Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

महाराज यांची प्रकृति बिघडली. तेव्हां सकवारबाई नेहमी जवळ असे. कदाचित् आपल्यास बाहेर जाणें झाल्यास आपले पक्षाचे लोकांस बसवून जात असे. पेशवे यांनी इतक्यांतूनही संधि साधून शाहू महाराजाशीं एकांत करून त्यांजपासून सनद करून घेतली. ती अशी कीं, मराठ्यांचें सर्व राज्य पेशवे यांनी करावें व लौकिकांत राजाचा मान राखावा. ताराबाईचा नातू अधिकारी करावा. तो व त्याची संतति होईल तिचा उत्तम रीतीनें सांभाळ करावा. कोल्हापूरचें संस्थान संभाजीचें प्रथक आहे असें असूं द्यावें. याप्रमाणे पेशवे यांनी बंदोबस्त करून घेतल्यानंतर शाहूहाराज छ॥ १५ मोहरम मार्गशीर्ष व॥ २ शुक्रवारी (१५ डिसेंबर १७४९) सकाळीं चार घटिका दिवसास वारले. त्यावेळेस पृथक प्रतिनिधि व त्याचा मुतालीक यास कैद करून, पायांत बिड्या घालून, प्रतिनिधीस पुरंदरावर व यमाजी गमाजी शिवदेव यांस आणकाई किल्ल्यावर ठेवून नजरबंदी केली व सातारे किल्ल्यावर पेशवे यांनी आपली शिबंदीच ठेवून बंदोबस्त केला. सातारा शहरची नाकेबंदी केली व राणीसाहेब यांस तिचे बापाचे मार्फत सांगून पाठविलें की, महाराजांचे आज्ञेप्रमाणें करावयाचें किंवा सहगमन जावयाचें ? तेव्हां राणीसाहेब यांनी विचार केला की, प्रधान पराक्रमी आहेत, प्रतिनिधिच्यानें मसलत शेवटास जात नाहीं, ताराबाईचे आज्ञेंत राहणे हेंही योग्य नाही. सहगमन जाणें असा निरोप आल्यावर, प्रधानपंत यांनी वाड्यांत जाऊन बंदोबस्त करावा. नंतर महाराज यांचें प्रेत सकवारबाईसुध्दां माहुलीस कृष्णावेणीसंगम जाणून दहन झालें. सकवारबाई सती गेली. उत्तरकार्य मालोजी भोसले मुंगीकर यांजकडून करविलें. दहन कृष्णावेण्यासंगमी प्रवाहांत झालें. त्या ठिकाणीं देवालय करूं नये असा दृष्टांत झाला. एक थडगे करून महाराजांचे लिंग व बाईसाहेबांची मूर्ति स्थापन केली. नदीस पूर आले असतां मोठाले पाषाण वाहून जातात, तत्राप तें लिंग व मूर्ति अद्याप कायम आहेत ! महाराजांजवळ एक कुत्रा असें. तो सर्वकाळ महाराजांपाशी गादीजवळ असे. कोणे एकेदिवशी महाराज वाघावर शिकारीस गेले. बरोबर हा कुत्रा होता. महाराजांनी वाघावर बंदुकीची गोळी मारली. ती चुकून जाऊन वाघ महाराजांवर चालून आला, तेव्हां त्या कुत्र्यानें वाघ येतो असें पाहून एकदम वाघाचे मागले अंगास जाऊन त्याचें अंड धरिलें. इतक्यांत महाराजांजवळ बंदूक होती. दुसरी गोळी वाघावर मारिली. वाघ मारिला. त्या दिवशीं या कुत्र्यानें महाराजांचा प्राण वांचविला. तेव्हांपासून त्याजवर महाराजांची प्रीति होती. महाराजांचा अंतकाळ झाल्यावर मराठे चालीप्रमाणें प्रेत पालखीत घालून मोठे समारंभानें माहुलीस आणिलें. त्याजबरोबर कुत्राही आला. पुढें महाराजांचे दहन होऊन मंडळी माघारी येण्यास निघाली, त्यांत महाराजांची पालखी व महाराज मयत असें कुत्र्यानें पाहून त्या नदीचे काठी डोकें आपटून प्राण दिला. त्या कुत्र्याचेंही थडगें कृष्णेच्या कांठी महाराजांच्या थडग्यानजीक अद्याप कायम आहे. त्या थडग्यावर दगडाचा कुत्रा हुबेहूब कुत्र्याप्रमाणें करून बसविलेला अद्याप आहे. प्रथम दिवशीं विधि झाल्यावर महाराजांचे पूर्वीचे आज्ञेप्रमाणें बारसीपानगांवाहून रामराजे यांस आणावयाकरितां ताराबाईकडील चिंतो विनायक व बापूजी खंडेराव व इंद्राजी कदम वगैरे मंडळी लागलीच पाठविली.