Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २०५.
श्री.
१७०१ अधिक श्रावण शुद्ध ११.
राजश्री पंत प्रधान गोसावी यांसीः-
श्रीसकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंगराव गायकवाड सेनाखासखेल समशेरबाहादर दंडवत विनंती येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. सांप्रत्य इकडील वर्तमान राजश्री दादासाहेब सुरतेस शहरांत आहेत. इंग्रजांकडील सरंजाम तापीदक्षणतीरीं रयतेचीं घरें मोडून, नवीन इमारत उभी करून लोकांच्या घरांत छावणी केली आहे. याजमुळें लोक परागंदा होऊन गेले. लावणीआबादीस ठिकाण नाहीं. माहाल खराब, बेचिराख जाले. रयतेस उपद्रव, पुढील भरवंसा न पुरे. याजकरितां तमाम माहाल उज्याड जाहाले. हालीं राजश्री दादासाहेब यांणीं अमदाबाद, बडोदें व डभईकडे राजाराम गोविंद याची रवानगीचा विचार ठरवला. शहराबाहेर येऊन राहिले होते. ते महकूब होऊन, गोजुदीखान याची उभारणीचा निश्चय करून, नर्मदा अलीकडील बंदोबस्ताकरितां पाठवावें. समागमें, सरंजाम, पलटणें व स्वार व तोफा देऊन पाठविणार, ह्मणोन बातमी आली आहे. अद्याप तेथेंच आहेत, इकडे येऊन बखेडा करणार, ये विर्सीचा बंदोबस्त ठेविला पाहिजे. स्वस्थतेचा अर्थ दिखोन येत नाही. याजकरितां महीपलीकडे खंबायतकसच्या तोंडावर तीन हजार फौज पेशज रवाना केलीच आहे. सुरत प्रांतीं थोडी बहुत फौज आहे. आह्मीहि मासपक्षांत निघावयाचे तरतुदींत आहों. परंतु फौजेचा देण्याचा पेंच तीन वर्षांचा जाला. त्याचा गवगवा पडला आहे. याची सोय करून निघावयाचें होईल. सरकारच्या फौजेची रवानगी होऊन लौकर आल्यास उत्तम आहे. वरकड तिकडील बातमी जैसी येत जाईल तैसी मागाहून लिहून पाठऊ. रवाना छ १० माहे रजब. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंती. मोर्तबसुद.