Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९९
श्री.
१७०० माघ शुद्ध १
आशिर्वाद उपरी येथील क्षेम ता माघ शुद्ध ११ गुरुवासर मुा नागपूर वर्तमान यथास्थित असे. विशेष. जालनापूरचे मुकामचीं पत्रें पाठविलीं तीं पावलीं. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें, संताजीनाईक यांची भेट जाहाली, वर्तमान लिहिलें तें कळलें. त्यास, येथें आल्यावर सविस्तर लिहून पाठऊं. येथील प्रकार तरी छ २९ जिल्हेमचें पत्र श्रीमंतांचें आलें, त्या दिवसापासून पहिलें भाषण तें किमपि नाहीं. सफाईचेंच आहे. आम्हांस काल बोलावूं पाठविलें. देवडीवर गेलों. उभयतां होते. राजश्री मन्याबापूंस हळद लाविली. समारंभ जाहला. आह्मांस ह्मणों लागले की, गडगनेर कधीं करितां? आह्मी उत्तर केलें कीं, आमचीं मुलें माणसें येथें नाहींत. तेव्हा ह्मणों लागले कीं, चिंता काय, आह्मीं कोणाचे घरीं जेवण्यास जात नाहीं, उगेच येऊं, विडे घेऊ. तेव्हां उत्तर केलें कीं, उचित आहे, मर्जीस येईल तेव्हां घडेल. त्यास, गडगनेर करावें लागतें. पांच सातशें रुपयांचा खर्च आहे. न करावें तरी वाईट मानितील आणि ते होऊन सफाईवर येत असतां न करावें हें विहित नाहीं. नवाबाकडील पत्रें आली होतीं. त्यांत त्यांनी कायम मिजाजीचेंच लिहिलें होतें. राजश्री जिवाजीपंत यांचेंहि पत्र आपणास आहे. बगाजीपंत यांणी लिहिलें होतें कीं, नवाब श्रीमंतांकडे अनुकूल, फौजांची तयारी करविली आहे, परंतु संदेहांत आहेत, इंग्रजांशी बिघाड श्रीमंतांचा आहे, आपण निराळे आहों, त्यास कसें होईल, याजकरितां अंतस्त दोन्हीं सूत्रें ठीक, उघड श्रीमंतांचा पक्ष ऐसें बोलतात, ऐसें लिहिलें होतें. त्यावरून आह्मांस ह्मणों लागले कीं, नवाब आपला ह्मणतां, त्यास आइकिलें कीं ! आह्मीं उत्तर केलें कीं, या दिवसांत नवाबांनी फार केली. तेव्हां ह्मणों लागले कीं, आह्मीं कांहीं केली नाहीं. आह्मी उत्तर केलें कीं, तुह्मी केल्याची स्तुत काय करणें, नवाब परकी, हिंदुमुसलमान हे दोन पक्ष. वैरभाव भगवंत निर्मित आहे, या अर्थी त्यांनी फार केली, तुह्मीं केल्याचें आश्चर्य काय, हे दौलत आणि ते दौलत दोन हेंच लक्ष आमचे घरीं नाहीं, त्यांनी करावें तेच तुह्मीं करावें ऐसें आहे. ऐसें कित्तेक भाषण जाहलें. तेव्हां तेथे कार्य उत्तर करितात ? इंग्रज गाडराकडून एक आला आहे. कलकत्त्यास जाणार. त्यास यांचें त्याचें बोलणें होऊन जाईल. यांनीं गाडरास व कलकत्त्यास व जंगाकडे पत्रें या वर्तमानाचीं लिहिलीं आहेत. मल्हारीकडील हुंडी पटली कीं नाहीं, ह्मणोन लिहिलें. हुंडी पटेल. गुंता नाही. परंतु तुह्मीं तेथें गेल्यावर ऐवज कोणीकडे उतरावा, तें लिहिलें पाहिजे. हुंडी पांच सात दिवसांत पटेल. गुंता नाही. तुह्मी सत्वर जावें. सविस्तर वृत्त ल्याहावें. बहुत काय लिहिणे ! लोभ कीजे हे आशिर्वाद. राजश्री जिवाजीपंत यांस फडणिशीचीं वस्त्रे शुद्ध पंचमीस दिल्हीं. अद्यापि बंदोबस्त कांहीं नाहीं. तिकडे रवाना करणार ते संधींत काय होईल तें लिहून पाठऊं. हे आशीर्वाद.