मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २०६.

श्री.
१७०१ अधिक श्रावण शुद्ध ११

राजश्री महादजी बाबा शिंदे गोसावी यांसीः-

सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरवहादर रामराम विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष, सांप्रत्य इकडील वर्तमान राजश्री दादासाहेब सुरतेस शहरांत आहेत. इंग्रजांकडील सरंजाम तापी दक्षण तीरीं आहे. रयतेचीं घरें मोडून, इमारत नवीन उभी करून, लोकांच्या घरांत छावणी केली आहे. याजमुळें लोक परागंदा होऊन गेलें. लावणी आबादीस ठिकाण नाहीं. माहाल खराब, बेचीराख जाले. रयतेस उपद्रव. पुढील भरंवसा न पुरे. तमाम माहाल उज्याड जाले. हालीं राजश्री दादासाहेब यांणीं अमदाबाद, बडोदें वे डभईकडे राजाराम गोविंद यांची रवानगीचा विचार ठरविला. शहरावाहीर येऊन राहिले होते, तें तहकूब ठेऊन, गाजुदीखान याची उभारणी करावयाचा निश्चय करून, नर्मदा अलीकडील बंदोबस्ताकरितां पाठवावें, समागमें सरंजाम पलटणें व स्वार व तोफा देऊन पाठिवणार, ह्मणोन बातमी आली आहे. अद्याप तेथेंच आहेत. इकडे येऊन बखेडा करणार येविसींचा बंदोबस्त ठेविला पाहिजे. स्वस्थतेचा अर्थ कांही दिसोन येत नाही. याजकरितां महीपलीकडे खंबायतकराचे तोंडावर तीन हजार फौज पेशजीं रवाना केलीच आहे. सुरतप्रांतींहि थोडीबहुत फौज आहे. आह्मीं मासपक्षांत निघावयाचे तरतुर्दीत आहों. फौजेचा देण्याचा पेंच तीन वर्षांचा जाला. त्याचा गवगवा पडला आहे. त्याची सोय करून निघावयाचें होईल. सरकारच्या फौजेची रवानगी होऊन लौकर आल्यास, उत्तम आहे. वरकड तिकडील बातमी जैसी येत जाईल, तैसी मागाहून लेहून पाठवू. कळावें. रवाना छ १० माहे रजब. बहुत काय लिहिणें? लोभ कीजे हे विनंती. मोर्तबसुद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries