतजंगाचा तह होऊन सल्ला झाला. त्यास सल्ला झाला असेल तर तसेंच लिहून यावें. मजल दरमजल येतों. सल्ला झाला असेल तर हिकडेही कोण आहेत. जसें वाटत असेल तशी आज्ञा केली पाहिजे.