Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
जुन्नर व अहमदनगर या प्रांतांत आपली वडिलोपार्जित वतनजमीन आहे, त्याच प्रांतांतील सरदेशमुखीचें उत्पन्नहि आपणासच मिळावें अशी शिवाजीनें प्रथम इ० स० १६५० त बादशहास विनंति केली. बादशहाची मर्जी असल्यास आपण पांच हजार स्वार घेऊन त्याची नोकरी करूं असेंहि त्यानें कळविलें. परंतु शहाजहान बादशहानें शिवानीच्या विनंतीकडे मुळींच कानाडोळा केला. तेव्हां शिवाजी स्वतः दिल्लीस जाऊन त्यानें आपला अर्ज बादशहापुढें ठेविला. पुनः इ. स. १६५७ त शहाजहान याच्या हाताखालीं औरंगजेब दक्षिणेंत फौन घेऊन आला, तेव्हां शिवानीनें आणखी विनंति केली. त्यावेळेस असें ठरलें कीं, शिवाजीनें सैन्य जमा करून दामोळ व इतर समुद्र किना-यावरील परगणे सर करावे व औरंगजेबास आपल्या. प्रतिस्पर्धी भावांबरोबर लढाई करण्याकरितां जावें लागल्यास, त्या मुदतींत महाराष्ट्रांचें संरक्षण करावें : अशी औरंगजेबानें शहाजहान बादशहापासून परवानगी मिळवावी. कोणी रघुनाथपंत व कृष्णाजीपंत या नांवांच्या गृहस्थांस औरंगजेबाकडे बोलणें चालविण्याकरितां पाठविलें; त्यांनीं जाऊन सरदेशमुखीचें हक्क मिळविण्याबद्दल बादशहाजवळ नेहमीं बोलणें काढावयाचें. कोंकण प्रांत जिंकण्याचा अधिकार शिवाजीस पाहिजे होता तो औरंगजेबानें त्यास दिला. व सरदेशमुखीसंबंधानें त्यानें असें सांगितलें कीं, शिवाजीचा विश्वासूक मंत्री आबाजी सोनदेव हा दिल्लीस आल्यावर त्याच्या बरोबर या प्रश्नाचा ऊहापोह करू.
ह्या हक्कासंबंधीं तिसरा उल्लेख, पुरंदर येथें इ० स० १६१६ मध्यें शिवाजी व राजा जयसिंग यांच्यामध्यें झालेल्या तहाचें बोलणें चाललें असतांना झालेला आहे. या तहांत आपण आपले सर्व किल्ले बादशहाच्या स्वाधीन करितों व दिल्लीस जाऊन रीतीप्रमाणें बादशहास शरण येतों असें शिवाजीनें कबूल केलें. या तहनाम्यांत शिवाजीनें अशी विनंति केली होती कीं, निजामाच्या राज्यांत, आपले वडिलोपार्जित कांहीं हक्क आहेत, निजामापासून कांही प्रांत जिंकून घेऊन बादशहानें ते विजापूर प्रांतास जोडले आहेत, तर त्या प्रांतांतून आपणास आपल्या हक्काबद्दल कांहीं नेमणूक असावी. या तहनाम्यांतच फक्त सरदेशमुखीबद्दलच नव्हे, तर चौथाई म्हणजे कांहीं प्रांतांतील उत्पन्नापैकीं शेंकडा २५ या हक्काबद्दलसुद्धां मागणी केलेली आढळते. ही चौथाई व सरदेशमुखी ( शेंकडा १० ) वसूल करण्याबद्दलचा सर्व खर्च आपण देऊं, असें शिवाजीनें सांगितलें. हे हक्क आपणास मिळाले तर आपण, चाळीसलाख रुपये, सालोसाल तीन लाख हप्त्यानें बादशहास पेषकुश म्हणून देऊं. शिवाय बादशहाचे उपयोगी पडावी म्हणून फौजेची एक तुकडी आपल्या खर्चानेंच ठेऊं असेंही शिवाजीनें कबूल केलें. चौथाई व सरदेशमुखी या हक्कांसंबंधानें केलेल्या मागणीस बादशहाकडून मुक्रर जबाब मिळाला नाहीं. परंतु जयसिंगानें मंजुरीकरितां तहनामा जेव्हां हुजूरकडे पाठविला, तेव्हां शिवाजी स्वत : दिल्लीस येऊन पेषकुश देईल तरच