Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

ते तेथें जाऊन रामराजास घेऊन छ २६ मोहरम रोजी (२६ डिसेंबर १७४९) वडूथाजवळ कृष्णेचे ठिकाणी आले. इतक्यात महाराज वारल्याची बातमी पुण्यास गेल्यावर भाऊसाहेबही छ २० मोहरम रोजी (२० डिसेंबर १७४९) पुण्याहून निघाले. महाराज वारल्याची खबर लागतांच वडुथावर राहिले होते, त्यांची भेंट तिसरे प्रहरी दिवसास झाली, व पुढें छ ६ सफर रोजीं (४ जानेवारी १७५०) साता-यास येण्यास मुहूर्त होता त्या दिवशीं मुहूर्तानें शहरांत दाखल झाले. तेव्हां श्रीमंतांनी ८८९ रुपयांचा पोषाख महाराजांस केला. त्याच दिवशी ह्मणजे पौष शु॥ ८ (४ जानेवारी १७५०) सहा घटिका दिवसास राज्याभिषेक झाला. पुढे रबिलावल महिन्यांत लग्न झालें, मोहित्यांची कन्या. सर्व मराठेमंडळ शिरके, मोहिते, महाडिक, पालकर वगैरे साता-यास जमले होते. त्यांत कल्पना निघाली की, सर्वांनी एका ताटांत आईसाहेबसुध्दां जेवावें ह्मणजे रामराजे खरे, असें समजूं. अशी कल्पना निघाल्यावर संभुसिंग जाधवराव, चंद्रसेन यांचे बंधू, महाराजांचे पक्षातील होते. हे सर्व आईसाहेब यांस बोलले कीं, आपण आधी ग्रास घ्यावा. त्यावरून आमचे नातू खरे ह्मणून प्रथम ग्रास आईसाहेबांनी घेतला. नंतर सर्वांनी भोजन केलें. रघोजी भोसले बरोबर फौज घेऊन आले ते दाखल झाले. शिंदे, होळकर व सोमवंशी सरलष्कर व पिलाजी जाधवराव अशी फौज पेशवे यांची २५००० पंचवीस हजार जमली. एकंदर मराठ्यांकडील फौज ६००० हजार होती. सर्वांचा बंदोबस्त करून देण्याकरितां स्वारीस निघाले. तेथें ठेवून श्रीमंत पुण्यास निघाले ते छ २४ रबिलाखर रोजी (२२ मार्च १७५०) भाऊसाहेब यांची बायको उमाबाई पुण्यास वारली. सबब तूर्त स्वारीचा बेत रहित करून रघोजी भोसले तेथें ठेवून श्रीमंत पुण्यास निघाले ते छ २४ जमादिलावल रोजी (२१ एप्रिल १७५०) वानवडीस मूक्कामास येऊन छ २५ रोजी (२२ एप्रिल १७५०) पुण्यास दाखल झाले. याप्रमाणें साता-याकडील राज्याचे व्यवस्थेचें वर्तमान झालें. हिकडे दुसरी कित्येक नवलविशेष झालेली कार्ये झाली. त्यांची हकीकत खाली लिहिली आहे. सवाल महिन्यांत जनार्दन बाजीराव सातारे मुक्कामी वारले, भाद्रपद व॥ ७ रोजीं (२१ सप्टेंबर १७४९). छ २० मोहरम (२० डिसेंबर १७४९) चावड जीवधन किल्ला फत्ते झाल्याचें वर्तमान आलें. छ १८ जिल्हेज (१८ नोव्हेंबर १७४९) किल्ला पेटाव रामाजी महादेव यांनी सर केल्याचें वर्तमान आले. छ १ रबिलावल रोजी (२९ जानेवारी १७५०) वासोटा किल्ला रामाजी महादेव बिवलकर यांनी सर केल्याचें वर्तमान उमाजी निकम घेऊन आला. छ १५ रबिलावल (१२ फेब्रुवारी १७५०) माणिकगड घेतल्याची खबर आली. छ १७ रबिलावल (१४ फेब्रुवारी १७५०) त॥ छ २७ जमादिलाखर (२४ फेब्रुवारी १७५०) गंभीरगड किल्ला व त्याखालील महालसुध्दां रामदेव राणा रामगीरकर काळी यांजकडील राघोबा नारायण यांनी सर केल्याची खबर आली. छ ४ रबिलाखर (२ मार्च १७५०) किल्ले तुंग व तिना घेतल्याची खबर आली. छ २९ जमादिलावल (२६ एप्रिल १७५०) भाऊसाहेबांचें दुसरें लग्न झालें, हरि चिंतामण दीक्षित यांची कन्या. बनेश्वराचें देवालय बांधण्यास आरंभ झाला. नानासाहेब व भाऊसाहेब यांस पुत्र झाले होते. छ १२ सवाल (१५ सप्टेंबर १७४९) या साली कपिलाषष्ठी आली होती. रामचंद्रबाबा शिंद्यास कारभारी दिले होते. त्यांचे व सरदारांचे जमेना. सबब मल्हारजी होळकर याचे विचारें त्यानें कारभार करूं नये. सन १७४९ इसवींत ढोकलसिंग मारवाडाचा राजा मेला. त्याजा मुलगा रामसिंग याचे दुर्वर्तनामुळें चुलता बळवंतसिंग गादीवर बसला. दोघा भावांचे भांडणामुळे तंजावर राजानें देवीकोटचा किल्ला इंग्रज यांस दिला.