Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

सात हातांची काठी व बारा काट्यांचा बिघा भागडचुरीनें चालू केला. चार फ-यांचा एक हारा दर देान बिघ्यास राजभाग ठरविला. एक शे अठ्ठावीस बिघ्यांचा एक चावर केला." या प्रकारें जुनी त-हा मोडून नवीन त-हेने कमावीस करूं लागला. दादाजी कोंडदेव, चतुर साबाजी, इत्यादींचीं नांवें प्रख्यात मोजणीदार म्हणून महाराष्ट्रांत सर्वतोमुखीं आहेत. त्या नांवांत भागडचुरीचें नांव हि घेण्या सारखें आहे. आपल्या नवीन मोजणीनें भागडचुरीनें बिघ्यांची संख्या वाढविली आणि दोन फ-यांच्या ऐवजीं चार फ-यांचा हारा करून, सरकारी उत्पन्न निदान तिप्पट तरी चढविलें. स्वामिकार्या तत्पर व हितार्थी म्हणून नागरशानें भागडचुरीची प्रतिष्टा परा कोटी प्रत नेली. ते समयीं, ईश्वरी इच्छा, ऐश्वर्याचा माद चढून भागडचुरांची बुद्धि फिरली. जमीनीचा सारा बेसुमार वाढविल्या मुळें भागडचुरी आधीं च लोकांद्विष्ट झाला होता. तशांत अलीकडे तो स्त्रीव्यसनीं पडला. भल्याभल्यांच्या स्त्रियां वर बलात्कार करूं लागला. कित्येकां पासून अनीतीनें द्रव्य उकळण्याचा त्यानें सपाटा चालविला, गा-हाणीं राया पाशीं पोहोचलीं. परंतु राजाची हि क्षति भागडचुरी बाळगीत ना सा झाला. शिक्षा लावावी, तर जीवास उदार म्हणून राजा हि मनीं दचके. होतां हेातां भागडचुरी इतका बेफाम झाला कीं मालाडचा लोकप्रिय देसला जो सोम त्याच्या भावाच्या लावण्यसंपन्न स्त्री वर त्याची नजर गेली. तिला बलात्कारानें हरण करण्याचा घाट भागडचुरीनें घातला. सोमदेसला, त्याचा बंधू व घरांतील सर्व पुरुष त्यानें बंदखानीं कोंडिले अणि त्या स्त्रीस काढून आणण्यास शिपाई धाडिले. इतक्यांत ही बातमी कळून, सोमदेसल्याच्या आप्तेष्टांनीं त्या स्त्रीस कु-हारास रातोरात नेली. हा प्रकार ऐकून भागडचु-यानें त्या स्त्रीच्या भ्रतारास रागानें ठार मारिलें व कु-हारास शिपाई पाठविले. तेथून ती स्त्री भाइंदरास माहेरीं गेली. चार महिन्याची गरोदर होती. भागडचुरीच्या भयानें मातृपक्षीयांनीं तिला आपल्या मामाच्या घरीं भिवंडीस पाठविली. तेथें ती प्रसूत होऊन पुत्र झाला. तो बारा वर्षांचा झाल्या वर, त्यास आपल्या पित्याच्या वधाची व भागडचुरीच्या अधमपणाची हकीकत मातृमुखें कळली. तेव्हां भाऊबिरादरांचा जमाव करून त्या मुलानें भागडचुरीला ठार मारतों म्हणून नागरशास कळविलें. नागरशास तें च हवें होतें. भागडचुरीची वासलात कोणी लाविल्यास त्याला ती हवी च होती. सोमवारच्या दिवशीं महडदेवीची यात्रा होती. देवीदर्शनास भागडचुरी जिव्हाळ्याचे बारा स्वार घेऊन गेला. त्याच्या वर त्या मुलानें व त्याच्या साथीदारांनीं हल्ला केला. दोन स्वार जागच्या जागीं च ठार झाले. राहिलेले भागडचुरी सह जे पळाले ते पायउतारा होऊन खाडींत पोहोंत चालले. खाडींत होड्या होत्या त्यां वरील एका तांडेलास मुलानें हटकिलें कीं, जर तो भागडचुरी मारशील तर मागशील तें देईन. तांडेल बोलता झाला कीं, मला आपल्या जातींत घ्याल तर भागडचुरीस ठार करतों. प्रसंग तसा च जाणोन मुलानें तांडेलाची अट कबूल केली. तेव्हां तांडेलानें पालकोयती हाणोन भागडचुरी यमसदनास पाठविला, तांडेलानें भागडचुरीचें शीर कापून त्या मुलास दिलें. तें घेऊन सर्व लोक मुक्तेश्वरीं आले. खुशाली करों आदरिली. कांहींक धर्म कलो. जातिभोजन घातलें. सूर्यवंशी व सोमवंशी पानावर बसले. तों तो तांडेल सोंवळे नेसान तेथें आला व म्हणों लागला कीं, भाष उत्तीर्ण करणें. मंडळींत कुजबुज सुरू झाली कीं कैवर्तकास जातींत कसा घ्यावा व पंक्तीस बसूं कसा द्यावा ? हो ना करतां करतां मंडळींनीं त्या कैवर्तकास पंक्तीस घेतलें व जातींत सरता केलें. नंतर मंडळी राजदर्शनास गेली. भागडचुरी मारिला म्हणून राजानें त्या मुलाचा बहुत सन्मान केला. परंतु तांडेलाशीं पंक्तिव्यवहार केला इतकें च नव्हे तर त्यास जातींत सरता केला, हें ऐकून नागरशानें मंडळीस दोष दिला व कैवर्तकाच्या पंक्तीस बसणा-या व त्याला जातींत घेणा-या सर्व लोकांचीं यज्ञोपवीतें काढून टाकविलीं. ही हकीकत शक १२६७ च्या सुमारास घडली.