Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
याप्रमाणें, सत्तर वर्षेंपर्यंत सतत परिश्रम केल्यानंतर, इ. स. १६५० मध्यें आपले हक्काची मागणी करितांना शिवाजीच्या मनांत ने उद्देश होते, ते शाहूच्या मंत्रिमंडळानें सिद्धीस नेलें. मराठ्यांना त्यांचें पुरातन ‘स्वराज्य' पुन: मिळालें, इतकेंच नव्हें, तर या स्वराज्याची सीमा , वाढून, त्यामध्यें त्यावेळेस जेवढा मुलूख मराठ्यांनीं जिंकिला होता त्या सर्वांचा समावेश होऊं लागला व पुढेंही जो मुलूख मिळेल तोसुद्धा " त्यांतच घालण्यास जागा झाली. 'स्वराज्या' बद्दल जी सनद दिली होती तींत, घाटावरील प्रदेश, दक्षिणेंत हिरण्यकेशी नदी व उत्तरेस इंद्रायणी नदी यांच्यामधील शिवाजीनें जिंकिलेला मुलूख, पुण्याचे पश्चिमेकडील मावळ, सातारा व कोल्हापूर, म्हणजे पुणें, सुपें, बारामती, मावळ, इंदापूर, जुन्नर, वाई, सातारा, क-हाड, खटाव, मांड, [ माण ?] फलटण, तारळा, मलकापूर, आजरें, पन्हाळा व कोल्हापूर हीं येतात. पूर्वेकडे भीमा व नीरा या नद्यांमधील प्रदेशांतच बराच मुलूख होता. ‘ स्वराज्याचा ‘ घांटाखालील मुलूख म्हटला ह्मणने उत्तर व दक्षिण कोंकण, रामनगर, जव्हार, चौल, भिवंडी, कल्याण, राजापूर, दाभोळ, राजापुरी, फोंडा व उत्तरकानडा, अकोला व कुडाळ यांपैकीं कांहीं भाग हा होय. अगदीं दक्षिणेकडे गदग, हल्याळ, बल्लारी व कोपल हे प्रांत, शिवाजीनें तंजावर व जिंजी येथील ठाण्यांशी दळणवळण ठेवण्याकरितां आपल्या ताब्यांत ठेविले होते. ईशान्येस संगमनेर, बागलाण, खानदेश व व-हाड या प्रांतांत शिवाजीची कांहीं ठाणीं होतीं. हा जो अरुंद व उंचसखल पट्टा ह्यास ' स्वराज्य' म्हणत व हेंच “ स्वराज्य' शाहूस परत मिळालें. फक्त खानदेश प्रांत मात्र मिळाला नाहीं. पण त्याच्या मोबदला भीमानदीवर पंढरपूरच्या बाजूस आपली हद्द वादविण्यास त्याला परवानगी मिळाली. वहाड, खानदेश, औरंगाबाद, बेदर, हैदराबाद व विजापूर ह्या सहा सुभ्यांत चौथाई वसूल करण्याचा हक्क मराठ्यांना मिळाला. बादशहाच्या दप्तरांत या सहा सुम्यांचें एकंदर उत्पन्न अठरा कोटी नमूद होतें. या उत्पन्नावर सरदेशमुखीबद्दल एक दशांश व चौथाईबद्दल एकचतुर्थांश इतका बोजा होता. या हक्कासंबंधीं बादशहाचीं मंजुरी मिळविणें अगदीं आवश्यक आहे, असें बाळाजी विश्वनाथास वाटण्याचें कारण, दुस-या कोणत्याही उपायानें देशांत स्वस्थता झाली नसती हेंच होय. दक्षिणेंतील निरनिराळ्या प्रांतांमध्यें कित्येक सरदारांनीं आपली सत्ता स्थापन केली होती; पण त्यांच्या व्यवस्थेंत शाश्वतपणा मुळींच नव्हता. जुनी परिस्थिति व नवी परिस्थिति, जुने मोंगलांचे सुभेदार, फौजदार व इतर मुलकी अधिकारी, व त्यांचे ठिकाणीं सत्ता स्थापन करणारे मराठे अधिकारी या दोघांमध्यें एकीचें बंधन असेल तरच सर्वांचें हित होईल अशी प्रत्येक बड्या अधिका-याची खात्री होऊन चुकली होती. चौथाईबद्दल जी सनद दिली होती, तींत असें एक कलम होतें कीं, शाहूनें बादशःहाच्या उपयोगी पडावे ह्मणून पंधरा हजार घोडेस्वार ठेवावेत. मोंगल सुभेदार सांगतील तसें निरनिराळ्या ठिकाणीं ते ठेवावयाचे. सरदेशमुखी जसें वतन, तसें चौथाई ह्मणजे वतन नव्हे तर देशांत शांतता ठेवणें व परचक्राचा प्रतिबंध करणें या कामगिरीबद्दल दिलेलें वेतन होय. सनदेंत लिहिल्याप्रमाणें सहा सुभ्यांचा जर भरपूर वसूल आला असता, तर मराठ्यांना साडेचार कोटी रुपये उत्पन्न आलें असतें. परंतु औरंगजेबाच्या लढायांनीं व स्वा-यानीं देशाची फार धुळधाण होऊन गेल्यामुळें वरील रकमेचा एकचतुर्थांशदेखी पदरात पडत नसे. मोंगल बादशाहींत सरकारचा स्थानिक खर्च एकंदर उत्पन्नाच्या एकचतुर्थाशाइतका असे व याच हिशेबावर चौथाई हक्क ह्मणजे शेंकडा २५ प्रमाणें मराठ्यांना दिला होता. ही चौथाई गोळा करण्याचें काम मराठ्यांकडेच सोंपविलें होतें. कारण कीं, एकंदर जमाबंदीपैकीं शेंकडा ७५ दिल्ली येथील खजिन्यांत भरणा होत असल्यामुळें, निव्वळ उत्पनांत कांहीं तूट पडत नसे. परंतु देशाची अगदीं दुर्दशा उडाल्यामुळें जितका वसूल भरणा होइ तितका बहुतेक चौथाई व सरदेशमुखीकडेच खर्च हाई व बादशाहाच्या खजिन्यांत त्यांतून कांहींच पोंच होईना. तेव्हां चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा दिल्या होत्या, तरी असंतोषाचें कारण राहिलेंच. सरदेशमुखी व चौथाई यास “ राजबावती ' असें नांव देऊन जेथें तेथें मराठ्यांचा पगडा बसला तेथून तेथून त्यांनी आपले पैसे उकळलेच. सरासरी वसुलाचा तीन चतुर्थांश भाग जमा करण्याचें काम पूर्वीच्या मोंगल सरदाराकडे होते; परंतु त्यांना वसून होईना, तेव्हां आस्ते आस्ते सर्व सत्ता मराठ्यांच्याच हातांत आली.