Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
तिकडे भाऊसाहेब जाऊं लागले. तेव्हां महादाजी अंबाजी यांनी विनंति केली कीं, आह्मी चाकर व भाऊसाहेब आपले बंधु, त्यांचे न ऐकिल्यास दौलत फाटेल, यास्तव कारभार त्यांस सांगावा, मी घरी बसतों. असें सांगून गेल्यावर श्रीमंतांनीं भाऊसाहेब यांची समजूत करून त्यांस कारभार सांगितला. नंतर रामचंद्रबाबा व भाऊसाहेब कारभार करूं लागले. रामचंद्रबाबा सावंतवाडी प्रांतांतील आरवली गांवचा कुलकरणी. तो कांही कामांत अंतर पडलें ह्मणून पळून साता-यास आला. प्रथम कचेशरबावा राजगुरूपाशीं चाकरीस राहिला. तो कारकुनी व शिपाईगिरीचे कामांत हुशारसा पाहून पेशवे यांनी आपलेजवळ ठेविला होता. पुढें राणोजी शिंद्याची दिवाणगिरी दिली होती. पुढें राणोजी मेल्यावर जयाप्पा शिंद्याचें व त्याचें जमेना. सबब तेथून निघाला तो भाऊसाहेब यांजपाशीं आश्रयानें राहिला होता. छ १४ सवाल रोजी (५ सप्टेंबर १७५०) चिमणाजी नारायण पंतसचिव व पुत्र चिटकोपंतसुध्दा पेशवे यांनी भोरास पाठविले. सत्तर हजार रुपये मशारनिल्हेस द्यावयाचा करार. छ १ रमजान (२४ जुलै १७५०) तुंग, तिकोना किल्ले माघारे दिले. शिरवळ येथील खालसा अम्मल व पवन मावळ दिले. छ १ रमजान (२४ जुलै १७५०) भोरप व उतरोली व खानापूर दिले. छ ९ सवाल रोजीं (३१ आगष्ट १७५०) निघून स्वराज्य अम्मल पूर्वी होता त्याशिवाय मोंगलाई सरदेशमुखी दिली. छ १२ सवाल (३ सप्टंबर १७५०) भाऊसाहेब व छ २१ सवाल रोजी (१२ सप्टंबर १७५०) रामराजे यांस स्वारीस जाण्याविषयीं जोशी यांनी मुहूर्त दिल्याप्रमाणें भाऊसाहेब साताऱ्यास महाराज यांस बरोबर घेऊन गेले. सांगोलें याचें ठाणें व मंगळवेढें येथील ठाणी होतीं त्यांचे बंदोबस्ताकरितां यमाजी शिवदेव यास पाठविलें होतें. शिंदे, होळकर यांजकडील व नाना पुरंदरे स्वत: फौजेनिशी अशी एकंदर साठ हजार फौज जमा करून आश्विनमासीं सातारकर राजे याचे मुलखातील व राज्याचा बंदोबस्त रामचंद्र मल्हार यांचे विद्यमानें खाली लिहिल्याप्रमाणें केला. छ ४ जिलकाद रोजीं (२५ सप्टंबर १७५०) दादोबा प्रतिनिधि पुरंदर किल्ल्यावर कैदेंत होते त्यांस स्वामींनीं हुजूर बोलावल्यावरून स्वारींत भाऊसाहेब यांजकडे पाठविलें. तयांस पुन: पद दिले. सांगोलें याचें ठाणें लढून घेतलें तें हुजूर येऊन राणोजी मोहिते यास दिलें. व मंगळवेढ्याचे ठाणे पंतप्रधान यांजकडे दिले. दाभाडे बेहोष, त्यांचा अम्मल गुजराथेंत बरोबर चालत नाहीं, करितां हुजूर खासगीचा अम्मल आह्माकडे सांगावा अशी विनंति करून निम्मे अम्मल आपल्याकडे घेऊन सनदा घेतल्या व निम्मे दाभाडे याजकडे ठेविले. कर्नाटक सुभा बाबूजी नाईक याजकडे होता. तो जास्ती रसीद कबूल करून आपल्याकडे घेतला. गोविंदराव चिटणीस यांनी महाराजांपाशी पंतप्रधान यांचे अनुमतें कारभार करावा. बापूजी खंडेराव यांनीं हुजूर असावें. चार लक्षांचा सरंजाम व दातेगड प्रतिनिधीकडील उभयतांच्या नावें दिला. खानदेश व गंगातीरीं पन्नास हजारांचे मोकासे दिले. यशवंतराव पोतनीस याने खानगी कारभार करावा व पोतनिशी करार केली. चाळीस हजारांचा सरंजाम दिला. यशवंत लपाटे यांनी हुजूर खानगीचा कारभार करावा. त्याजकडे तालुके वगैरे करार केले. पंतप्रधान वगैरेकडील तालुके सरंजाम ज्याचे त्याजकडे करून नेमणुकी ऐवज सालाबादप्रमाणें द्यावा. हुजूर खानगी सदरेस हुजूर मामला व खाजगीचे दरोबस्त महाल व प्रधान पंताकडील दरमहाचा ऐवज व हिंदुस्थान व कर्नाटक व कोंकणप्रांताचा ठरावाप्रमाणें ऐवज व दाभाडे यांजकडील निम्मे गुजराथचे ठरावाचा ऐवज व प्रतिनिधीकडील व सरलष्कर यांजकडील नेणुकी दरमहाचा ऐवज हुजूर पावता करून द्यावा. व हुजूरचे किल्ले रायगड व प्रतापगड नेणूक वगैरे आहे तसें चालवावें. पंतप्रधान यांजकडील दरमहा हुजूर खानगीकडे ऐवज पेशजीप्रमाणें व कर्नाटक व निम्मे गुजराथचा ऐवज देत जावा.