Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २००

श्रीशंकर
१७०० माघ शुद्ध १०

राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री बाबूरावजी स्वामीचे सेवेसीं:-

पो जिवाजी माहादेव काणे साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल माघ शुद्ध १० पावेतों मुक्काम नागपूर येथें सुखरूप असों विशेष. आपण गेलिया तागाईत पत्र पाठऊन समाचार न घेतला ! तर माझें विस्मरण व्हावें हें नव्हतें. परंतु कां जालें हें नकळे ! तर ऐसें नसावें. सदैव पत्र पाठऊन सांभाळ करीत गेलें पाहिजे. यानंतर आपण गेलियावर एकदां दोनदां निरोप जाऊन मागितली. परंतु प्रेमाचींच भाषणें केलीं. नंतर श्रीमंतांकडे जाऊन, एक प्रहर बहुतां प्रकारें भाषण करून काम द्यावेंसें ठराऊन आले. मग मजला बोलऊन नेऊन सांगितलें कीं, श्रमिंतांची मर्जी तुह्मांवर प्रसन्न करून आलों. आणि बहुत प्रकारें बोलिले, त्याजवर श्री पंचमीस आपण येऊन वस्त्रें फडणशीचीं दिल्ही. दुसरे सांगून दामाजीपंतासमागमें पाठविलें कीं, जे पूर्वी सुदामत यांजकडे काम असेल त्याप्रो द्यावें. त्यांत उकरावयाचें नाहीं. मग आह्मांशी बोलिले कीं, बळवंतराव यास पाठवितों, तुह्मींहि जावें, ह्मणजे माझी खातरजमा आहे. कबूल केलें. तो सर्व प्रकार मागील पत्र लिहिला आहे, त्याजवरून कळेल. प्रस्तुत तिकडील वर्तमान फार चांगलें आलें. त्याजपासून येथें लक्षुमणपंतदादा यांचा प्रेमा पूर्ववत्प्रमाणें करून द्यावयाचे संघानांत आहे. ईश्वर घडवील तें खरें, फार खट्टे तुह्मांवर आहेत. जो संदेह आपणापाशीं आह्मी जाते समईं घेतला तो खरा शोध लागला. कळावें. आपण तेथें यांच्या गोष्टी समेटीच्याच बोलाव्या. त्या येथें तानकोबाचे हातें येथें कळाव्या. तो असेल त्या समईं श्रीमंतांशी चांगलें बोलावें कीं, येथें ऐकून दुःसंदेह येत नाहीं. येथें आह्मी प्रतिज्ञा करून दादापाशीं बोलिलों कीं, रावजी आपला प्रकार ईषत् मात्र व्यंग बोलणार नाहींत. आमचे त्यांचें मात्र न बनें. यास कारण, दैव अथवा शनीश्वर आला हें नकळे, असें आपल्या प्रत्ययास रावजीचें बोलणें येईल तैसें घडावें. आह्मांस पाठवावयाचा सिद्धांत आहे. वद्य पंचमीस मुहूर्त आहे. मध्यें बळवंतराव यास मुहुर्तच नव्हता. यास्तव निघण्याची विलंब मात्र जाला. कळावें. श्रीमंत राजश्री नाना यांस पत्र लिहिलें आहे तें पावेल. आपण तेथें आहेत तेव्हां मीं काय लिहूं ? सर्व आपण मागें केलें तैसें करतील. रावजी शेवटचे ऐसें जे जाले त्यांचा बयान काय लिहूं ? इंग्रजांस ऐसी शिकस्ती कोणी दिल्ही नव्हती. शिकस्ती देऊन आपला तोरा जायां न होतां आला, हें केवढें जालें ? यास जोडा नाहीं. श्रीमंत राजश्री रावसाहेबाचे प्रतापास उपमाच नाहीं. गर्भापासून कृष्णचरित्रासारिखेंच जालें ! ध्यानास आणावें. धर्म रक्षावयास ईश्वर साह्य खरा ! हे आतां पटलें. कळावें बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ करीत गेलें पाहिजे. ही विनंति. इ० इ०