तहनाम्यांत केलेल्या सूचनांचा आपण योग्य विचार करूं असें बादशहानें वचन दिलें. शिवाजी दिल्लीस जाऊनहि कांहीं उपयोग झाला नाहीं ; उलट बादशहानें त्यास तेथें कैद केलें. तेव्हां शिवाजी अगदीं निराश झाला. पुढें शिवाजी कैदेंतून पळून गेला व त्यानें पुन: लढाई चालविली, तेव्हां बादशहास कृतकर्माचा पश्चात्ताप झाला असें दिसतें. कारण कीं, इ० स० १६६७ च्या सुमारास बादशहानें शिवाजीस व-हाडांत एक जहागीर देऊन त्यास ' राजा ' ही पदवी दिली व त्याचा मुलगा संभाजी यास एक मनसब दिली. चौथाई व सरदेशमुखी हे शिवाजीनें फार दिवसांपासून मागितलेले हक्क न दिल्याबद्दल ही इतकी मेहेरबानगी बादशहानें दाखविली हें उघडच आहे. परंतु या मेहेरबानीनें शिवाजीचें समाधान न होऊन आपल्या मागण्या दिल्याचे पाहिजेत, असा त्यानें आग्रह धरिला व विजापूर आणि गोवळकांडेकरांकडून चौथाई व सरदेशमुखी वसूल केली. इ० स० १६६८ त विजापूरच्या अदिलशाही राजानें चौथाई व सरदेशमुखीबद्दल तीन लाख रुपये देणेचें कबूल केलें. त्याच सुमारास, आपण पांच लाख रुपये देऊं, असें गोवळकोंडेकरानेंहि कबूल केलें. इ० स० १६७१ त मोंगलांच्या ताब्यातील खानदेश प्रांतांतून शिवाजीनें चौथाई व सरदेशमुखी जमा केली. इ० स. १६७४ त कोकणांत जीं पोर्तुगीज ठाणीं होतीं त्याबद्दलही वरील कर देण्यास पोर्तुगीज लोकांस भाग पाडलें. विजापूरकर व गोवळकोंडेकर यांजकडून जे कर घेण्यांत आले, त्याचा मोबदला ह्मणून मोंगलांच्या हल्ल्यापासून त्यांचें रक्षण करण्याचें काम शिवाजीनें आपल्या अंगावर घेतलें. व त्या वेळेस चाललेल्या लढायांमध्यें या संरक्षणापासून त्या दोन्ही राजांचा फार फायदा झाला. बेदनूरचा राजा व मुंद येथील संस्थानिक यांनीही शिवाजीस खंडणी देण्याचें कबूल केलें व इ० स० १६७६ मध्यें शिवाजीनें कर्नाटकावर स्वारी करून त्या दूरच्या प्रांतांतसुद्धां चौथाई व सरदेशमुखी वसूल केली. इ० सं० १६८० मध्यें शिवाजी मृत्यु पावला त्यापूर्वीच, दक्षिणेंतील हिंदू व मुसलमान राजांचें संरक्षण करण्याचें काम आपल्याकडे घेऊन, त्यांच्या संमतीनें, त्यांस मदत करण्याचें व त्यांचेकडून खंडणी घेण्याचें तहनामे करण्याची पद्धत शिवाजीनें चांगलीच अमलांत आणिली. व खुद्द मोंगलांच्या ताब्यांतीलही कांहीं प्रांतांवर त्यानें कर बसवून ते वसूल केले. सरदेशमुखीची मागणी म्हणजे मूळ जमाबंदी वसूल करण्याचा खर्च लादलेंलें वडिलोपार्जित वतन मिळण्याविषयीं केलेली विनंति होय. चौथाईचा हक्क सरदेशमुखीस पुढें जोडण्यांत आला. तो, ज्या राजांचें, शत्रूंच्या स्वा-यांपासून रक्षण करण्याचें काम शिवाजीनें आपल्या अंगावर घेतलें, त्यांच्या संमतीनेंच जोडण्यांत आला. या कामीं लागणा-या फौजेच्या खर्चाबद्दल त्या राजांनी शिवाजीस एक नियमित रक्कम द्यावयाची असें ठरलें होतें. शिवाजीनें काढलेली मूळची कल्पना ती हीच व पुढें सव्वाशें वर्षानंतर मार्क्किस ऑफ् वेलस्लीनें हीच कल्पना अमलांत आणून तीपासून बराच फायदा करून घेतला.